Friday, January 26, 2018

मंगलाचरणाचे प्रयोजन - २ | Necessity of Invocation Prayer - 2मंगलाचरण दोघांनी मिळून करण्याचा गुरु-शिष्य संप्रदायाचा एक पहिला आणि प्रमुख शिष्टाचार मानला जातो.  हे ज्ञान ग्रहण करीत असताना ज्ञानाच्या सिद्धीसाठी अहंकार हा प्रतिबंध आहे.  अहंकाराचा निरास करण्यासाठी विद्येच्या प्रारंभी मंगलाचरण केले जाते.  वस्तुतः बुद्धि हे ज्ञानाचे साधन आहे. बुद्धीने मी ज्ञान प्राप्त करतो.  बुद्धीने केवळ व्यावहारिक ज्ञान होते, परंतु आत्मज्ञानामध्ये बुद्धीबरोबरच एक अत्यंत उदात्त, भव्य दिव्य आणि सुंदर असणारे मन आवश्यक आहे.  बुद्धीच्या निकषावर मीमांसा करून, तौलनिक अभ्यास करून कदाचित शाब्दिक ज्ञान प्राप्त करता येईल, परंतु या ज्ञानामध्ये सूक्ष्म व एकाग्र बुद्धिबरोबरच एक अत्यंत प्रगल्भ, परिपक्व, दैवीगुणसंपन्न मन आवश्यक आहे.  

मानित्वाचा अभाव, दंभित्वाचा अभाव, अहिंसा, क्षमाशीलता, ऋजुता, आचार्योपासना, शुद्धि, स्थिरता, स्वतःवर नियमन, इंद्रियांच्या विषयांच्यामध्ये वैराग्य, अहंकाराचा अभाव, जन्म-मृत्यु-जरा-व्याधि यांच्यामध्ये दुःख व दोष पाहणे, पुत्र-दारा-गृह यांच्यामधील आसक्तीचा व ममत्वाचा त्याग, इष्टानिष्ट प्रसंगांच्यामध्ये चित्ताची समतोल स्थिति, परमेश्वरामध्ये अनन्य, अव्यभिचारिणी भक्ति, एकांतवासाचे सेवन, जनसमूहामध्ये रममाण न होणे, अध्यात्मज्ञानामध्ये नित्यत्व आणि तत्त्वज्ञानाच्या अर्थाचे दर्शन हे सर्व ज्ञान आहे आणि याव्यतिरिक्त सर्व अज्ञान आहे.  

श्रद्धावान साधकालाच ज्ञान प्राप्त होते.  विद्याध्ययन करण्यासाठी गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये एक संबंध, एक नाते, गुरुभाव निर्माण झाला पाहिजे.  त्याशिवाय शास्त्राचे रहस्य समजत नाही.  बुद्धीने ज्ञान घेतले, युक्तिवाद समजला, न्यायशास्त्र समजले परंतु मनामध्ये गुरूंच्या, शास्त्राच्या बद्दल जर शंका, विकल्प असतील तर एक विकल्प सुद्धा या ज्ञानाचा ध्वंस करू शकतो.  

मनुष्य कितीही महापापी असेल तरी सुद्धा ज्ञानरूपी नौकेने हा भवसागर पार करता येतो.  मात्र हे शास्त्र शिकण्यासाठी फक्त शुद्ध मनाची आवश्यकता आहे.  यासाठीच गुरु आणि शिष्य मंगलाचरण करतात.  मंगलाचरण हे श्रद्धेचे, समर्पण भावनेचे प्रतिक आहे.

  
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

No comments:

Post a Comment