हे रामा ! गुह्य ज्ञान देताना मी अनेक दृष्टांत सांगितले आहेत.
परंतु यासाठी प्रथम दृष्टांत म्हणजे काय हे
समजले पाहिजे. दृष्टांत आणि दार्ष्टांत यांमध्ये
गोंधळ झाला तर यथार्थ ज्ञान होत नाही. दृष्टांताचे
स्वरूप, प्रयोजन आणि त्याच्या मर्यादाही समजल्या पाहिजेत. तसेच शास्त्र शिकविताना कोणते दृष्टांत द्यावेत,
याला नियम आहेत. शास्त्रामध्ये घट-माती,
सोने-अलंकार, रज्जु-सर्प असे अनेक दृष्टांत आहेत. आपल्या मनाला येईल तसा दृष्टांत देता येत नाही. शास्त्रामध्ये काव्य, अलंकार, साहित्यिक भाषा या
कशालाही महत्त्व नाही. काही वेळेस प्रवचनाची
भाषा अतिशय साहित्यिक व शेकडो उपमा, अलंकारांनी युक्त असेल तरी त्याचा आत्मप्राप्तीमध्ये
उपयोग होत नाही.
म्हणून वसिष्ठ मुनि येथे 'दृष्टांत' शब्दाची
व्याख्या करतात - येनेहाननुभूतेSर्थे दृष्टेनार्थेन बोधनम् | बोधोपकारफलदं तं दृष्टान्तं विदुर्बुधाः || दृश्य विषयाच्या साहाय्याने अननुभूत वस्तूचे म्हणजे
आत्तापर्यंत न पाहिलेल्या, न अनुभवलेल्या अज्ञात वस्तूचे ज्ञान करवून देणे, यालाच
'दृष्टांत' असे म्हणतात. सोप्या भाषेत
सांगावयाचे झाले, तर जे माहीत आहे त्याच्यावरून जे माहीत नाही, त्याचे ज्ञान ज्याच्या
साहाय्याने घेतले जाते, त्याला 'दृष्टांत' असे म्हणतात.
व्यवहारामध्ये आपण दृष्टांत म्हणजे उपमा देतो.
जसे आपण म्हणतो की, एखाद्या स्त्रीचे मुख हे
चंद्राप्रमाणे अत्यंत सुंदर आहे. येथे सौंदर्याचे
ज्ञान करून देण्यासाठी स्त्रीच्या चेहऱ्याला चंद्राची उपमा दिली आहे. हे रामा ! व्यवहारामध्ये सुद्धा ज्ञान देण्यासाठी अनेक उपमा
किंवा दृष्टांत दिले जातात. जर कोणी बुद्धिवादी
व दुराग्रही मनुष्य म्हणेल की, ज्ञानासाठी दृष्टांताची आवश्यकता काय ? यावर वसिष्ठ मुनि उत्तर देतात की, दृष्टांताशिवाय
अज्ञात विषयाचे ज्ञान होऊ शकत नाही. जसे रात्रीच्या
वेळी अंधारामध्ये साधी भांडी शोधायची असतील तरी दिव्याची आवश्यकता असते. तसेच आजपर्यंत जो विषय आपण कधीही पाहिलेला नाही,
त्याचे ज्ञान घ्यावयाचे असेल तर दृष्टांत आवश्यकच आहे. हे रामा ! परब्रह्मस्वरूपाचे ज्ञान घेण्यासाठी सुद्धा दृष्टांत
आवश्यक आहे.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–

