गुरुंच्याकडे
गेल्यानंतर गुरु शिष्यावर संस्कार करतात. ज्याप्रमाणे
शिल्पकार दगडामधून मूर्ति घडवितो, तसेच गुरु शिष्याला घडविण्याचा प्रयत्न करतात. यासाठी शिष्याने गुरूंना पूर्ण भावाने शरण गेले
पाहिजे. याविषयी एक सुंदर कथा आहे.
एक
हनुमंताचे मंदिर असते. त्या मंदिरामधील
उंबऱ्याचा असणारा दगड हनुमंताशी बोलू लागतो. “हे हनुमंता ! मला एक शंका आहे. मला तुझा फार द्वेष वाटतो.” हनुमान म्हणतो, “का रे बाबा ? तुला माझा द्वेष का वाटतो ?” त्यावेळी उंबऱ्याचा दगड म्हणतो, “हनुमंता ! अरे, तू आणि मी एकाच खाणीमध्ये रहात होतो. तू सुद्धा एक दगड आणि मी देखील एक दगड आहे. परंतु मी रोज पाहतो, या मंदिरामध्ये सर्व लोक
तुझ्या डोक्यावर अखंडपणाने फुले वाहतात, पाणी वाहतात, तुला नमस्कार करतात, तुझ्या
पायांवर डोके ठेवतात आणि तेच लोक माझ्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जातात. असे का ?”
यावर
हनुमान उत्तर देतो – “ तुझे अगदी बरोबर आहे, पण खरं सांगू का ? खरं तर तूच हनुमान होणार होतास. शिल्पकाराने तुलाच हातात घेतले होते. परंतु शिल्पकाराने पहिला घाव घातला आणि तुझे
तुकडे-तुकडे झाले. त्यामुळे तुला
नाईलाजास्तव उंबऱ्याचा आकार द्यावा लागला. नंतर त्या शिल्पकाराने मला
हातात घेतले, माझ्यावर अनेक छोटे-मोठे कठीण घाव घातले. मी ते सहन केले. म्हणून आज मी मूर्ति झालो, लोक मला नमस्कार
करतात. बस्स ! एवढाच तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे.”
म्हणून
तात्पर्य एकच ! साधकाने गुरूंना अनन्य
भावाने शरण जावे. म्हणूनच आपल्या
शास्त्रामध्ये “शिष्याला शिकविणे” हे वाक्य नसून “शिष्याला घडविणे” हे वाक्य आहे. गुरु शिष्याला अंतर्बाह्य बदलवितात. संत ज्ञानेश्वर सुंदर सांगतात –
हृदया हृदय
येक जालों | ये हृदयींचें ते हृदयीं घातलें | (ज्ञानेश्वरी)
गुरु
आणि शिष्य यांचे हृदय एक झाले पाहिजे, तरच गुरु त्यांच्या हृदयामधील ज्ञानामृत
शिष्याच्या हृदयामध्ये प्रदान करू शकतात. ते
ज्ञान, ती अनुभूति जर शिष्याला द्यावयाची असेल, तर शिष्याचे मन सुद्धा तितके तयार
पाहिजे. ज्ञानासाठी पाया
भक्कम पाहिजे.
- "मुण्डकोपनिषत् " या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति,मार्च
२००७
- Reference: "Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007
- Reference: "Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007
-
हरी ॐ–
No comments:
Post a Comment