Tuesday, January 16, 2018

ज्ञानाचे स्वरूप | Nature of Knowledge



ज्ञानाचे स्वरूप सांगताना आचार्य दृष्टांत देतात.  ज्याप्रमाणे अंधार सर्व विषयांच्यावर व दृष्टीवर आवरण घालीत असल्यामुळे विषय असूनही दिसत नाहीत.  सर्व विषय अंधारामध्ये लुप्त होतात.  परंतु सूर्योदय झाल्यानंतर मात्र अंधाराचा नाश होऊन अंधारामध्ये असलेले विषय सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशमान होतात.  सूर्यप्रकाशाचे दोन प्रकारचे कार्य आहे – १) अंधाराचा नाश करणे आणि २) अंधारामध्ये असलेल्या विषयांना प्रकाशित करणे.  

त्याचप्रमाणे शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषामध्ये वेदान्तशास्त्राच्या श्रवणमननाने आत्माकार वृत्ति निर्माण होते.  ही वृत्ति अज्ञानवृत्तीचा निरास करते.  या वृत्तीचा विषय निर्गुण, निराकार, निर्विशेष, निरवयव, सच्चिदानंद परब्रह्म असून ते प्रत्यगात्मस्वरूप आहे.  म्हणून ते ज्ञान प्रत्यगात्मस्वरूप असलेल्या परब्रह्माला प्रकाशमान करते.  म्हणजेच अध्यस्त असलेला “मी कर्ता”, “मी भोक्ता”, “मी सुखी”, “मी दुःखी”, “मी जन्म-मृत्युयुक्त” वगैरे सर्व विकल्पांचा निरास होतो आणि जे राहाते ते पूर्णस्वरूप !  “मी स्थूलसूक्ष्मकारण शरीरापासून भिन्न असून पंचकोशातीत आहे.  तसेच जागृतस्वप्नसुषुप्ति या तीन्हीही अवस्थांचा साक्षी असून सच्चिदानन्दस्वरूप आहे”, हे यथार्थ, सम्यक आणि निःसंशय ज्ञान प्राप्त होते.  

याठिकाणी ज्ञानाने अध्यासाची निवृत्ति होऊन संसारनिवृत्ति होते.  निरतिशय आनंदाची प्राप्ति होते.  याचा अर्थ सर्व संसार अज्ञानकल्पित असल्यामुळे मिथ्या स्वरूपाचा आहे.  त्यामुळे मिथ्या संसाराची निवृत्ति करण्यासाठी मिथ्या ज्ञानाची आवश्यकता आहे.  असे ज्ञान अज्ञानाचा निरास करून प्रयोजन संपल्यामुळे ते वृत्तिजन्य ज्ञान सुद्धा विरून जाते.  राहाते ते फक्त अखंड अद्वैतस्वरूप !  म्हणून येथे म्हटले आहे – ज्ञानं तत्परम् प्रकाशयति |  त्यामध्ये मोक्षाची सुद्धा इच्छा गळून पडते.  तीच पूर्णता होय. तेच खरे ज्ञान होय.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

No comments:

Post a Comment