सदेहमुक्ति असो किंवा विदेहमुक्ति असो, यापैकी कोणतीही मुक्ति विषयांच्यापासून प्राप्त होत नाही.
त्यामुळे जर कोणी म्हणेल की, आम्हाला भोगही पाहिजेत आणि मोक्षही पाहिजे, तर ते शक्य नाही. विषयांच्या त्यागानेच मोक्ष प्राप्त होतो. परंतु अज्ञानी मनुष्य शब्दस्पर्शादि, स्त्रक्-चंदन-वनितादि विषयांच्यामध्ये रस घेऊन ते उपभोगत असतो. जसे आपण
आंब्याच्या रसाचा स्वाद घेऊन रस चाखतो, तसेच वैषयिक मनुष्य विषयोपभोगांचा आस्वाद घेत असतो. याचे कारण तो विषयांना
सत्यत्व आणि महत्त्व देतो. विषयांच्याशिवाय तो जगू शकत नाही. त्यामुळे विषय व उपभोग हेच त्याचे जीवन बनते.
परंतु ज्ञानी पुरुष मात्र विषयांना
सत्यत्व देत नसल्यामुळे तो विषयांचा आस्वाद घेण्यामध्ये रममाण होत नाही. विषयांना
सत्यत्वच दिले नाही तर त्यामध्ये भोगवासना निर्माण होऊ शकत नाही. जसे आपणास
कोणी सांगितले की, "वाटीमध्ये
बासुंदी ठेवली आहे," अशी
कल्पना करा आणि तिचा आस्वाद घ्या. अशा वेळी आस्वाद तर फार दूरच! परंतु ती वाटी
हातात घेण्यामध्ये सुद्धा आपली प्रवृत्ति होत नाही. कारण ती बासुंदी मिथ्या-खोटी
आहे, हे आपणास नक्की माहीत असते.
किंवा स्वप्नामध्ये प्राप्त झालेल्या संपत्तीने, जागृत झाल्यावर आपण हुरळून जात नाही. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष या सर्व दृश्य
विषयांच्याकडे मिथ्यात्वदृष्टीने पाहत असल्यामुळे विषय उपभोगण्यामध्ये त्याची
प्रवृत्तिच होत नाही. विषय उपभोगण्यात त्याला रस
वाटत नाही.
म्हणूनच जे दृश्य रूपाने आपण पाहतो ते
विश्व मिथ्या आहे. एखाद्या कॅनव्हॉसच्या कापडावर काढलेल्या चित्राप्रमाणे
विधात्याने या सृष्टीचे चित्र काढले आहे. त्यामुळे सृष्टीमधील सर्वच गोष्टी
चित्राप्रमाणे मिथ्या आहेत. ज्ञानीपुरुष-बाधित अनुवृत्त्या । बाधित अनुवृत्तीने
जगतो. बाधित अनुवृत्ति म्हणजेच तो जगतसत्यत्वाचा निरास करून व्यवहार करतो.
त्यामुळे विश्व त्याला स्वप्नवत खोटे वाटते. गंधर्वनगरीप्रमाणे विकारयुक्त वाटते.
तसेच केळीच्या खुंटाप्रमाणे निःसार वाटते. वाळवंटावरील वाळूवर चमकणाऱ्या
पाण्याप्रमाणे अतिशय भासमान वाटते.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–