Tuesday, August 26, 2014

अभ्युदयप्राप्ति आणि मोक्षप्राप्ति | Paths of Prosperity and Liberation




सर्व मानवजातीमध्ये केव्हाही दोन प्रकारचे अधिकारी दिसतात.  बहुतांशी लोक कामनेने प्रेरित होवून अनेक प्रकारच्या कर्मांमध्ये प्रवृत्त होतात.  कर्म करून त्यातून मिळणारे कर्मफळ उपभोगण्याची त्यांची इच्छा असते.  म्हणून बहुतांशी लोक हे कामुकच आहेत.  फारच थोडे लोक कर्म-कर्मफळाच्या उपभोगामधून निवृत्त होवून तत्त्वाचे चिंतन करणारे तत्त्वजिज्ञासु आहेत.  त्यामुळे ज्याची जशी मनाची अवस्था असेल त्या अधिकारीभेदाने त्यांना भगवंताने दोन प्रकारचे भिन्न मार्ग सांगितलेले आहेत.

अभ्युदय म्हणजे भरभराट किंवा समृद्धि.  ऐहिक विषयांची प्राप्ति व त्यांचे उपभोग तसेच पारलौकिक प्राप्ति म्हणजेच स्वर्गप्राप्ति आणि स्वर्गोपभोग व त्यातून मिळणारे सुख होय.  ज्यांच्या मनामध्ये ऐहिक व पारलौकिक सुख उपभोगण्याची इच्छा असते किंवा ज्यांना त्या विषयांची प्राप्ति हीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे असे वाटते, अशा कामुक लोकांची कामना पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने अपौरुषेय कर्मरूपी साधनाचा – अभ्युदयप्राप्तीचा मार्ग सांगितला आहे.

ज्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची ऐहिक व पारलौकिक सुखाची कामना नसल्यामुळे अभ्युदयप्राप्तीच्या मागे न लागता परमपुरुषार्थ – मोक्षप्राप्तीसाठीच तळमळणारे जे थोडे साधक आहेत अशा जिज्ञासु साधकांची निःश्रेयसाची कामना पूर्ण करण्यासाठी त्यांना योग्य असे साधन दिले पाहिजे.

सर्व वेदांचे सार प्रतिपादित करीत असताना भगवान व्यास म्हणतात की, या दोन मार्गांमध्येच सर्व वेदांची प्रतिष्ठा आहे.  म्हणजेच सर्व वेद या दोन मार्गांचेच प्रतिपादन करतात - प्रवृत्तिलक्षणात्मक कर्ममार्ग आणि निवृत्तिलक्षणात्मक ज्ञानमार्ग.  प्रवृत्तिलक्षणात्मक कर्ममार्ग हा अभ्युदयप्राप्तीचे साधन असून निवृत्तिलक्षणात्मक ज्ञानमार्ग हा निःश्रेयसप्राप्तीचे साधन आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta
" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, August 19, 2014

अध्यात्माबद्दल कल्पना | Myths about Spiritual Science




एखाद्या साधकाने अध्यात्माबद्दल काही कल्पना केल्या असतील - अध्यात्म शिकल्यावर, श्रवण केल्यावर किंवा साधना केल्यावर, उपनिषदांचे अध्ययन केल्यावर आपल्याला काहीतरी अलौकिक प्राप्ति होईल, कसलातरी साक्षात्कार होईल, दृष्ट वस्तूप्रमाणे ब्रह्म माझ्या हाताला लागेल किंवा मला मोक्ष नावाची वस्तु मिळेल, अशा जर अद्भूद (fantastic) कल्पना घेऊन कोणी या मार्गात प्रवेश करेल, तर अशा साधकाला आचार्य सुरुवातीलाच सावध करतात.  त्याच्या निराधार कल्पना मुळासकट उखडून टाकतात, कारण अध्यात्ममार्गामध्ये आल्यानंतर अनेक संप्रदाय आहेत, परंपरा आहेत.  प्रत्येकजण आपलेच म्हणणे खरे आहे, असे मानतो.  आचार्य अध्यात्माचे सत्य, वास्तव परखड शब्दांच्यामध्ये सांगतात.

व्यावहारिक विद्या शिकून आपल्याला पदव्या मिळतील, मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळेल, एखादी छानशी नोकरी मिळेल, भरमसाठ पगार मिळेल, त्यामुळे सर्व सुखे पायाशी लोळण घेतील.  भौतिक समृद्धीची भरभराट होईल.  एखादे कर्म केले तर त्यामधून ईप्सित फळ प्राप्त होईल.  ज्योतिष्टोम यज्ञाने स्वर्गप्राप्ति होईल, पुत्रकामेष्टि नावाच्या यज्ञाने पुत्रप्राप्ति होईल, अश्वमेध यज्ञाने साम्राज्यप्राप्ति होईल, परंतु अध्यात्मशास्त्र शिकून काय मिळणार आहे ?  ब्रह्मविद्येने साधी दुपारची बाराची भूकही भागणार नाही.

आतापर्यंत सर्व काही केले परंतु काहीच मिळाले नाही, आता थोडे अध्यात्मही करून बघू यात, त्यातून काही मिळते का बघावे ” अशी वृत्ति अध्यात्मामध्ये असता कामा नये, कारण या ज्ञानाने कर्मासारखे दृश्य फळ मिळत नाही.  शास्त्र हे आत्मस्वरूपाचे ज्ञान देण्यासाठी प्रमाणभूत आहे.  शास्त्र हे दर्पणाप्रमाणे आहे. 

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

Tuesday, August 12, 2014

ईश्वर आणि जीव | God and Mortal Being



आज स्थूल दृष्टीला जे अनेक भेद दिसतात, ते सर्व मायिक भेद आहेत.  मायेमुळेच अनेक प्रकारच्या उपाधि, जीव निर्माण होतात. जीव – जगत् – ईश्वर हे ही उपाधिजन्य भेद आहेत.  मायाउपाधिमध्ये जीव आणि ईश्वर हे आत्मचैतन्याची पडलेली प्रतिबिंबे आहेत.  
 
शुद्धसत्त्वप्रधानमायाउपाधिउपहितचैतन्य म्हणजेच ‘ईश्वर’ होय आणि अशुद्धसत्त्वप्रधानमायाउपाधिउपहितचैतन्य म्हणजेच ‘जीव’ होय

त्रिगुणात्मक मायाच जीव – जगत् – ईश्वर हे भेद निर्माण करून जीवाच्या बुद्धीवर आवरण घालून जन्मानुजन्मे या संसारचक्रामध्येच बद्ध करते.  मायाच जन्मानुजन्मे जीवाला खेळविते.  आपल्या अवतीभोवती दुसरे जीव निर्माण करते.  शब्द-स्पर्शादि विषय निर्माण करते.  जीवाला आसक्त करून बद्ध करते.  याप्रमाणे एकच चैतन्य अनेक झाल्यासारखे भासते.  

जसे, एकच बिंब आपण जितक्या बादल्यांमध्ये पाणी ठेवू तितकी प्रतिबिंबे पडल्यामुळे अनेक झाल्यासारखे भासते.  परंतु वस्तुतः बादली, पाणी, प्रतिबिंब सर्वच मिथ्या असून बिंबस्थानीय सूर्यच फक्त सत्य आहे.  तसेच, एकच चैतन्य सर्व उपाधींच्यामध्ये अनुस्यूत आहे.  मायिक उपाधीमुळेच ईश्वर-जीव, नियामक-नियम्य हा भेद निर्माण होतो.  त्यामुळेच ईश्वर सर्वांना व्याप्त करतो, ही व्यापनक्रियाही अध्यस्त आहे, उपाधीच्या दृष्टीने आहे.

भगवान गीतेत म्हणतात – “ मी माझ्या अव्यक्त स्वरूपाने सर्वांना व्याप्त केलेले आहे.  सर्व भूतमात्रे माझ्यामध्ये आहेत, परंतु मी मात्र त्या कशामाध्येही नाही.  अर्जुना !  माझ्यामध्येच सर्व भूतमात्रे आहेत आणि हे सर्व माझे ऐश्वर्य तू पाहा. ”



- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

Tuesday, August 5, 2014

चंदन आणि पाण्याचा दृष्टांत | Illustration of Sandal and Water




आचार्य सुंदर दृष्टांत देतात – ज्याप्रमाणे चंदन व उदबत्ती यांचा पाण्याशी संबंध आला तर त्यामधून दुर्गंधी निर्माण होते.  ही दुर्गंधी औपाधिक आहे म्हणजेच पाण्याच्या उपाधीमुळे निर्माण होते.  वस्तुतः चंदन व उदबत्तीचे ‘सुगंध’ हे स्वरूप आहे, परंतु पाण्याच्या उपाधीशी तादात्म्य पावल्यामुळे त्यामध्ये ‘दुर्गंधी’ हा औपाधिक – आगंतुक गुण येतो.  परंतु नंतर घर्षणाने त्यामधील पाण्याचा अंश जर नाहीसा केला तर पाण्याची उपाधि निरास पावून पुन्हा सुगंध दरवळतो.  त्याचप्रमाणे आत्मचैतन्यामध्ये अविद्येच्या उपाधीमुळे अनेक औपाधिक, आगंतुक गुणधर्म येतात.

स्वतःच्या स्वरूपावर अनादि अविद्येच्या उपाधीमुळे अध्यास झालेला आहे.  आज मला स्वतःला “ मी कोण ? ”  याचे अत्यंत अज्ञान आहे.  क्रमशः पाहिले तर सर्वप्रथम मी माझ्या स्थूल शरीराशी तादात्म्य पावतो.  “मी जन्माला आलो” हीच पहिली कल्पन आहे.  त्यानंतर जन्माच्या अनुषंगाने जे जे निर्माण होते, ते सर्व जन्म-मृत्यु, कर्तृत्व-भोगतृत्व, सुख-दुःख, वर्णाश्रमभेद या सर्व कल्पनाही अध्यस्त आहेत.  मी स्वतःभोवती एकेक करीत अनंत कल्पनांचे जंजाळ, जाले निर्माण करतो आणि त्यामध्येच जन्मानुजन्मे बद्ध होतो.

चंदन आणि पाणी जर वेगवेगळे ठेवले तर दुर्गंध येत नाही.  चंदन आणि पाणी यांचा प्रथम संसर्ग होतो, नंतरच तादात्म्य होते आणि मगच दुर्गंध येतो.  म्हणजेच प्रथम संसर्गअध्यास व नंतर तादात्म्यअध्यास होतो.  तसेच, मी आणि विश्व, विषय, स्थूल शरीर यामध्ये प्रथम संसर्गअध्यास होऊन मी सर्वांशी तादात्म्य पावतो आणि मगच मला हा शोक-मोहात्मक संसार अनुभवाला येतो.

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009

- हरी ॐ