Tuesday, February 7, 2023

भूपालांची आणि आचारधर्माची निर्मिति | Creation of Protectors & Guidelines





स्वैर झालेल्या समाजावर नियंत्रण करण्यासाठी, या लोकांना नियम घालून योग्य ते शासन करण्यासाठी ऋषि-मुनींनी प्रथम या पृथ्वीचे विभाग पाडले. क्षत्रियांची निर्मिती केली.  क्षत्रियांच्यामध्ये महापराक्रमी राजेलोक निर्माण केले.  खरे तर प्राचीन काळी सगळीकडे ईश्वराचे साम्राज्य होते.  नियम सांगण्याची आवश्यकता नव्हती.  न वै राज्यं न राजाSSसीन्न दण्डो न च दाण्डिकः |  धर्मेणैव प्रजाः सर्वाः रक्षन्ति स्म परस्परम् ||  (महा. शांति.)  तेथे कोणी नियामक, शासक, राजा नव्हता.  शासन नव्हते, दंड नव्हता.  केवळ सत्याच्या व धर्माच्या आधारेच सर्व प्राणीमात्र मोठ्या आनंदाने जीवन जगत होते.  परंतु काळाच्या ओघात मनुष्यामधील कामक्रोधादि विकार वर्धन पावले.  विकृति वाढल्यामुळे ऋषि-मुनींनी सर्व नियम केले आणि समाजाला, प्रजेला नियमित करण्यासाठी भूपालांची निर्मिती केली.

 

भूपाल म्हणजे पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी समर्थ राजेलोक निर्माण केले.  त्यानंतर त्या राजांनी प्रजेचे पालन कोणत्या नियमांच्या साहाय्याने करावे, हेही ठरवून दिले.  त्यासाठीच स्मृतिशास्त्र निर्माण झाले.  धर्म, अर्थ आणि काम यांच्या प्राप्तीसाठी पृथ्वीतलावर यज्ञशास्त्राची म्हणजे वेदशास्त्राची निर्मिती केली.  ऋग्वेद, यजुर्वेदादि यज्ञशास्त्र तसेच त्यामधील कर्मकांडांचा प्रचार आणि प्रसार झाला.  ती सर्व कर्मे धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांचे साधन आहेत.

 

म्हणजे काही धर्मकार्य करावयाचे असेल, ऐहिक, पारलौकिक कामना पूर्ण करावयाच्या असतील, तसेच अर्थ म्हणजे संपत्ति मिळवायची असेल तर वेदग्रंथ मनुष्याला साधन देतात.  मात्र त्याचबरोबर मनुष्याने कसे वागावे ?  कोणते आचारधर्म पाळावेत ?  ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-शूद्र, तसेच ब्रह्मचर्य-गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांची कर्तव्ये काय आहेत ?  तसेच स्त्रीधर्म, राजधर्म, प्रजाधर्म या सर्वांचेच यथार्थ वर्णन स्मृतिग्रंथांच्यामधून केले जाते.  स्मृतिग्रंथामधील एखादेच विधान घेऊन वादविवाद करण्यापेक्षा स्मृतिग्रंथांचा सर्वांगीण व सखोल अभ्यास आवश्यक आहे.  कारण हे ग्रंथ दुसऱ्यासाठी नसून स्वतःच्या जीवनाच्या विकासासाठीच आहेत, हे मनुष्याने प्रथम लक्षात घ्यावे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ