आचार्यांची - गुरूंची काया-वाचा-मनाने
सेवा करावी. शरीराने सेवा-सुश्रुषा करावी, वाचेने गुरुंचाच महिमा गावा, शास्त्रच बोलवे आणि मनाने सतत गुरुंचेच स्मरण करावे. या विश्वामध्ये 'सेवा' ही सर्वात अवघड गोष्ट आहे. ज्याची सेवा करावयाची तेथे पूर्ण श्रद्धा असली
पाहिजे. जेथे पूर्ण श्रद्धा असते तेथेच 'मी' समर्पण
होतो. माझे स्वतःचे व्यक्तिगत रागद्वेष
नाहीसे होतात. तेथेच सेवावृत्ति निर्माण
होते.
ज्याप्रमाणे सेवक आपले प्रत्येक कर्म आपल्या
स्वामीसाठी, मालकासाठी करतो. तो मालकासाठीच जगत असतो. स्वतःची आवड-नावड बाजूला ठेऊन तो आपल्या मालकाला
ज्यामध्ये आनंद असेल तेच कर्म करतो. अनेक
प्रकारे सेवा करून तो मालकाला सतत आनंदी, प्रसन्न
ठेवतो. त्याप्रमाणे साधकाने गुरूंची सेवा
करावी. गुरूंच्यामध्ये पूर्ण श्रद्धा ठेऊन
अनन्य भक्तीने त्यांना शरण जावे. गुरूंच्यासाठीच जीवन जगावे. मला काय आवडते यापेक्षा गुरूंना काय आवडते, याचा विचार करावा. गुरुवाक्य, गुरूंचा शब्द हाच जीवनामधील परम आदेश आहे. तोच अंतिम शब्द असून प्रमाणभूत आहे. गुरूंना कधीही 'का?' हा प्रश्न विचारू नये. गुरूंच्या शब्दाला पर्याय देणे
म्हणजे गुरूंची अवज्ञा करणे आहे. गुरूंचा
शब्द हा मंत्रापेक्षाही महान आहे. रात्रंदिवस, प्रत्येक क्षण गुरूंच्यासाठीच जगावे. गुरूंशी पूर्णपणे एकरूप व्हावे.
संत गुरुनानक म्हणतात -
गुरू की मूरत मन मे ध्यान । गुरू के शब्द मंत्र मन मान ।।
गुरूंनी सांगावे आणि त्या बरहुकुम मी अनुसरण
करावे. गुरूंचा संकल्प तोच माझा संकल्प
झाला पाहिजे. या गुरुमय वृत्तीमध्ये
अहंकार, ममकार, रागद्वेष, कामक्रोधादि विकार गळून पडतात. सर्व
विश्वच गुरुमय दिसू लागते.
आपल्या सुंदर, स्वच्छ, सुशोभित केलेल्या हृदयसिंहासनावर श्रीगुरूंना प्रेमाने आरूढ करावे. त्यांची मानसपूजा करावी. सद्गुण हीच साधकाची खरी संपत्ति आहे.
या सद्गुणरूपी हिरे, पाचू, माणके
यांनी ते सिंहासन विभूषित करावे. अशा प्रकारे उपासना केल्यानंतर गुरु प्रसन्न
होतात आणि शिष्याला आत्मज्ञानाचा उपदेश देतात.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–

