भगवान रमणमहर्षि म्हणतात –
वेषहानतः स्वात्मदर्शनम् | ईशदर्शनं
स्वात्मरूपतः || (उपदेशसारम्)
ब्रह्मविद्येच्या उपदेशाने ज्यावेळी अहंकाराने घेतलेला वेष गळून पडतो त्याचवेळी
स्वस्वरूपाचे दर्शन होते आणि स्वस्वरूपाचे दर्शन म्हणजेच ईशदर्शन होय. या सर्व कारणामुळे ब्रह्मविद्येला राजविद्या असे
म्हटले आहे.
तीच राजविद्या राजगुह्य आहे. सर्व गुह्यांच्यामध्ये
अत्यंत गुह्य आहे. वस्तु जितकी
मौल्यवान असेल त्या प्रमाणामध्ये तिचे सर्वांच्यापासून रक्षण करावे लागते. ती गुप्त स्थानामध्ये अशा तऱ्हेने ठेवली जाते
की, ती सहजासहजी कोणाला सापडणार नाही. म्हणजेच गोपनीय वस्तु सर्वांना दुर्लभ होते. सोन्याचे दागिने शोकेसमध्ये ठेवता येतात. परंतु अत्यंत मौल्यवान हिरा तिजोरीमध्ये अनेक
कप्प्यांच्या आत आत चोरकप्प्यामध्ये ठेवतात. तशीच ब्रह्मविद्या
आहे.
विश्वामध्ये अनेक प्रकारच्या विद्या आहेत. त्या
प्रयत्नाने, परिश्रमाने मिळवता येतात. परंतु त्यामध्ये मंत्रविद्या, तंत्रविद्या, दिव्यऔषधीविद्या सहजासहजी प्राप्त होत नाहीत. योग्य अधिकाराशिवाय त्या विद्या प्राप्त करता येत नाहीत. तरीसुद्धा
त्या प्राप्त करता येतात, कारण सर्व विद्या
दृष्टिगोचर असलेल्या विषयांच्या आहेत. परंतु
आत्मविद्या केवळ प्रयत्नाने, परिश्रमाने
प्राप्त होत नाही, कारण आत्मविद्येचा विषय अत्यंत सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे. तो दृष्टिगोचर विषय नाही. किंवा मनाला व बुद्धीला आकलन होणारा विषय नसून
इंद्रिय, मन, बुद्धीच्या पलीकडे असलेला विषय आहे. प्रत्यगात्मा आहे. जो कधीही विषय होत नाही तर तो नित्य विषयी आहे.
यामुळे त्याचे ज्ञानही अत्यंत सूक्ष्म
आहे. त्यासाठी योग्य अधिकारी आवश्यक आहे.
म्हणून शास्त्रामध्ये ब्रह्मविद्येच्या अधिकाऱ्याच्या लक्षणांची सतत चर्चा केलेली आही. तो विवेकवैराग्यशमदमादिसंपत्तींनी युक्त असलेला दैवीगुणसंपन्न शुद्धात्मा
असला पाहिजे. अशा पुरुषालाच ते गुह्य
ज्ञान प्राप्त होते. जगामध्ये
लाखो-कोट्यवधि लोक आहेत, परंतु असे शुद्ध
मन, सर्वगुणसंपन्न मन मिळणे अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून ती विद्या सुद्धा अत्यंत गुह्य आणि दुर्लभ आहे.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–