Tuesday, June 28, 2022

शास्त्र, गुरू आणि स्वप्रयत्न | Science, Guru And Self-Efforts

 



साधकाच्या जीवनामध्ये शास्त्र, गुरु व स्वतःचे प्रयत्न या तीन गोष्टी आवश्यक आहेत.  शास्त्र व गुरुवाक्य हेच साधकासाठी प्रमाण आहे.  त्यानुसारच साधकाने नित्यनिरंतर प्रयत्नपूर्वक व जाणीवपूर्वक साधनेमध्ये प्रवृत्त झाले पाहिजे.  त्यासाठी शास्त्र व गुरूंच्यावर नितांत श्रद्धा हवी.  आदि शंकराचार्य व्याख्या करतात - शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यवधारणा |  सा श्रद्धा कथिता सद्भिः यया वस्तूपलभ्यते ||  शास्त्रवाक्य व गुरुवाक्य यावर पूर्ण विश्वास असणे, तीच वाक्ये सत्य आहेत, अशी बुद्धीची धारणा होणे, यालाच 'श्रद्धा' असे म्हणतात.  या नितांत श्रद्धेच्या साहाय्यानेच साधकाला आत्मवस्तूची प्राप्ति होते.

 

म्हणून साधकाच्या जीवनामध्ये एकच श्रद्धास्थान हवे.  जे काही सांगायचे, जे काही ऐकायचे, जे काही मार्गदर्शन घ्यायचे, ते एकच स्थान पाहिजे.  दोन-तीन-अनेक जणांना विचारून त्याचा काही उपयोग होत नाही.  तसेच गुरूंनी सांगितल्यावर त्यांचा शब्द प्रमाण मानून त्याचे तंतोतंत पालन केले पाहिजे.  त्याचबरोबर गुरुमुखामधून वेदांतशास्त्राचे श्रद्धापूर्वक श्रवण करावे.  आत्मविद्या साधकाला केवळ स्वतःच्या बुद्धीने प्राप्त होत नाही.  बुद्धीने शास्त्राचे शाब्दिक ज्ञान होते.  परंतु शास्त्राची अनुभूति मात्र गुरुकृपेनेच येते.

 

याप्रमाणे येथे 'गुरु' हे प्रथम प्रमाण आहे.  येथे दुसरे प्रमाण 'शास्त्र' सांगितले आहे.  जगामध्ये अनेक प्रकारची शास्त्रे, विद्या व त्या त्या विद्यांचे गुरु आहेत.  त्यांपैकी ब्रह्मविद्या ही सर्वश्रेष्ठ असून त्यासाठी वेदांतशास्त्र हे प्रमाणभूत शास्त्र आहे.  वेदन्तो नाम उपनिषत् प्रमाणम् |  (वेदांतसार)  वेदांत म्हणजे उपनिषदे हीच आत्मविद्येसाठी प्रमाण आहेत.  याप्रमाणे साधकाने गुरु व शास्त्र यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून स्वतःचे प्रयत्न करावेत.  मनापासून सातत्याने साधना करावी.  अशा या पुरुषार्थानेच साधकाला आत्मसिद्धि प्राप्त होते.  दैवामुळे कधीही परमपुरुषार्थाची प्राप्ति होत नाही.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, June 21, 2022

ज्ञानयुक्त प्रेम | Knowledge Based Affection

 



गोपींना ज्ञान झाले होते का ?  कारण गोपींनी फक्त श्रीकृष्णावर एकनिष्ठ प्रेम केले.  त्या संपूर्ण समर्पण झाल्या होत्या.  प्रेमाने त्या धुंद, वेड्या झालेल्या होत्या.  त्यांना स्वतःची नव्हे घरादाराची सुद्धा शुद्ध नव्हती.  परंतु हा प्रश्न भक्तीमध्ये निर्माण होत नाही.  प्रेमात ज्ञान हे गृहीत आहे.

 

व्यवहारात आपण पाहतो की, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, त्या व्यक्तीची प्रथम ओळख होते आणि नंतर हळूहळू त्याच्या गुणांची, ज्ञानाची प्रगल्भता कळते तसे त्याच्यावरचे प्रेम वाढू लागते.  म्हणजेच प्रेम आणि ज्ञान भिन्न नसून परस्पर आश्रित आहे.  श्रद्धा आणि प्रेमाशिवाय ज्ञान असेल तर ते अहंकार, दंभ, दर्प, उद्धटपणा वगैरे निर्माण करेल आणि ज्ञानाशिवाय प्रेम असेल तर ती फक्त उचंबळून येणारी भावना राहील.  त्यात फक्त शारीरिक आकर्षणाचा भाग अधिक असेल.  त्या प्रेमामध्ये कामुकता निर्माण होऊन उपभोगण्याची वासना निर्माण होईल.  प्रेमाचा उत्कर्ष होण्याऐवजी प्रेम हळूहळू कमी होईल.  तसेच प्रेम आनंदवर्धक होण्याऐवजी दुःखवर्धन करण्यास कारण ठरेल.

 

व्यवहारात आपण मंदिर दिसले की मूर्तीला बघून नमस्कार करतो.  भक्त तो केवळ दगड पाहात नाही तर त्याठिकाणी ईश्वरत्व पाहातो.  म्हणूनच त्याची श्रद्धा, भावना त्या पिंडाशी निगडित झालेल्या असतात.  त्यामुळे डोळ्यांना जरी तो दगड दिसत असला तरी अंतःचक्षूंना परमेश्वराचे सगुण, साकार रूप दिसते.  याचाच अर्थ त्याला माहात्म्यज्ञान आहे.  हे माहात्म्य, दिव्यता, भव्यता डोळ्यांना दिसत नाही तर मनाला प्रचीतीला येते.

 

याप्रमाणे गोपींना सुद्धा माहात्म्यज्ञान होते.  म्हणूनच त्यांचे प्रेम कामनारहित, शुद्ध प्रेम होते.  त्यांच्यात अहंकार, दंभ, दर्प वगैरेचा लेशमात्रही दोष नव्हता.  त्या अनन्यभावाने परमेश्वराला समर्पण झालेल्या होत्या.  त्यांना सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी अध्यात्मज्ञानाचा उपदेश दिला होता.  गोपींच्या अनुभूतीमध्ये अद्वैताचे, एकत्वाचे ज्ञान होते.  त्यांची भक्ति परमप्रेमस्वरूपाची, अमृतस्वरूपाची होती.  यामुळेच त्यांचे जीवन पूर्ण, तृप्त झाले होते.  कृतकृत्य झाले होते.  अनन्य भक्तीने त्या मुक्त झालेल्या होत्या.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ




Tuesday, June 14, 2022

मनुष्य शरीर - काही अशक्य नाही | Human Body - Nothing Is Impossible

 



आपणास दुर्लभ मनुष्यशरीर मिळाले आहे.  शरीर हे अप्रतिम यंत्र आहे.  त्यामध्ये यंत्राप्रमाणेच अनेक भाग असून प्रत्येक भागाचे एकेक विशिष्ट कार्य आहे.  शब्द ऐकण्यासाठी कान, स्पर्श समजण्यासाठी त्वचा, पाहण्यासाठी डोळे, स्वाद घेण्यासाठी जीभ, गंधग्रहणासाठी नाक, बोलण्यासाठी वाणी, आदान-प्रदान करण्यासाठी हात, चालण्यासाठी पाय, उत्सर्जनासाठी पायु आणि प्रजोत्पत्तीसाठी उपस्थ.  तसेच प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंचप्राण, तसेच विचार करण्यासाठी मन, निर्णय घेण्यासाठी बुद्धि, स्मरणासाठी चित्त, अभिमान व्यक्त करण्यासाठी अहंकार, असे सर्व काही जन्मताच दिले आहे.

 

त्यामुळे स्वतःच्या बुद्धीने कसा विचार करावा, जन्माला आल्यावर काय करावे आणि काय करू नये, काय खावे आणि काय खाऊ नये, काय बोलावे आणि काय बोलू नये वगैरेदि सर्व कर्मांचे स्वातंत्र्य मनुष्याला दिलेले आहे.  तसेच मनुष्याला योग्य-अयोग्य समजावे, यासाठी शास्त्र दिलेले आहे.  म्हणून मनुष्याने आपल्या शरीर व सर्व इंद्रियांच्या साहाय्याने शास्त्रविहित पुरुषार्थ करावा.  आयुष्यामध्ये सदाचाराचे पालन करावे.  सद्विचार करावेत.  वाणीने चांगले बोलावे.  सर्व इंद्रियांचा उपयोग धर्मार्थासाठी करावा.  त्यामुळे जसजसा मनुष्य पुरुषार्थ करेल तसतसे तो निश्चितच मोक्षाच्या जवळ जाईल.  नव्हे क्रमाने त्याला निश्चितच मोक्षप्राप्ति होईल, असे येथे वसिष्ठ मुनि प्रतिज्ञापूर्वक सांगतात.

 

थोडक्यात मनुष्यशरीर हे सामान्य शरीर नसून मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक सर्व साधनांनी युक्त असणारे अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण शरीर आहे.  ईश्वराने मनुष्याला दिलेले हे अलौकिक वरदान आहे.  मनुष्य जी जी इच्छा करेल त्या सर्व इच्छा प्रत्यक्षात आणण्याचे सामर्थ्य या शरीरात आहे.  म्हणून मनुष्याने जर ठरविले तर त्याला जगात काहीच अशक्य नाही.  याच शरीरामध्ये मनुष्याला प्रयत्न करून जर परमपुरुषार्थ मोक्ष प्राप्त होत असेल तर अन्य सर्व इच्छाही पूर्ण होतील यात काही आश्चर्य नाही.

 

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ



Tuesday, June 7, 2022

श्रेष्ठतम विद्या | Self-Realization – Supreme Knowledge

 



भगवान रमणमहर्षि म्हणतात –

वेषहानतः स्वात्मदर्शनम् |  ईशदर्शनं स्वात्मरूपतः ||            (उपदेशसारम्)

ब्रह्मविद्येच्या उपदेशाने ज्यावेळी अहंकाराने घेतलेला वेष गळून पडतो त्याचवेळी स्वस्वरूपाचे दर्शन होते आणि स्वस्वरूपाचे दर्शन म्हणजेच ईशदर्शन होय.  या सर्व कारणामुळे ब्रह्मविद्येला राजविद्या असे म्हटले आहे.

 

तीच राजविद्या राजगुह्य आहे.  सर्व गुह्यांच्यामध्ये अत्यंत गुह्य आहे.  वस्तु जितकी मौल्यवान असेल त्या प्रमाणामध्ये तिचे सर्वांच्यापासून रक्षण करावे लागते.  ती गुप्त स्थानामध्ये अशा तऱ्हेने ठेवली जाते की, ती सहजासहजी कोणाला सापडणार नाही.  म्हणजेच गोपनीय वस्तु सर्वांना दुर्लभ होते.  सोन्याचे दागिने शोकेसमध्ये ठेवता येतात.  परंतु अत्यंत मौल्यवान हिरा तिजोरीमध्ये अनेक कप्प्यांच्या आत आत चोरकप्प्यामध्ये ठेवतात.  तशीच ब्रह्मविद्या आहे.

 

विश्वामध्ये अनेक प्रकारच्या विद्या आहेत.  त्या प्रयत्नाने, परिश्रमाने मिळवता येतात.  परंतु त्यामध्ये मंत्रविद्या, तंत्रविद्या, दिव्यऔषधीविद्या सहजासहजी प्राप्त होत नाहीत.  योग्य अधिकाराशिवाय त्या विद्या प्राप्त करता येत नाहीत.  तरीसुद्धा त्या प्राप्त करता येतात, कारण सर्व विद्या दृष्टिगोचर असलेल्या विषयांच्या आहेत.  परंतु आत्मविद्या केवळ प्रयत्नाने, परिश्रमाने प्राप्त होत नाही, कारण आत्मविद्येचा विषय अत्यंत सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे.  तो दृष्टिगोचर विषय नाही.  किंवा मनाला व बुद्धीला आकलन होणारा विषय नसून इंद्रिय, मन, बुद्धीच्या पलीकडे असलेला विषय आहे.  प्रत्यगात्मा आहे.  जो कधीही विषय होत नाही तर तो नित्य विषयी आहे.  यामुळे त्याचे ज्ञानही अत्यंत सूक्ष्म आहे.  त्यासाठी योग्य अधिकारी आवश्यक आहे.

 

म्हणून शास्त्रामध्ये ब्रह्मविद्येच्या अधिकाऱ्याच्या लक्षणांची सतत चर्चा केलेली आही.  तो विवेकवैराग्यशमदमादिसंपत्तींनी युक्त असलेला दैवीगुणसंपन्न शुद्धात्मा असला पाहिजे.  अशा पुरुषालाच ते गुह्य ज्ञान प्राप्त होते.  जगामध्ये लाखो-कोट्यवधि लोक आहेत, परंतु असे शुद्ध मन, सर्वगुणसंपन्न मन मिळणे अत्यंत दुर्लभ आहे.  म्हणून ती विद्या सुद्धा अत्यंत गुह्य आणि दुर्लभ आहे.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ