Tuesday, January 20, 2026

चैतन्यवृत्तीची विविध रूपे भाग २ | Expressions Of Consciousness Part 2

 




हे राघवा !  मन, बुद्धि, अहंकार, चित्त, कर्म, कल्पना, संसृति, वासना, विद्या, प्रयत्न, स्मृति, इंद्रिये, प्रकृति, माया, क्रिया हे सर्व शब्द किंवा यांसारखे अन्यही अनेक शब्द म्हणजे केवळ संसारभ्रम आहे.  अज्ञानी जीव आपले खरे आत्मचैतन्यस्वरूप विसरतो व वर सांगितलेल्या मन वगैरेदि कल्पित उपाधीशी व दृश्याशी तादात्म्य पावून बद्ध होतो.

 

·       स्मृति: “मी ही वस्तु पूर्वी पाहिली की नाही” असा विचार करता करता “मी ही वस्तु पूर्वी निश्चितपणे पाहिली आहे” अशा निर्णयात्मक वृत्तीला ‘स्मृति’ असे म्हणतात.

·       वासना: ज्या पदार्थांचा व त्यांच्या शक्तींचा उपभोग घेतलेला असतो, त्या पदार्थांची पुन्हा तीव्र भावना उत्पन्न होऊन त्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही इच्छा उत्पन्न न होणे.

·       विद्या: “आत्मतत्त्व हे अत्यंत विमल, शुद्ध, मायारहित असून त्याव्यतिरिक्त असणारी द्वैतात्मक दृष्टि ही अस्तित्वातच नाही” याची जी जाणीव होते.

·       विस्मृति: जिला परमपदाचे विस्मरण होते, आत्मविनाशासाठीच जी स्फुरण पावते.

·       इंद्रिय: जी संवित् ऐकणे, स्पर्श करणे, पाहणे, उपभोगणे, गंधग्रहण करणे, विचार करणे वगैरेदि क्रिया करून आपल्या इंद्राला म्हणजे इंद्रियांचा स्वामी असणाऱ्या जीवाला आनंद देते.

·       प्रकृति: ज्या तत्त्वाचा कशानेही निर्देश करता येत नाही, अशा अलक्षित परमात्मस्वरूपामध्ये जी सर्व दृश्य पदार्थांना प्रकर्षाने उत्पन्न करते.

·       माया: जिच्यामुळे वस्तु सत् आहे की असत् आहे, याचा निश्चय बोध होत नाही, जी सहजपणे सत् ला असत् रूपाने दाखविते तर असत् ला सत् रूपाने दाखविते.

·       क्रिया: पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, रसग्रहण करणे, गंधग्रहण करणे, या कर्मांच्यामधून जी कार्यकारण रूप व्यवहाराला प्राप्त होते.

 

हे राघवा !  याप्रमाणे ही संवित् किंवा हे चैतन्यच या दृश्य संसाराचे कारण आहे.  विषयाभिमुख झाल्यामुळे तेच चैतन्य कलंकित होऊन स्फुरण पावते व अनेक गुणधर्मांनी व्यक्त होते.  वरील सांगितलेले सर्व शब्द हे त्या चैतन्यवृत्तीचेच पर्यायी शब्द आहेत.  परमात्मस्वरूपापासून च्युत झालेल्या, अविद्येने कलंकित झालेल्या, नाना संकल्पांनी युक्त असणाऱ्या या चैतन्याच्या वृत्तीलाच ज्ञानी पुरुष मन, बुद्धि वगैरेदि अनेक शब्दांनी संबोधतात.  थोडक्यात जीव काय, मन काय, बुद्धि काय वगैरेदि हे सर्व शब्द चैतन्यला केवळ अविद्येमुळे प्राप्त झाले आहेत.  त्यामुळे हे राघवा! हे सर्व शब्द कल्पित आहेत, हे तू लक्षात घे.


 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ