Friday, January 26, 2018

मंगलाचरणाचे प्रयोजन - २ | Necessity of Invocation Prayer - 2



मंगलाचरण दोघांनी मिळून करण्याचा गुरु-शिष्य संप्रदायाचा एक पहिला आणि प्रमुख शिष्टाचार मानला जातो.  हे ज्ञान ग्रहण करीत असताना ज्ञानाच्या सिद्धीसाठी अहंकार हा प्रतिबंध आहे.  अहंकाराचा निरास करण्यासाठी विद्येच्या प्रारंभी मंगलाचरण केले जाते.  वस्तुतः बुद्धि हे ज्ञानाचे साधन आहे. बुद्धीने मी ज्ञान प्राप्त करतो.  बुद्धीने केवळ व्यावहारिक ज्ञान होते, परंतु आत्मज्ञानामध्ये बुद्धीबरोबरच एक अत्यंत उदात्त, भव्य दिव्य आणि सुंदर असणारे मन आवश्यक आहे.  बुद्धीच्या निकषावर मीमांसा करून, तौलनिक अभ्यास करून कदाचित शाब्दिक ज्ञान प्राप्त करता येईल, परंतु या ज्ञानामध्ये सूक्ष्म व एकाग्र बुद्धिबरोबरच एक अत्यंत प्रगल्भ, परिपक्व, दैवीगुणसंपन्न मन आवश्यक आहे.  

मानित्वाचा अभाव, दंभित्वाचा अभाव, अहिंसा, क्षमाशीलता, ऋजुता, आचार्योपासना, शुद्धि, स्थिरता, स्वतःवर नियमन, इंद्रियांच्या विषयांच्यामध्ये वैराग्य, अहंकाराचा अभाव, जन्म-मृत्यु-जरा-व्याधि यांच्यामध्ये दुःख व दोष पाहणे, पुत्र-दारा-गृह यांच्यामधील आसक्तीचा व ममत्वाचा त्याग, इष्टानिष्ट प्रसंगांच्यामध्ये चित्ताची समतोल स्थिति, परमेश्वरामध्ये अनन्य, अव्यभिचारिणी भक्ति, एकांतवासाचे सेवन, जनसमूहामध्ये रममाण न होणे, अध्यात्मज्ञानामध्ये नित्यत्व आणि तत्त्वज्ञानाच्या अर्थाचे दर्शन हे सर्व ज्ञान आहे आणि याव्यतिरिक्त सर्व अज्ञान आहे.  

श्रद्धावान साधकालाच ज्ञान प्राप्त होते.  विद्याध्ययन करण्यासाठी गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये एक संबंध, एक नाते, गुरुभाव निर्माण झाला पाहिजे.  त्याशिवाय शास्त्राचे रहस्य समजत नाही.  बुद्धीने ज्ञान घेतले, युक्तिवाद समजला, न्यायशास्त्र समजले परंतु मनामध्ये गुरूंच्या, शास्त्राच्या बद्दल जर शंका, विकल्प असतील तर एक विकल्प सुद्धा या ज्ञानाचा ध्वंस करू शकतो.  

मनुष्य कितीही महापापी असेल तरी सुद्धा ज्ञानरूपी नौकेने हा भवसागर पार करता येतो.  मात्र हे शास्त्र शिकण्यासाठी फक्त शुद्ध मनाची आवश्यकता आहे.  यासाठीच गुरु आणि शिष्य मंगलाचरण करतात.  मंगलाचरण हे श्रद्धेचे, समर्पण भावनेचे प्रतिक आहे.

  
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

Tuesday, January 23, 2018

मंगलाचरणाचे प्रयोजन - १ | Necessity of Invocation Prayer - 1



आपल्या जीवनामध्ये भगवंताचे अधिष्ठान असणे अत्यंत आवश्यक आहे.  व्यावहारिक जीवनामध्ये तर आहेच.  परंतु त्याहीपेक्षा साधकाच्या, शिष्याच्या, भक्ताच्या जीवनामध्ये परमेश्वराचे स्थान सर्वोच्च आहे.  ईश्वराच्या अनुग्रहानेच अंतःकरणामध्ये ज्ञानजिज्ञासा उदयाला येते.  या आध्यात्मिक ज्ञानामध्ये सुद्धा जिज्ञासु साधक परमेश्वराला प्रसन्न करवून घेण्यासाठीच, त्याचे आशीर्वाद, कृपा, अनुग्रह प्राप्त करण्यासाठीच परमेश्वराची अनन्य भावाने प्रार्थना करतो.  हीच मनाची खरी सुसंस्कृतता आहे.  ही ज्ञानसाधना अखंडपणाने, सातत्याने होण्यासाठी साधकाला भगवंताचे आशीर्वाद आवश्यक आहेत.  

साधकाच्या मनामध्ये ज्ञानजिज्ञासा उत्पन्न होणे, साधना करण्यासाठी अनुकूल असणारे मनुष्यशरीर प्राप्त होणे, सद्गुरूंची प्राप्ति होणे, शास्त्राचे श्रवण करायला मिळणे ही सर्व त्या भगवंताचीच अनंत व अपार कृपा आहे.  ही कृपा डोळ्यांना दिसत नाही तर विचाराने, बुद्धीने अंतःकरणामध्ये अनुभवायला येते.  

यासाठीच परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी साधक याठिकाणी उपनिषदाचे अध्ययन करण्यापूर्वी मंगलाचरण करतो.  विद्येचा आरंभ करणे हा जीवनामधील सर्वश्रेष्ठ संस्कार मानला जातो.  पूर्वीच्या काळी उपनयन संस्कार झाल्यानंतर गुरुकुलामध्ये विद्येचा श्रीगणेशा केला जात असे.  विद्येचा संस्कार जिव्हाग्रावर केला जातो, कारण जिव्हाग्र हे सरस्वतीचे निवासस्थान आहे.  म्हणूनच साधकाने बोलत असताना सतत याचे भान ठेवावे.  

विद्यारंभ करण्यापूर्वी गुरु आणि शिष्य दोघे मिळून मंगलाचरण करतात, भगवंताचे आवाहन करतात, कारण गुरु जरी आज शिकवीत असतील, तरी ते गुरु सुद्धा एके काळी शिष्य होते.  ते सुद्धा आपल्या गुरूंच्या, शास्त्राच्या प्रति आदर दर्शविण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी मंगलाचरण करून स्वतःच्या गुरुपरंपरेचे स्मरण करतात.  

  
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

Tuesday, January 16, 2018

ज्ञानाचे स्वरूप | Nature of Knowledge



ज्ञानाचे स्वरूप सांगताना आचार्य दृष्टांत देतात.  ज्याप्रमाणे अंधार सर्व विषयांच्यावर व दृष्टीवर आवरण घालीत असल्यामुळे विषय असूनही दिसत नाहीत.  सर्व विषय अंधारामध्ये लुप्त होतात.  परंतु सूर्योदय झाल्यानंतर मात्र अंधाराचा नाश होऊन अंधारामध्ये असलेले विषय सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशमान होतात.  सूर्यप्रकाशाचे दोन प्रकारचे कार्य आहे – १) अंधाराचा नाश करणे आणि २) अंधारामध्ये असलेल्या विषयांना प्रकाशित करणे.  

त्याचप्रमाणे शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषामध्ये वेदान्तशास्त्राच्या श्रवणमननाने आत्माकार वृत्ति निर्माण होते.  ही वृत्ति अज्ञानवृत्तीचा निरास करते.  या वृत्तीचा विषय निर्गुण, निराकार, निर्विशेष, निरवयव, सच्चिदानंद परब्रह्म असून ते प्रत्यगात्मस्वरूप आहे.  म्हणून ते ज्ञान प्रत्यगात्मस्वरूप असलेल्या परब्रह्माला प्रकाशमान करते.  म्हणजेच अध्यस्त असलेला “मी कर्ता”, “मी भोक्ता”, “मी सुखी”, “मी दुःखी”, “मी जन्म-मृत्युयुक्त” वगैरे सर्व विकल्पांचा निरास होतो आणि जे राहाते ते पूर्णस्वरूप !  “मी स्थूलसूक्ष्मकारण शरीरापासून भिन्न असून पंचकोशातीत आहे.  तसेच जागृतस्वप्नसुषुप्ति या तीन्हीही अवस्थांचा साक्षी असून सच्चिदानन्दस्वरूप आहे”, हे यथार्थ, सम्यक आणि निःसंशय ज्ञान प्राप्त होते.  

याठिकाणी ज्ञानाने अध्यासाची निवृत्ति होऊन संसारनिवृत्ति होते.  निरतिशय आनंदाची प्राप्ति होते.  याचा अर्थ सर्व संसार अज्ञानकल्पित असल्यामुळे मिथ्या स्वरूपाचा आहे.  त्यामुळे मिथ्या संसाराची निवृत्ति करण्यासाठी मिथ्या ज्ञानाची आवश्यकता आहे.  असे ज्ञान अज्ञानाचा निरास करून प्रयोजन संपल्यामुळे ते वृत्तिजन्य ज्ञान सुद्धा विरून जाते.  राहाते ते फक्त अखंड अद्वैतस्वरूप !  म्हणून येथे म्हटले आहे – ज्ञानं तत्परम् प्रकाशयति |  त्यामध्ये मोक्षाची सुद्धा इच्छा गळून पडते.  तीच पूर्णता होय. तेच खरे ज्ञान होय.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Tuesday, January 9, 2018

ज्ञान व अज्ञान कुठे असते? | Where Knowledge and Ignorance Lies?



आत्मज्ञान प्राप्त होते याचा अर्थ असा नाही की, आत्म्याला ज्ञान प्राप्त होते.  आत्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळे आत्म्यामध्ये प्रत्यक्षात ज्ञान नाही किंवा अज्ञानही नाही.  ज्ञान आणि अज्ञान हे बुद्धिनिष्ठ आहे.  त्या बुद्धीच्या अवस्था आहेत.  म्हणूनच ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी आहे, असे म्हटले जाते.  आत्मा अज्ञानाच्या विरोधी नाही.  जर आत्मा अज्ञानाच्या विरोधी आहे असे म्हटले तर आत्मा नित्य असल्यामुळे अज्ञानाचे अस्तित्वच राहाणार नाही आणि त्यामुळे अज्ञानाचा अभाव झाल्यामुळे जीवाला संसारच येणार नाही.  

प्रत्येक जीव जन्मतःच मुक्त होईल.  शास्त्राची, गुरूंची आणि अध्ययनाची गरजच भासणार नाही.  इतकेच नव्हे तर परमपुरुषार्थ सुद्धा नाही, कारण जीव हा जन्मतःच मुक्त होईल.  परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र प्रत्येक जीव आत्मस्वरूपाविषयी अज्ञानी असून संसारी आहे.  याचाच अर्थ आत्मा ज्ञानस्वरूप असूनही जीवाला मात्र अज्ञानाची अनुभूति आहे.  म्हणून हे अज्ञान आत्म्यामध्ये नसून बुद्धीमध्ये आहे, हे सिद्ध होते.  तसेच श्रवण, मनन, निदिध्यासनेच्या अभ्यासाने अंतःकरणामध्ये आत्माकार वृत्ति उदयाला येऊन ती वृत्ति अज्ञानविरोधी असल्यामुळे अज्ञानाचा ध्वंस होऊ शकतो.  

समजा, घट समोर असूनही जर दिसत नसेल तर दोष घटामध्ये नाही दृष्टीमध्ये आहे.  मोतीबिंदु काढून टाकल्यानंतर घटाची साक्षात प्रचीति येते.  येथे आवृत्ति आणि अनावृत्ति घटामध्ये नसून डोळ्यामध्ये आहे.  त्याचप्रमाणे आत्मा स्वयंसिद्ध आणि स्वयंप्रकाशक असल्यामुळे आत्म्याला ज्ञानाची जरुरी नाही.  तर अज्ञान बुद्धीमध्ये असल्यामुळे बुद्धीला आत्मज्ञानाची जरुरी आहे.  

तसेच जर आत्मा अज्ञानी आहे असे मानले तर “मी आहे” हे ज्ञान होणार नाही, कारण अज्ञानस्वरूप आत्म्यामध्ये ज्ञानाची शक्यता नाही.  तसेच अज्ञानाला अज्ञानाची जाणीव किंवा ज्ञान सुद्धा शक्य नाही.  याउलट आत्म्याला अज्ञानाची जाणीव आहे.  यावरून सिद्ध होते की, आत्मा अज्ञानी नसून स्वयंसिद्ध ज्ञानस्वरूप आहे आणि ज्ञान व अज्ञान आत्म्यामध्ये नसून बुद्धीमध्ये आहे.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



                                                                      - हरी ॐ –                  

Tuesday, January 2, 2018

कर्म व उपासानांचे प्रयोजन | Provision of Rituals and Worship



कर्म आणि उपासना अविद्येच्या विरोधी नसल्यामुळे अविद्येचा ध्वंस करू शकत नाही.  ज्याप्रमाणे प्रकाश अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे ज्ञान अज्ञानाच्या विरोधी असल्यामुळे ज्ञानच अज्ञानाचा नाश करते.  यावर अशी शंका येईल की, कर्म व उपासना हे मोक्षाचे साधन नसेल, तर मग त्यांचे प्रयोजन काय ?  ते सर्व निष्फळ आहे का ?  

अंतःकरणामध्ये स्वभावतः तीन प्रकारचे दोष आहेत – १) मल, २) विक्षेप आणि ३) आवरण.  मल म्हणजे अशुद्धता होय.  ती रागद्वेषात्मक असून मनामध्ये अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण करते. त्यामुळे मन सतत अस्वस्थ होते.  विक्षेप म्हणजे चंचलता.  यामध्ये मन सतत एका विषयावरून दुसऱ्या विषयावर भरकटत असते.  अशा मनावर आवर घालणे फार कठीण होते.  त्यामुळे मनाची एकाग्रता नाहीशी होते.  आवरण हे आत्मस्वरूपावर अविद्यात्मक आवरण घालते.  त्यामुळे आत्मा अस्ति किन्तु न भाति |  आत्मा असूनही त्याचे स्वरूप दिसत नाही.  अनुभवाला येत नाही.

हे तीन दोष निवारण करण्यासाठी तीन प्रकारच्या साधना शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत.  अंतःकरणामधील अशुद्धता नाहीशी करण्यासाठी “निष्काम कर्मयोग” हे साधन आहे.  चंचलता नाहीशी करण्यासाठी “उपासना” हे साधन आहे.  आणि अज्ञानरूपी आवरण नाहीसे करण्यासाठी “ज्ञान” ही साधना आहे.  

यावरून समजते की, कर्म आणि उपासना अज्ञानजन्य असेल तरी त्यांचे प्रयोजन अज्ञानध्वंस करून ज्ञानप्राप्ति करून देणे हे नाही, तर रागद्वेषांचा क्षय करून चंचलता नाहीशी करून चित्तशुद्धि आणि मनाची निश्चलता करणे हेच प्रयोजन आहे.  यामुळे अंतःकरणामध्ये विवेकवैराग्य, शामादिसाधनसंपत्तीचा उत्कर्ष होऊन दैवीगुण प्राप्त होतात.  तसेच विषयासक्ति आणि विषयभोगवासना कमी होऊन मन अंतर्मुख, एकाग्र होते.  बाह्य विषयांनी आणि प्रसंगांनी मन अस्वस्थ, व्याकूळ, क्षुब्ध न होता शांत, स्थिर राहाते. अशा प्रकारचे मन ज्ञानप्राप्तीसाठी योग्य अधिकारी होते.  अशा अंतर्मुख, शुद्ध आणि एकाग्र मनामध्येच ज्ञानाचा उदय होतो.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ