Sunday, January 26, 2020

काळात हरविलेले आयुष्य | Life Lost in Time




कालबद्ध जीवनामध्ये मनुष्य अनेक विषय पाहतो.  त्यामधील काही विषय, काही भोग किंवा काही व्यक्ति त्याला आकर्षित करतात.  त्यामधूनच त्याच्या मनात त्या-त्या विषयांच्या कामना म्हणजेच भोगेच्छा निर्माण होतात.  पैसा मिळविणे, ऐहिक समृद्धी, भरभराट करणे, प्रजोत्पत्ति करणे, मुलांचे संगोपन करणे, त्यांना मोठे करणे, इतकेच आपल्याला आपल्या जीवनाचे इतिकर्तव्य वाटते.  

अध्यात्ममार्गामध्ये थोडीशी आवड निर्माण झाली की, मनुष्य या मार्गामध्ये प्रवेश करतो.  स्वतःला साधक म्हणून घेतो.  शास्त्र ऐकून खूप साधना करावी, खूप जप करावा, खूप भजन पूजन करावे, असे वाटते.  परंतु मनुष्य विचार करतो की, सध्या खूप कामामध्ये व्यस्त आहे.  जरा कामाचा ताण कमी झाला की, आपण साधना करू. सध्या नोकरी आहे.  रिटायर झालो की, साधना करू.  कोणी-कोणी तर खास साधनेसाठी लवकरच रिटायर होतात.  

मग वाटते मुले खूप लहान आहेत, ती थोडीशी मोठी झाली की साधना करू.  नंतर मुलांचे शिक्षण झाले की करू.  मुलांना नोकरी लागून ते स्थिरस्थावर झाले की मग करू. नंतर मग वाटते, आता बास् !  शेवटचे कर्तव्य शिल्लक आहे.  मुलांचे विवाह पार पडले की सुटलो.  मग अध्यात्मच करायचे.  मुलांचे विवाह ही होतात.  घरात सुनबाई येतात.  परंतु मुक्त होण्याऐवजी माणसे त्यावेळी संसारामध्ये जास्तच अडकतात.  मग वाटते की, सूनबाई नवीन आहेत.  त्यांना आपल्या चालीरीति सर्व काही शिकवायला हव्यात.  तोपर्यंत नातू येतात.  मग तर ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अगदी व्यस्त होऊन जाते.  मग तो साधक म्हणतो की, आता नातवांना सांभाळणे हेच आमचे कर्तव्य आहे.  बस्स !  तिथेच साधना संपते.  साधनेचा संकल्प संपतो.  

आपल्याला वाटते की, ही सर्व व्यावहारिक कर्तव्ये पूर्ण करणे, इतकेच आपले जीवन आहे.  परंतु ही सर्व कर्तव्ये पूर्ण करता-करता मनुष्याचे आयुष्य निघून जाते.  मृत्यु समोर येतो, तरी कर्तव्ये संपत नाहीत.  मृत्यु समोर दिसला तरीही मनुष्याच्या इच्छा संपत नाहीत.  एका क्षणामध्ये कालरूपी मृत्यु झडप घालतो व मनुष्याचे जीवन, सर्वस्व हिरावून नेतो.  काळाला दयामाया नसते.  काळामध्ये उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी, लहान-वृद्ध असा कोणताही भेद नसतो.  प्रत्येकाला वेळ आली की काळ गिळंकृत करतो.  



- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ

Tuesday, January 21, 2020

सहा वेदांगे – भाग २ | Six “Vedanga” – Part 2




वेदाध्ययनापूर्वी सहा वेदांगांचे अध्ययन केले जाते.  ही सहा वेदांगे आहेत – शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द, ज्योतिष.  ही सहा वेदांगे प्रत्यक्ष वेदांचा भाग जरी नसतील तरी वेदांना पूरक, साहाय्यकारी असणारा भाग आहे.  

३. व्याकरण – व्याकरणशास्त्र पाणिनि ऋषींनी सांगितलेले आहे.  भाषेमधील प्रत्येक शब्दाचे ज्ञान ज्या शास्त्रामध्ये दिले जाते त्याला “व्याकरण शास्त्र” असे म्हणतात.  कोणताही शब्द नाम, सर्नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रायोगी अव्यय या आठ प्रकारांपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?  हे सांगणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण शास्त्र होय.  त्या शब्दाचा प्रकार समजल्यानंतर त्यानुसार विभक्ति, वचन, काळ वगैरे सांगणारे शास्त्र म्हणजेच व्याकरणशास्त्र होय.  

४. निरुक्त – निरुक्त हे शास्त्र यास्क मुनींनी रचलेले आहे.  शास्त्रामध्ये प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ति सांगितली जाते.  निरुक्त म्हणजेच कोणताही शब्द कसा निर्माण झाला ?  हे सांगणारे शास्त्र.  म्हणून संस्कृतमध्ये कोणताही शब्द निरर्थक नाही, अर्थपूर्ण आहे.  उदा. कृष्णः – कर्षति आकर्षति इति कृष्णः |  जो सर्व जीवांना आकर्षित करतो, तो कृष्ण होय.  

५. छन्द – हे शास्त्र पिंगलाचार्यांनी रचलेले आहे.  छन्द म्हणजेच वृत्त होय.  ज्या शास्त्रामध्ये वृत्ताचे ज्ञान दिले जाते, त्यास “छन्दशास्त्र” म्हणतात.  प्रत्येक मंत्राला विशिष्ट वृत्त आहे.  

६. ज्योतिषशास्त्र – हे शास्त्र सूर्याने रचलेले आहे.  ज्यामध्ये ग्रह, तारे, नक्षत्र यांच्या स्वरूपाचे, यांच्या गतीचे ज्ञान दिले जाते.  इतकेच नव्हे, तर या ग्रहांचा एकमेकांच्यावर काय परिणाम होतो ?  त्याच्या गति, त्यांचे वर्णन, सूर्यग्रहण, चंद्रग्रहणादि यांचे ज्ञान दिले जाते.  यालाच “ज्योतिषशास्त्र” असे म्हणतात.  या ग्रहांचा एकमेकांच्यावर तसेच जीवांच्यावर सुद्धा परिणाम होतो.  ज्या विशिष्ट वेळेमध्ये आपण जन्माला येतो, त्यावेळी ग्रहांची जी जी स्थिति असेल, त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो, असे ज्योतिषशास्त्र सांगते.  ज्योतिषामध्ये अ. गणितज्योतिष, ब. फलज्योतिष असे दोन प्रकार आहेत.  

याप्रकारे असे हे चार वेद आणि वेदांची सहा अंगे – शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द आणि ज्योतिष या सर्वांना “अपरा विद्या” असे म्हणतात.  विश्वामधील सर्व प्रकारचे ज्ञान अपरा विद्येमध्ये येते आणि ही सर्व विद्या वेदांच्यामध्येच अंतर्भूत आहे.  


- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ


Tuesday, January 14, 2020

सहा वेदांगे – भाग १ | Six “Vedanga” – Part 1






वेदाध्ययनापूर्वी सहा वेदांगांचे अध्ययन केले जाते.  ही सहा वेदांगे आहेत – शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द, ज्योतिष.  ही सहा वेदांगे प्रत्यक्ष वेदांचा भाग जरी नसतील तरी वेदांना पूरक, साहाय्यकारी असणारा भाग आहे.  

१. शिक्षा – शिक्षा या शास्त्राचे प्रणेते याज्ञवल्क्य ऋषि आहेत.  सुरुवातीला आपण अ आ इ ई वगैरे ‘अ’कारादि ज्या सर्व मात्रा शिकतो, त्या अकारादि मात्रांचा उच्चार कसा करावा ?  याचे ज्ञान देणारे शास्त्र म्हणजेच शिक्षा होय.  कोणतीही भाषा जर शिकायची असेल, तर त्यासाठी शब्द हे प्रमुख साधन आहे.  विश्वामधील कोणतेही ज्ञान मग ते physics असेल, chemistry असेल, काहीही शिकायचे असेल तर शब्द हे त्यासाठी साधन आहेत.  शब्द हे अक्षरांनी बनतात.  म्हणून प्रथम या अक्षरांचा उच्चार कसा करावा ?  हे समजले पाहिजे.  केवळ शब्दाने ज्ञान होत नाही.  तुम्ही तो शब्द कसा उच्चारता ?  यावरच त्या शब्दाचा परिणाम अवलंबून आहे.  

वक्तृत्व हे एक शास्त्र आहे.  एखादा मनुष्य कदाचित खूप विद्वान असेल, परंतु तो उत्कृष्ट वक्ता असेलच असे नाही आणि एखादा मनुष्य उत्कृष्ट वक्ता असेल परंतु तो विद्वान असेलच असे नाही.  वक्तृत्वामध्ये शब्दांचा उच्चार, त्यामधील चढ-उतार, विशिष्ट शब्दांच्यावर दिला जाणारा कमी-अधिक जोर, आवाजामधील बदल याला फार महत्व आहे.  वेदांच्यामध्ये श्रुतींचे उदात्त-अनुदात्त स्वर, ऱ्हस्व उच्चार व दीर्घ उच्चार याचे नियम आहेत.  त्या उच्चारांचा श्रोत्याच्या मनावर परिणाम होत असतो.  म्हणून शब्द कसे उच्चारावेत ?  याला नियम आहेत.  यालाच शब्दोच्चाराचे शास्त्र किंवा शिक्षा असे म्हणतात.  म्हणून वक्तृत्व ही आधुनिक कला नसून वेदाध्ययन करण्यासाठी साहाय्यकारी असणारे सर्वप्रथम प्रमुख साधन आहे.  

२. कल्प – हे कात्यायन ऋषींनी सांगितलेले शास्त्र आहे.  या शास्त्रामध्ये यज्ञयागादि सर्व क्रियांचे ज्ञान दिले जाते.  यज्ञ कसा करावा ?  पूजा कशी करावी ?  यज्ञाची सामग्री काय काय आहे ?  वैदिक क्रिया कोणत्या विशिष्ट क्रमाने करावी ?  या सर्वांचे शास्त्र म्हणजेच कल्पशास्त्र होय.  म्हणुनच कोणत्याही वैदिक क्रियेला विशिष्ट नियम, विशिष्ट क्रम आहेत.  


- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ

Tuesday, January 7, 2020

गुरु शिष्य घडवितात | Guru Sculpts Disciple




गुरुंच्याकडे गेल्यानंतर गुरु शिष्यावर संस्कार करतात.  ज्याप्रमाणे शिल्पकार दगडामधून मूर्ति घडवितो, तसेच गुरु शिष्याला घडविण्याचा प्रयत्न करतात.  यासाठी शिष्याने गुरूंना पूर्ण भावाने शरण गेले पाहिजे.  याविषयी एक सुंदर कथा आहे.  

एक हनुमंताचे मंदिर असते.  त्या मंदिरामधील उंबऱ्याचा असणारा दगड हनुमंताशी बोलू लागतो.  “हे हनुमंता !  मला एक शंका आहे.  मला तुझा फार द्वेष वाटतो.”  हनुमान म्हणतो, “का रे बाबा ?  तुला माझा द्वेष का वाटतो ?”  त्यावेळी उंबऱ्याचा दगड म्हणतो, “हनुमंता !  अरे, तू आणि मी एकाच खाणीमध्ये रहात होतो.  तू सुद्धा एक दगड आणि मी देखील एक दगड आहे.  परंतु मी रोज पाहतो, या मंदिरामध्ये सर्व लोक तुझ्या डोक्यावर अखंडपणाने फुले वाहतात, पाणी वाहतात, तुला नमस्कार करतात, तुझ्या पायांवर डोके ठेवतात आणि तेच लोक माझ्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जातात.  असे का ?”  

यावर हनुमान उत्तर देतो – “ तुझे अगदी बरोबर आहे, पण खरं सांगू का ?  खरं तर तूच हनुमान होणार होतास.  शिल्पकाराने तुलाच हातात घेतले होते.  परंतु शिल्पकाराने पहिला घाव घातला आणि तुझे तुकडे-तुकडे झाले.  त्यामुळे तुला नाईलाजास्तव उंबऱ्याचा आकार द्यावा लागला.  नंतर त्या शिल्पकाराने मला हातात घेतले, माझ्यावर अनेक छोटे-मोठे कठीण घाव घातले.  मी ते सहन केले.  म्हणून आज मी मूर्ति झालो, लोक मला नमस्कार करतात.  बस्स !  एवढाच तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे.”  

म्हणून तात्पर्य एकच !  साधकाने गुरूंना अनन्य भावाने शरण जावे.  म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये “शिष्याला शिकविणे” हे वाक्य नसून “शिष्याला घडविणे” हे वाक्य आहे.  गुरु शिष्याला अंतर्बाह्य बदलवितात.  संत ज्ञानेश्वर सुंदर सांगतात –
हृदया हृदय येक जालों | ये हृदयींचें ते हृदयीं घातलें |           (ज्ञानेश्वरी)
गुरु आणि शिष्य यांचे हृदय एक झाले पाहिजे, तरच गुरु त्यांच्या हृदयामधील ज्ञानामृत शिष्याच्या हृदयामध्ये प्रदान करू शकतात.  ते ज्ञान, ती अनुभूति जर शिष्याला द्यावयाची असेल, तर शिष्याचे मन सुद्धा तितके तयार पाहिजे.  ज्ञानासाठी पाया भक्कम पाहिजे. 



- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ