Tuesday, August 26, 2014

अभ्युदयप्राप्ति आणि मोक्षप्राप्ति | Paths of Prosperity and Liberation




सर्व मानवजातीमध्ये केव्हाही दोन प्रकारचे अधिकारी दिसतात.  बहुतांशी लोक कामनेने प्रेरित होवून अनेक प्रकारच्या कर्मांमध्ये प्रवृत्त होतात.  कर्म करून त्यातून मिळणारे कर्मफळ उपभोगण्याची त्यांची इच्छा असते.  म्हणून बहुतांशी लोक हे कामुकच आहेत.  फारच थोडे लोक कर्म-कर्मफळाच्या उपभोगामधून निवृत्त होवून तत्त्वाचे चिंतन करणारे तत्त्वजिज्ञासु आहेत.  त्यामुळे ज्याची जशी मनाची अवस्था असेल त्या अधिकारीभेदाने त्यांना भगवंताने दोन प्रकारचे भिन्न मार्ग सांगितलेले आहेत.

अभ्युदय म्हणजे भरभराट किंवा समृद्धि.  ऐहिक विषयांची प्राप्ति व त्यांचे उपभोग तसेच पारलौकिक प्राप्ति म्हणजेच स्वर्गप्राप्ति आणि स्वर्गोपभोग व त्यातून मिळणारे सुख होय.  ज्यांच्या मनामध्ये ऐहिक व पारलौकिक सुख उपभोगण्याची इच्छा असते किंवा ज्यांना त्या विषयांची प्राप्ति हीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे असे वाटते, अशा कामुक लोकांची कामना पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने अपौरुषेय कर्मरूपी साधनाचा – अभ्युदयप्राप्तीचा मार्ग सांगितला आहे.

ज्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची ऐहिक व पारलौकिक सुखाची कामना नसल्यामुळे अभ्युदयप्राप्तीच्या मागे न लागता परमपुरुषार्थ – मोक्षप्राप्तीसाठीच तळमळणारे जे थोडे साधक आहेत अशा जिज्ञासु साधकांची निःश्रेयसाची कामना पूर्ण करण्यासाठी त्यांना योग्य असे साधन दिले पाहिजे.

सर्व वेदांचे सार प्रतिपादित करीत असताना भगवान व्यास म्हणतात की, या दोन मार्गांमध्येच सर्व वेदांची प्रतिष्ठा आहे.  म्हणजेच सर्व वेद या दोन मार्गांचेच प्रतिपादन करतात - प्रवृत्तिलक्षणात्मक कर्ममार्ग आणि निवृत्तिलक्षणात्मक ज्ञानमार्ग.  प्रवृत्तिलक्षणात्मक कर्ममार्ग हा अभ्युदयप्राप्तीचे साधन असून निवृत्तिलक्षणात्मक ज्ञानमार्ग हा निःश्रेयसप्राप्तीचे साधन आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta
" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment