Tuesday, February 22, 2022

दैवावर मात | Overcoming the Fate

 



श्रीवसिष्ठ मुनि सांगतात की, या वर्तमान जन्मामध्ये मनुष्याने जर विशेष प्रयत्न केला, दृढ अभ्यास, विवेक आणि उत्साह यांनी युक्त होऊन सातत्याने पुरुषार्थ केला तर मनुष्य आपल्या मागच्या जन्मातील दैवही नाहीसे करू शकतो.  जेथे मेरू पर्वत सुद्धा नष्ट करता येतो, तेथे प्राक्तनाची काय कथा ?  बलवान पुरुषार्थ दैवावर मात करू शकतो, असेच येथे वसिष्ठांना सूचित करावयाचे आहे.

 

वस्तुतः नियमाप्रमाणे दैव बदलणे कोणालाही शक्य नाही.  पण तरीही वसिष्ठांनी येथे असे सांगितले असेल तर त्यामागे काही अर्थ आहे.  आपल्या जीवनात काही वेळेस खूप वाईट प्रसंग आले तर आपण 'दैव' म्हणून निराश होतो.  एकामागून एक प्रतिकूल प्रसंग आले, सगळ्या बाजूंनी विरोध व संकटेच दिसायला लागली की, मनुष्याचे धैर्य खचते.  "माझे नशीबच वाईट" असे म्हणून तो निष्क्रीय व्हायला लागतो.  पुरुषार्थाचा, प्रयत्नांचा त्याग करतो.  स्वस्थ बसून राहतो.  त्यामुळे वर्तमान पुरुषार्थाचा त्याग केल्यामुळे त्याचे भविष्यकाळातील प्रारब्धही नीट घडू शकत नाही.

 

अशा निष्क्रीय बनलेल्या मनुष्याला वसिष्ठ मुनि येथे चेतावणी देतात आणि सांगतात की, अरे !  आताचे दैव कितीही भयंकर असेल तरी एका बाजूला ते भोगत असताना दुसऱ्या बाजूला तुझ्या हातात वर्तमानकाळाचा पुरुषार्थ आहे.  तू ऊठ, दृढ अभ्यास कर, योग्यायोग्याचा विचार कर आणि उत्साहाने सत्कर्मामध्ये प्रवृत्त हो.  कारण सत्कर्म तुझे भवितव्य उज्ज्वल करणार आहे.  तुझे कर्म तू इतके उत्कृष्ठ आणि उदात्त कर की, त्यापुढे आत्ताचे वाईट प्रारब्धही निष्प्रभ ठरावे !

 

आत्ता उत्तम पुरुषार्थ करून वाईट प्रारब्धाचा प्रभाव नष्ट करण्यास मनुष्य समर्थ आहे.  या जगात अशक्य असे काहीच नाही.  मेरू पर्वतासारखा महाकाय पर्वतही मनुष्याने ठरविले तर मुळासकट उपटून टाकता येतो.  त्यामुळे वाईट दैवाचा म्हणजे वाईट दैवाच्या प्रभावाचा नाश आत्ताच्या उत्तम पुरुषार्थाने करता येतो.  यामध्ये कोणताही संदेह नाही.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, February 15, 2022

दर्पण आणि दृश्य नगरी | Mirror And the City

 



ज्ञानाचे स्वरूप आचार्य स्पष्ट करतात –

विश्वं दर्पणदृश्यमाननगरीतुल्यं निजान्तर्गतम्

पश्यन्नात्मनि मायया बहिरिवोद्भूतं यथा निद्रया |

यः साक्षात्कुरुते प्रबोधसमये स्वात्मानमेवाद्वयं

तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये ||                  (श्रीदक्षिणामूर्ति स्तोत्रम्)

 

ज्याप्रमाने आरशामध्ये एखादी नगरी प्रतिबिंबरूपाने भासते, त्याप्रमाणे हे सर्व विश्व आणि भूतमात्रे प्रत्यगात्मस्वरूप असलेल्या ब्रह्मस्वरूपामध्ये भासते, प्रचीतीला येते.  नगरी आरशाच्या आत अस्तित्वामध्ये आहे असे वाटते.  परंतु जर अवलोकन केले तर प्रत्यक्षामध्ये नगरी सत्तारूपाने अस्तित्वामध्ये नसतेच.  ती फक्त प्रतिबिंबरूपाने भासते.  म्हणजेच त्या नगरीला स्वतंत्रपणे स्वतःची सत्ता नसते.  तर ती भासते म्हणून नगरी आहे असे म्हणावयाचे.  यामुळे आरशाच्या अधिष्ठानामुळे नगरीचा भास होतो.

 

याचाच अर्थ नगरी कल्पित आहे.  नगरीच्या नाम, रूप, गुण, धर्म, विकार वगैरेंनी अधिष्ठानस्वरूप असलेला आरसा कधीही लिप्त, स्पर्शित किंवा परिणामी होत नाही.  तर तो नित्य अलिप्त, असंग, अस्पर्शित, अविकारी स्वरूपामध्येच राहातो.  परंतु याही पुढे विचार चालू ठेवला तर कळते की, नगरी ही नाहीच.  फक्त आरसाच आहे.  अधिष्ठानरूपी आरशाच्या दृष्टीने पाहिले तर नगरी नाहीच.

 

हे सर्व दृक्-दृष्यात्मक इंद्रियगोचर भासणारे विश्व बाहेर नसून कूटस्थ, असंग, चिद्रूप, साक्षीचैतन्यामध्येच आहे.  द्रष्टा चैतन्यामध्येच आहे आणि दृश्य सुद्धा चैतन्यामध्येच आहे.  म्हणून प्रत्यगात्मस्वरूप असणाऱ्या आत्मचैतन्याच्या दृष्टीने पाहिले तर दृक् आणि दृष्याला स्वतःची स्वतंत्र सत्ता नसून या दोघांनाही परब्रह्माची सत्ता आहे.  त्यामुळे सर्व विश्व परब्रह्माच्या सत्तेमध्ये प्रतिबिंबरूपाने प्रचीतीला येते.  म्हणून विश्व भासात्मक असून परब्रह्मापासून ते भिन्न नाही, दूर नाही किंवा बाहेरही नाही.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, February 8, 2022

मिथ्यात्वदृष्टि | Futility Perspective

 



सदेहमुक्ति असो किंवा विदेहमुक्ति असो, यापैकी कोणतीही मुक्ति विषयांच्यापासून प्राप्त होत नाही. त्यामुळे जर कोणी म्हणेल की, आम्हाला भोगही पाहिजेत आणि मोक्षही पाहिजे, तर ते शक्य नाही. विषयांच्या त्यागानेच मोक्ष प्राप्त होतो. परंतु अज्ञानी मनुष्य शब्दस्पर्शादि, स्त्रक्-चंदन-वनितादि विषयांच्यामध्ये रस घेऊन ते उपभोगत असतो. जसे आपण आंब्याच्या रसाचा स्वाद घेऊन रस चाखतो, तसेच वैषयिक मनुष्य विषयोपभोगांचा आस्वाद घेत असतो. याचे कारण तो विषयांना सत्यत्व आणि महत्त्व देतो. विषयांच्याशिवाय तो जगू शकत नाही. त्यामुळे विषय व उपभोग हेच त्याचे जीवन बनते.

 

परंतु ज्ञानी पुरुष मात्र विषयांना सत्यत्व देत नसल्यामुळे तो विषयांचा आस्वाद घेण्यामध्ये रममाण होत नाही. विषयांना सत्यत्वच दिले नाही तर त्यामध्ये भोगवासना निर्माण होऊ शकत नाही. जसे आपणास कोणी सांगितले की, "वाटीमध्ये बासुंदी ठेवली आहे," अशी कल्पना करा आणि तिचा आस्वाद घ्या. अशा वेळी आस्वाद तर फार दूरच! परंतु ती वाटी हातात घेण्यामध्ये सुद्धा आपली प्रवृत्ति होत नाही. कारण ती बासुंदी मिथ्या-खोटी आहे, हे आपणास नक्की माहीत असते. किंवा स्वप्नामध्ये प्राप्त झालेल्या संपत्तीने, जागृत झाल्यावर आपण हुरळून जात नाही. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष या सर्व दृश्य विषयांच्याकडे मिथ्यात्वदृष्टीने पाहत असल्यामुळे विषय उपभोगण्यामध्ये त्याची प्रवृत्तिच होत नाही. विषय उपभोगण्यात त्याला रस वाटत नाही.

 

म्हणूनच जे दृश्य रूपाने आपण पाहतो ते विश्व मिथ्या आहे. एखाद्या कॅनव्हॉसच्या कापडावर काढलेल्या चित्राप्रमाणे विधात्याने या सृष्टीचे चित्र काढले आहे. त्यामुळे सृष्टीमधील सर्वच गोष्टी चित्राप्रमाणे मिथ्या आहेत. ज्ञानीपुरुष-बाधित अनुवृत्त्या । बाधित अनुवृत्तीने जगतो. बाधित अनुवृत्ति म्हणजेच तो जगतसत्यत्वाचा निरास करून व्यवहार करतो. त्यामुळे विश्व त्याला स्वप्नवत खोटे वाटते. गंधर्वनगरीप्रमाणे विकारयुक्त वाटते. तसेच केळीच्या खुंटाप्रमाणे निःसार वाटते. वाळवंटावरील वाळूवर चमकणाऱ्या पाण्याप्रमाणे अतिशय भासमान वाटते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, February 1, 2022

एकश्लोकी वेदांत | Vedant in One Stanza

 



प्रत्येक वस्तूला प्रकाशमान करण्यासाठी त्या वस्तूपासून अत्यंत भिन्न, विलक्षण स्वरूपाचा दुसरा प्रकाशक आहे.  म्हणून आचार्य शिष्याला प्रश्न विचारतात – (एकश्लोकी वेदांत)

किं ज्योतिस्तव भानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादिकं | स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे |

चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियोदर्शने |  किं तत्राहमतो भवान्परमकं ज्योतिस्तदस्मि प्रभो ||                   

आचार्य या एका श्लोकामध्ये संपूर्ण वेदांताचे सार प्रतिपादित करतात.  जसे, घटाला स्वतःलाच स्वतःची “मी घट आहे” अशी जाणीव नाही, कारण जडत्वात्, अचेतनत्वात् |  सर्व वस्तूंना जाणण्यासाठी अन्य ज्ञात्याचि, प्रकाशकाची आवश्यकता आहे.  विश्वामध्ये सूर्याला सुद्धा पाहण्यासाठी डोळ्यांची आवश्यकता आहे.  इंद्रियांच्या मागे सुद्धा मन आहे आणि मनाच्याही मागे असणारे चैतन्यस्वरूप सर्व कार्यकारणसंघातला, सर्व व्यष्टीला, समष्टीला प्रकाशमान करते.

 

आपण रोज आरती करताना म्हणतो –

न तत्र सूर्यो भाति न चंद्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः |

तमेव भान्तमनुभान्ति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति ||        (कठ. उप. २-२-१५)

सूर्य, चंद्र, तारका, विद्युतशक्ति यापैकी कोणीही तुझे स्वरूप प्रकाशमान करू शकत नाही.  मग हा छोटा अग्नि तुला कसे काय प्रकाशित करू शकेल ?  तुझ्याच कृपेने, अनुग्रहाने, संनिधमात्राने या सर्व प्रकाशकांना प्रकाशमान करण्याची शक्ति प्राप्त होते.  तुझ्याच प्रकाशामध्ये हे सर्व विश्व, चराचर प्रकाशमान होते.

 

हे चैतन्य संपूर्ण समष्टीला, संपूर्ण विश्वाला तर प्रकाशमान करतेच, परंतु तेच चैतन्य प्रत्येक जीवाला म्हणजेच कार्यकारणसंघाताला – शरीर, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार, अज्ञान, म्हणजेच तीन शरीरे – स्थूलशरीर (शरीर आणि पंच कर्मेन्द्रिये), सूक्ष्मशरीर (मन, बुद्धि, चित्त, अहंकार आणि पंच ज्ञानेंद्रिये), कारणशरीर (अज्ञान), पंचकोश – अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, पंचप्राण – प्राण, अपान, व्यान, उदान, समान, तीन अवस्था – जागृत, स्वप्न, सुषुप्ति या सर्वांना प्रकाशमान करते.  तेच चैतन्य समष्टीला आणि व्यष्टीला पूर्णतः प्रकाशमान करते.  म्हणून चैतन्य हे ज्ञान आणि अज्ञान या दोन वृत्तींच्याही अतीत आहे.

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ