(Reference book - Narmada Parikrama Mahatmya by Parampujya Mataji Sthitapradnyanand Saraswati releasing on Adi Shankaracharya Jayanti, 4th May 2014)
त्रैलोक्यामध्ये सर्वश्रुत, अत्यंत श्रेष्ठ असणारी विष्णुपदी सुरसरिता
गंगामाता नर्मदामातेची स्तुति करते – श्रेष्ठा त्वं कल्पगे देवि नमस्कार्ये चिरायुषि
| त्वत्तोयस्य प्रभावेण पावित्र्यं अभवच्च मे | कल्पान्ते तु
क्षयं यान्ति सरितः सागरादयः | तीर्थानि चैव सर्वाणि त्वमेवात्रैव तिष्ठसि || पूज्या
त्रिदशावन्द्दा च सुभगे चिरगामिनी | गौरीसमा जटाग्रे
वै हरमूर्तिर्भविष्यसि || (स्कंदपुराण) ‘सर्वांना वंदनीय असणाऱ्या, अनेक कल्पापर्यंत राहणाऱ्या, दीर्घायू असणाऱ्या, हे श्रेष्ठ देवि नर्मदे ! तुझ्याच जलाच्या प्रभावानं आम्ही सर्व नद्या पवित्र
झालो आहोत. सर्व तीर्थं, नद्या, समुद्र, जलाशय हे कल्पांताच्या वेळी, प्रलयामध्ये नाश पावतात, परंतु त्यावेळी सुद्धा केवळ तूच अविच्छिन्न
रुपानं राहतेस. तुझा कधीही नाश होत नाही. म्हणूनच तू अक्षयस्वरूप आहेस. तू तेहतीस कोटी देवतांनाही पूजनीय आणि वंदनीय
आहेस. जटाग्रांमध्ये
राहिल्यामुळं तू गौरीप्रमाणं असून जणु हराची मूर्तीच होशील.’ असं म्हणत गंगेनं नर्मदेला नमस्कार केला.
माता गंगेनं
नर्मदेच्या केलेल्या या स्तुतीवरूनच, नर्मदा हि किती प्राचीन, सामर्थ्यशाली, पवित्र आहे, याची कल्पना येऊ शकते. गंगादि सर्व नद्या सुद्धा नर्मदेमध्ये आपल्या
सर्व शक्तींच्यासह निवास करीत असतात. म्हणूनच नर्मदा हि केवळ अन्य नद्यांच्याप्रमाणं
एक नदी नसून साक्षात् शिवापासून उद्भूत झालेली शिवस्वरूप देवी आहे. पृथ्वीवरील यच्चयावत प्राणीमात्रांच्या
पापांच्या नाशासाठी व त्यांचं कल्याण करवून देण्यासाठीच ती पृथ्वीवर अवतीर्ण
झालेली मोक्षदायिनी माता आहे.
सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग व कलियुग अशी चार युगं आहेत. अशा चार युगांचा एक कल्प होतो. असे सात कल्प आहेत. प्रत्येक सृष्टीमध्ये सात कल्पांच्यापर्यंत
नर्मदा अक्षुण्ण रुपानं राहते. म्हणून तिला सप्तकल्पगा असं म्हणतात. अशा सात कल्पांचं एक महाकल्पं होतं. अशा सात महाकल्पानंतर पुन्हा सृष्टीची उत्पत्ति
आणि नर्मदामातेची सुद्धा उत्पत्ति होते. त्यामुळं नर्मदामातेच्या अनेक अवतारकथा आहेत. नर्मदा नदी महाभागा, महापुण्या आणि अमृता आहे. अशा या भवतारिणी नर्मदामातेची परिक्रमा याचा
अर्थ पर्यटन किंवा सहल नव्हे, तर परिक्रमा म्हणजे नर्मदेभोवती अत्यंत श्रध्देनं, ह्रदयामध्ये वैराग्य धारण करून, भक्तीनं लीन होऊन संसारदुःखातून सुटण्यासाठी
अथवा मोक्षाच्या तीव्र इच्छेनं केलेली फार मोठी साधना व तपश्चर्या आहे.
अशा या
नर्मदापरीक्रमेचं माहात्म्य, या ग्रंथामध्ये सर्व पुराणांच्या आधारे विषद
केलं आहे. विशेषतः वायुपुरण, स्कंदपुराण, शिवपुराण, मत्स्यपुराण, अग्निपुराण यांमध्ये नर्मदामातेचं माहात्म्य मार्कंडेय मुनींनी राजा युधिष्ठिराला सांगितलं
आहे. नर्मदेचे अवतार
किती, कसे, केव्हा व का झाले? नर्मदेच्या तीरावर कोणकोणती तीर्थं आहेत? तिथं कोणकोणत्या महापुरुषांनी, ऋषीमुनींनी तपस्या केल्या आहेत? त्यामागील इतिहास काय आहे? त्यांचा प्रभाव काय आहे? त्याठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपण कोणत्या
साधना कराव्यात? कोणती अनुष्ठानं करावीत? कोणती धर्मकर्मं करावीत? त्यांचं फळ काय आहे? तसंच मनुष्यजन्मात बाल्यावस्थेपासून तर
वृद्धावस्थेपर्यंत आपल्या हातून कळत-नकळत शरीरानं, मनानं, स्वेच्छेनं-अनिच्छेनं, जी काही पापकर्म घडलेली असतात, त्यांचं क्षालन करण्यासाठी काय करावं? पूर्वी ऐतिहासिक काळात या सर्व गोष्टींचा अनुभव
कोणी कोणी घेतला? कोणकोणत्या देवतेनं इथं तपस्या केली आहे? आणि त्याचं प्रमाण काय आहे? नर्मदेच्या तीरावर कोणी कोणी तीर्थं स्थापन
केली आहेत? नर्मदेच्या तीरावर तीर्थाटन, परिक्रमा कशी करावी? त्याचे नियम काय आहेत? परिक्रमा कोण करू शकतो आणि कोण करू शकत नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं नर्मदापुत्र
श्रीमार्कंडेय मुनींनी स्वत: राजा युधिष्ठिराला दिलेली आहेत.
या सर्वांचं
समग्र वर्णन या ग्रंथात आलेलं आहे. म्हणून हा ग्रंथ म्हणजे व्यक्तिगत केलेल्या
परिक्रमेचं प्रवासवर्णन नाही. या ग्रंथामध्ये पुराणामधील मुळ संस्कृत श्लोक व
सुंदर स्तोत्रं अर्थासह दिलेली आहेत. नर्मदेच्या काठावर सर्व ऋषीमुनींनी, सर्व देवतांनी इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष
ब्रह्मा, विष्णु, महेश, शक्ति, सूर्य आणि स्वतः नर्मदेनं देखील तपस्या केल्याचं प्रमाण आहे. तपश्चर्येचें महत्व जगद्गुरू भगवद्पूज्यपाद आदि शंकराचार्यांनी आपल्या अनेक
प्रकरणग्रंथांच्यामधून वर्णन केलं आहे. परमपूज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती यांनी हा ग्रंथ एका आगळ्या-वेगळ्या शैलीमध्ये, ओघवत्या भाषेत, वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने लिहीला आहे. साधना हा अध्यात्माचा प्राण आहे. साधना, तपश्चर्या हेच या ग्रंथाचंही सार आहे. साधकांना, भक्तांना,नर्मदापुत्र असणाऱ्या परिक्रमावासियांना हा
ग्रंथ नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे.
नर्मदापरिक्रमा
माहात्म्य या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा वैशाख शुद्ध पंचमी दि. ४ मे २०१४ रोजी भगवत् पूज्यपाद आदि शंकराचार्य
जयंती या अत्यंत मंगलदिनी होत आहे.
-
हरी ॐ –