Tuesday, March 17, 2020

सुषुप्तीमधील आनंद | Bliss in Deep Sleep




सुषुप्तीमधील आनंद कसा आहे ?  आचार्य येथे दृष्टांत देतात.  ज्याप्रमाणे आपण व्यवहारात पाहतो की, एखादा मनुष्य आयासरहित, निरायास, काहीही कष्ट, परिश्रम न करता बसत असेल तर आपण त्याच्याविषयी बोलतो की, “व्वा !  काय छान बसला आहे.  याला काही काम नाही.  कष्ट नाहीत.  परिश्रम नाहीत.  सुखी प्राणी आहे !”  याचप्रमाणे सुषुप्ति अवस्था अनुभवणारा जीव हा आयासरहित, दुःखरहित असल्यामुळे त्याला येथे आनंदभुक्, ‘आनंदाचा भोक्ता’ असे म्हटले आहे.  

गाढ सुषुप्ति अवस्थेमध्ये प्रत्येकाला सुखाचा – आनंदाचा अनुभव येतो.  म्हणून तरी प्रत्येक मनुष्य दिवसभर खूप दमला, थकला, वैतागला की, आपण केव्हा झोपायला जाऊ, असे त्याला वाटते.  आपल्या शरीराला, मनाला, बुद्धीला खूप श्रम झाले की, आपण झोपेचा मार्ग स्वीकारतो.  सहज झोप येत नसेल तर झोपेची गोळी खातो किंवा पोट भर जेवतो.  शरीर सुंद झाले की, मन ही क्रमाने सुंद होते व आपल्याला गाढ झोप लागते.  सकाळी झोपेमधून उठलो की आपण म्हणतो – “मला खूप छान झोप लागली होती.  मी सुखाने झोपलो होतो.”  

यावरून सिद्ध होते की, सुषुप्ति अवस्थेमध्ये जीवाला आयास नसतात.  म्हणूनच तेथे जीव सुख भोगतो.  निद्रा संपवून जागृतावस्थेत येताक्षणीच मात्र द्वैतव्यवहार, मनाचे व्यापार प्रारंभ झाल्यामुळे जीवाला पुन्हा संसाराची, दुःखांची प्रचीति येऊ लागते.  जागृति व स्वप्न संपल्यानंतर जीव पुन्हा सुषुप्ति अवस्थेमध्ये जाऊन तेथे आनंदाचा भोक्ता होतो.  तोच या जीवाचा श्रेष्ठ आनंद आहे.  म्हणून प्रत्येक जीव झोपेवर प्रेम करतो.  

सुषुप्ति अनुभवणारा प्रज्ञानघन हा आनंदमय असेल तरी तो आनंदस्वरूप मात्र नाही, कारण हा आनंद स्वस्वरूपाचा, निरतिशय आनंद नाही.  तर ती अज्ञानाची अवस्था असून तेथे दुःखांचा अनुभव नाही.  म्हणून केवळ त्या अवस्थेला ‘आनंदमय’ म्हटले आहे, इतकेच !  गाढ निद्रेमधील आनंद हा आत्यंतिक निरतिशय होऊ शकत नाही.  



- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ


Tuesday, March 10, 2020

आत्म्याची चतुष्पाद कल्पना | 4-Parts Consciousness Model




साधकाला साध्य प्राप्त करावयाचे असेल तर योग्य साधनाची आवश्यकता आहे.  साधनं विना साध्यं न सिध्यति |  साधनाशिवाय साध्याची प्राप्ति होत नाही.  असा न्याय आहे.  म्हणून प्रत्येक साधकाला आपल्याला काय मिळवायचे आहे, ते साध्य प्रथम स्पष्टपणे समजले पाहिजे.  तसेच, आपले इच्छित साध्य प्राप्त करण्यासाठी योग्य साधन काय आहे, हेही समजले पाहिजे.  हे साध्य व साधन सांगण्यासाठीच श्रुति येथे आत्म्याचे चार चरण सांगत आहे.  

आत्मस्वरूपाच्या चार पायांपैकी पहिले – विश्व, तैजस, प्राज्ञ हे तीन पाय उपायभूत साधन असून चवथा पाय तुरीय पाद हा उपेयभूत म्हणजेच साध्य आहे.  साधन हे साध्यानुरूपच असले पाहिजे.  म्हणुनच तीन पाद हे साधन व चतुर्थ पाद हा साध्य आत्मा अशी चतुष्पादांची कल्पना श्रुतीने केली.  म्हणून विश्व – तैजस् – प्राज्ञ हे साधन झाले व तुरीय आत्मा हा साध्य झाला.  त्यांच्यामध्ये साधन-साध्य किंवा उपाय-उपेय भाव निर्माण झाला.  

वास्तविक पाहता आत्मा हे कोणत्याही साधनांचे साध्य होऊ शकत नाही, कारण हा स्वतःच स्वयंसिद्ध आहे.  आत्मा हा आपले स्वतःचेच स्वरूप, प्रत्यगात्म स्वरूप असल्यामुळे त्याला प्राप्त करणेही शक्य नाही किंवा त्याचा त्याग करणेही शक्य नाही.  ‘मी’ ‘मी’ ला प्राप्त करू शकत नाही किंवा ‘मी’ ‘मी’ चा त्यागही करू शकत नाही.  म्हणुनच श्रुति अन्य ठिकाणी सांगते – आत्मा न हेयं न उपादेयम् इति |  ‘मी’ व ‘आत्मस्वरूप’ एकच असल्यामुळे आत्म्याचे ग्रहण किंवा आत्म्याचा त्याग होऊ शकत नाही.  

परंतु तरीही श्रुति अज्ञानी जीवांच्या दृष्टीने सांगते की – आत्मा विजिज्ञासितव्यः |  आत्मस्वरूपाचे ज्ञान घ्यावे.  आत्मप्राप्ति होणे किंवा आत्मज्ञान होणे ही सुद्धा कल्पनाच आहे.  तरीही अज्ञानी जीवांना हे सांगणे योग्य व आवश्यकच आहे.  म्हणूनच येथे श्रुतीने सांगितले की, आत्मा हा उपेय-साध्य आहे व तीन पाद हे उपेय-साधनभूत आहेत.  म्हणून श्रुतीने केलेली ही चतुष्पादाची कल्पना विरुद्ध किंवा अयोग्य नाही.  चतुष्पादाच्या कल्पनेमुळे आत्मस्वरूपामध्ये कोणताही विकार, परिणाम होत नाही.  तर आत्मस्वरूप हे नित्य, शुद्ध, अलिप्त-अस्पर्शित-अपरिणामी, साध्य-साधनरहित, उपेय-उपायरहित, निर्विकार स्वरूपाने राहते.



- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ


Tuesday, March 3, 2020

आत्म्याच्या चतुष्पादाची आवश्यकता | Need of 4-Parts Consciousness Model






श्रुतीने आत्म्यामध्ये चार पायांची कल्पना केलेली आहे.  आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होण्यासाठी आत्म्यामध्ये ही अध्यस्त चतुष्पादाची कल्पना करणे आवश्यक आहे, कारण आत्मज्ञान घेणारा जिज्ञासु साधक हा अज्ञानी जीव आहे.  तो संसाराने बद्ध आहे.  यत् दृश्यं तत् सत्यम् |  जे दिसते तेच सत्य, अशी त्याच्या बुद्धीची धारणा आहे.  दृष्यालाच सत्य म्हणण्याची त्याला वर्षानुवर्षे सवय लागली आहे.  असा हा अज्ञानी मनुष्य खरे तर स्वस्वरूपाच्या दृष्टीने, तत्त्वाच्या दृष्टीने स्वतःच सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म स्वरूप आहे.  परंतु त्याच्या बुद्धीवर आत्मअज्ञानाचे आवरण आल्यामुळे त्याला ते स्वरूप आकलन होत नाही.  स्वस्वरूपाची विस्मृति झाल्यामुळे त्याला कधीच आत्मस्वरूपाची अनुभूति सुद्धा येत नाही, कारण ते स्वरूप ग्रहण करण्यासाठी त्याची बुद्धि योग्य, अनुकूल व अधिकारी नाही.  

बहुतांशी जीवांची बुद्धि ही बहिर्मुख असून विषयासक्त, अत्यंत स्थूल–प्राकृत–व्यावहारिक बुद्धि आहे.  विषयांचे, उपभोगांचे चिंतन करण्यातच रममाण झाली आहे.  त्यामुळे त्या बुद्धीला जे दृश्य, सगुण-साकार-सविशेष, नामरूपगुणधर्मांनी युक्त आहे, तेच सहजपणे आकलन होते.  मग अशा अज्ञानी जीवांना एकदम निर्गुण-निर्विशेष स्वरूपाचे ज्ञान ग्रहण करणे शक्य नाही.  त्यांच्यासाठी श्रुति येथे चतुष्पाद आत्म्याची कल्पना करीत आहे.  

श्रुति ही सर्व जीवांची साक्षात् माता आहे.  मातेप्रमाणेच तिला आपल्या मुलांचे हित-अहित समजते.  ही तर श्रुतिमाता आहे.  त्यामुळे ती जीवांच्या परमकल्याणाचा विचार करते.  अज्ञानी, संसारग्रस्त जीव जन्मानुजन्मे असह्य यातना भोगत असतो.  दुःखाने व्याकूळ, अस्वस्थ होतो.  त्रिविध तापांच्यामध्ये होरपळून निघतो.  अशा या भरकटलेल्या, दुःखी जीवांना परमशांतीचा, निरतिशय आनंदाचा मार्ग दाखवून त्यांचे जीवन तृप्त, परिपूर्ण व कृतकृत्य करावे, अशी श्रुतिमातेची इच्छा आहे.  त्यासाठीच ही दयाळू, कृपावंत श्रुति सर्वसामान्य अज्ञानी मनुष्याला, स्थूल-प्राकृत बुद्धीच्या मनुष्याला समजेल, अशा पद्धतीने आत्मतत्त्वाचे वर्णन करीत आहे.  



- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ


Tuesday, February 25, 2020

जागृतावस्थेचे शास्त्र | Science of Awakeness





चैतन्याचे किरण म्हणजेच जीव किंवा चिदाभास होत.  ज्याप्रमाणे, एकाच सूर्याची अनेक बादल्यांच्यामधील पाण्यामध्ये अनेक प्रतिबिंबे निर्माण होतात.  ही प्रतिबिंबे म्हणजे केवळ सूर्याचा भास आहे.  त्याचप्रमाणे, सर्व जीव म्हणजे चैतन्याचे भास, चिदाभास आहेत.  किरणांचा विस्तार म्हणजे चिदाभासांचा विस्तार झालेला आहे.  म्हणजेच चिदाभासांनी सर्व उपाधींना, सर्व शरीरांना व्याप्त केले आहे.  यानंतर त्या चिदाभासांनी स्थिर असणाऱ्या वृक्षादि पदार्थांना व चर असणाऱ्या मनुष्यादि प्राणिमात्रांना, म्हणजेच सर्व जड विषय आणि सर्व मनुष्य-पशू-पक्षी या सर्वांच्या समूहाला व्याप्त केले आहे.  

चिदाभास या सर्वांना वृत्तिरूपाने व्याप्त करतात.  चिदाभास म्हणजेच मनाचे स्पंदन किंवा मनाचे स्फुरण होय.  चिदाभास या मनाच्या वृत्तीच्या साहाय्याने त्या त्या शरीरापर्यंत किंवा विषयापर्यंत जाऊन त्या त्या विषयाशी व शरीराशी तादात्म्य पावतो.  त्या त्या शरीराचे रूप धारण करतो.  तसेच दृश्य विषयांपर्यंत जाऊन त्या-त्या विषयाची विशिष्ठ तदाकार, विषयाकार वृत्ति निर्माण होते.  जितके विषय तितक्या वृत्ति निर्माण होतात.  याप्रमाणे, चिदाभास स्वतः एका शरीराशी तादात्म्य पावून, ती उपाधि धारण करून नंतर घट-पट-वृक्ष-डोंगर-सूर्य-चंद्र-नदी-हत्ती वगैरेदि अशा असंख्य, अगणित विषयांना, पदार्थांच्या समूहाला व्याप्त करतो.  

याप्रमाणे चिदाभासाने शरीर व विषयांना व्याप्त केल्यानंतर चिदाभासाचा शरीर व इंद्रिये यांचा बाह्य दृश्य विषयांशी संबंध येतो.  इंद्रिये व विषय यांचा संनिकर्ष झाला की, त्यामधून सुख-दुःखादि अनुभव निर्माण होतात.  चिदाभासाला हे सर्व सुखदुःखादि संमिश्र अनुभव अनुभवायला येतात.  थोडक्यात, ज्यावेळी चिदाभास स्थूल शरीराशी तादात्म्य पावून इंद्रियांच्या माध्यमामधून स्थूल विषयांचा अनुभव घेतो, त्यास ‘जागृतावस्था’ असे म्हणतात.  या अवस्थेमध्ये मन बाह्य विषयांना जागृत असते.  



- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ

Tuesday, February 18, 2020

अध्यात्मात चालणारा पाखंड | Fakeness in Spiritualism




अध्यात्ममार्गामध्ये प्रवेश केल्यानंतर पुष्कळसे लोक स्वतःच अध्यात्माच्या अनेक कल्पना करतात.  एखादा महात्मा किंवा श्रेष्ठ साधु, संत पाहिले, त्यांना मिळत असलेला मान-सन्मान पाहिला की, असे पूजनीयत्व व आदर आपणासही मिळावा, अशी स्वप्ने ठेवून अध्यात्ममार्ग स्वीकारतात.  साधु झाले की, सर्वजण नमस्कार करतात, बर्फी-पेढे, फळे-फुले समोर आणून ठेवतात, गळ्यात हार घालतात, श्रद्धा ठेवतात, सल्ला ऐकतात.  शिवाय उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटतो.  हिंडायला भक्तांच्या गाड्या मिळतात.  असे सर्व बहिरंग पाहून “ आपणही साधु व्हावे.  व्यवहार जमला नाही.  निदान अध्यात्म करून बघावे.  मग आपल्यालाही सर्वजण नमस्कार करतील.  आपणही दुसऱ्यांच्या समस्या सोडवू व मोठे होऊ ”.  अशी विचित्र व भयंकर स्वप्ने उराशी बाळगून लोक अध्यात्मामध्ये प्रवेश करतात.  

सद्य समाजामध्ये तर अध्यात्मात प्रवेश करणाऱ्या अशा लोकांच्यामध्ये तरुण पिढीचाही समावेश आहे.  दोन-चार आध्यात्मिक पुस्तके वाचून त्यांचे मर्कट वैराग्य उफाळून येते व ही मुले सर्वसंगपरित्याग करण्याची भाषा बोलतात. आध्यात्मिक ज्ञान कशासाठी घ्यावयाचे आहे ?  असे विचारले तर उत्तरही ठरलेले असते की, हे ज्ञान घेऊन समाजाचा, जगाचा उद्धार करावयाचा आहे.  अध्यात्ममार्गाबद्दल अशा खूप चुकीच्या कल्पना करून लोक बहिरंगाने जीवनामध्ये खूप बदल करतात.  परंतु त्यांच्या अंतरंगामध्ये विषयांच्या अनेक कामना व भोगवासना दडलेल्या असतात.  

या मानसन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या वासना स्वकर्तृत्वाने व्यावहारिक जीवनामध्ये त्यांना पूर्ण करता आल्या नाहीत तर असे लोक स्वार्थाने, अहंकाराने प्रेरित होऊन अध्यात्ममार्गामध्ये प्रवेश करतात व दांभिकतेचा आश्रय घेतात.  समाजाला फसवितात.  सामान्य, श्रद्धावान लोकांना फसवितात.  स्वतः साधक आहे, ब्रह्मचारी आहे, साधु आहे, असे भासवितात.  

परंतु दुर्दैवाने हे लोक सर्वात जास्त स्वतःलाच फसवीत असतात.  स्वतःचीच प्रतारणा करीत असतात.  बाहेरून रामनामाचा महिमा जगाला सांगतात.  हातात रुद्राक्षाची माळ धरतात.  परंतु त्यांचे स्वतःचे मन मात्र रामनामामध्ये तल्लीन, तन्मय होत नाही.  त्यांचे मन भोग, विषयासक्ति, अनेक विचार यांनी कलुषित, अशुद्ध असते.  यामुळे बहिरंगाने अध्यात्माचे आचरण करूनही अशा दांभिक पुरुषाला सुख व शांतीचा अनुभव येत नाही.  



- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ

Tuesday, February 11, 2020

गर्व आणि वस्तुस्थिति | False Pride & Reality




अभिमानाने प्रेरित झालेले जीवन जगत असताना जोपर्यंत सर्व सुरळीत चालते, सर्वकाही मनाप्रमाणे घडते, तोपर्यंत मनुष्याचा अहंकार, गर्व वाढतच जातो.  परंतु जेव्हा विपरीत घडायला लागते, अपेक्षाभंग होतो, तेव्हा मात्र मनुष्य उद्विग्न होतो.  आपण ठरवितो एक व घडते मात्र निराळेच !  नियतीने काहीतरी वेगळे ठरविले असते.  आपल्या मनाप्रमाणे फार क्वचितच घडते.  परंतु बाकी पुष्कळ वेळेला जीवन अपेक्षेपेक्षा वेगळेच दिसते.  आपण प्रयत्न करतो.  परिश्रम करतो.  परंतु त्याचे फळ विपरीत मिळते.  जीवनामध्ये असे संकटांचे प्रसंग एकामागून एक येत राहतात.  

अशा वेळी विचारी मनुष्य विचार करतो की, माझ्या जीवनात कोणतीतरी एक अज्ञात शक्ति आहे की, जी माझ्या जीवनावर नियमन करते.  म्हणूनच संकट आले की बुद्धिमान, नास्तिक माणसे सुद्धा ज्योतिषाकडे जातात.  आजकाल तरुण पिढीसुद्धा त्या अदृश्य, अज्ञान, अनाकलनीय शक्तीचे अस्तित्व मान्य करते.  ज्यावेळी मनुष्य जीवन जगतो, अनेक अपेक्षा करतो तेव्हा त्याने ईश्वरी सत्तेची जाणीव ठेवली पाहिजे.  संपूर्ण विश्वावर, सर्व प्राणिमात्रांच्यावर तसेच माझ्याही जीवनावर नियमन करणारी कोणीतरी एक अज्ञात शक्ति आहे, हे मान्य करावेच लागते.  आचार्य म्हणतात – “हे मनुष्या !  तू व्यर्थ चिंता का करतोस ?  या विश्वात तू मुख्य नाहीस.  तुझ्यावर नियमन करणारे कोणी नाही, असे तुला वाटते का ?  तू कोणत्या गर्वाने उन्मत्त झाला आहेस ?  थोडासा विचार कर.”  

ज्या परमेश्वराने या विश्वाला निर्माण केले, ज्याने सर्वांना जन्म दिला, तोच विश्वाची काळजी घेतो.  तोच विश्वाचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता आहे.  तोच विश्वाचे पालन-पोषण-वर्धन करतो.  तोच विश्वंभर आहे.  त्याच्याशिवाय झाडाचे पानही हालत नाही.  त्याच्याशिवाय पापण्यांची उघडझापही होऊ शकत नाही.  त्यानेच आपल्या सर्वांना जन्माला घातले.  जन्मल्यापासून या क्षणापर्यंत त्यानेच आपल्याला अन्न दिले, पाणी दिले, राहायला आकाश दिले, जिवंत राहण्यासाठी प्राणवायू दिला, आपल्याला इतकी सुंदर सृष्टि दिली.  त्याने वरून कधी याची बिले पाठविली नाहीत.  आपण कधीतरी विचार करतो का की, त्याची कृपा, करुणा किती अपरंपार आहे.  तो करुणेचा सागर आहे.  त्याच्या दयेला सीमा नाहीत.  त्याने निर्माण केलेल्या या जगड्व्याळ विश्वामध्ये माझे अस्तित्व अगदीच नगण्य आहे.  आपण एक यःकश्चित् क्षुद्र जीव आहोत.  अथांग सागरामधील एखाद्या थेंबाप्रमाणे आहोत.   



- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ

Tuesday, February 4, 2020

नाण्याची दुसरी बाजू | Other Side of the Coin




काम एष क्रोध एषः रजोगुणसमुद्भवः |
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिहवैरिणम् ||              (गीता अ. ३-३७)   

“हे अर्जुना ! महाखादाड असणारा काम व महापापी असणारा क्रोध हे रजोगुणामधून निर्माण झालेले असून तेच मनुष्याचे खरे शत्रू आहेत.” कामनाच मनुष्याला सतत अतृप्त व अशांत ठेवून अनेक प्रकारच्या चांगल्या-वाईट कर्मामध्ये प्रवृत्त करते. कामनापूर्तीमध्ये एखादा प्रतिबंध आला तर त्याच कामनेचे रूपांतर क्रोधामध्ये होऊन मनुष्याचे मन क्रोधाविष्ट, संतप्त व उद्विग्न होते. याप्रकारे रागद्वेष, कामक्रोधादि विकार यामुळे मनुष्याचे जीवन उध्वस्त व अधःपतित होते. यासाठीच मनुष्याने विचार करणे आवश्यक आहे. ज्या विषयांमुळे मनामध्ये कामना व अन्य सर्व विकार निर्माण होतात, त्या विषयाचे खरे, वास्तविक स्वरूप काय आहे, याचा निरपेक्ष विचार करावा.

ज्याप्रमाणे आपण व्यवहारात म्हणतो की, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आपल्याला दिसताना एकच बाजू दिसते. दुसरी बाजू नेहमीच अदृश्य असते. त्याचप्रमाणे खरे तर सर्व दृश्य विषयांना दोन बाजू आहेत. परंतु व्यवहारामध्ये आपण विषयांची सतत व सहजपणे डोळ्यांना समोर दिसणारी एकच बाजू पाहतो व ती बाजू म्हणजेच विषयांचे सौंदर्य, आकर्षण व मोहकात्व ! बाह्य सौंदर्यालाच आपण भुलतो व सुखासाठी विषयांच्या मागे धावतो.

परंतु, विवेकी पुरुषाने विवेकाच्या साहाय्याने विषयांची बाजू म्हणजेच विषयांचे दोष, मर्यादा जाणणे आवश्यक आहे. विषयांच्यामध्ये प्रामुख्याने – अनित्यत्व, दुःखित्व, बद्धत्व व मिथ्यात्व असे चार प्रकारचे दोष आहेत. हे दोष जाणणे यालाच ‘विषयदोषदर्शन’ असे म्हणतात. शास्त्रामध्ये विषयदोषदर्शन हा शाब्दिक अभ्यास नसून एक फार मोठी अंतरिक साधना आहे. साधकाने याचा सखोल विचार करावा. विषयदोषदर्शन हा आचार्यांच्या ‘भज गोविन्दम् | या ग्रंथाचा प्रमुख विषय आहे. कारण विषयांच्यामधील दोष समजले तर मनुष्य आपोआपच त्यामधून निवृत्त होऊ शकतो.  



- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ