Tuesday, March 17, 2026

असंकल्परूपी शस्त्र । Weapon Of Non-Resolution

 



हे राघवा !  असंकल्परूप शस्त्राने जेव्हा चित्ताचे छेदन केले जाते, तेव्हाच सर्वस्वरूप, सर्वव्यापी व शांतस्वरूप असणाऱ्या ब्रह्मपदाची प्राप्ति होते.  संकल्पांचा निःशेष त्याग करणे हाच एकमात्र उपाय आहे.  संकल्पांचा त्याग झाल्याशिवाय चित्त ब्रह्मपदामध्ये स्थिर होऊ शकत नाही.  म्हणून संकल्परहित होणे, हेच चित्तछेदनाचे मोठे व प्रभावी शस्त्र आहे.  ज्याने असे सर्व संकल्प त्याग केले आहेत, तोच सर्व अनर्थांच्यापासून मुक्त होऊन आत्मज्ञानाच्या साहाय्याने शांतस्वरूप असणाऱ्या ब्रह्मपदामध्ये स्थिर होतो.  अशा या आत्मस्थ पुरुषाच्या शरीराला कोणत्या यातना होणार ?  अर्थातच ज्ञानी पुरुष, जीवन्मुक्त पुरुष मनाच्या यातनांच्यामधून तर मुक्त होतोच, परंतु यदाकदाचित त्याला शारीरिक यातना झाल्या तरीही तो विचलित होत नाही.  शरीरयातनांचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही.

 

हे राघवा !  मूढ लोक संकल्प करून देवाची सुद्धा कल्पना करतात.  त्यांच्या अज्ञानाला काय म्हणावे ?  परंतु रामा !  तू मात्र दैवाधीन न होता पुरुषार्थाच्या साहाय्याने तुझे चित्त अचित्त अवस्थेला घेऊन जा.  म्हणजेच तुझ्या चित्तामधील सर्व वृत्तींचा व आसक्तीचा त्याग कर.  याप्रकारे चित्त विषयवृत्तिरहित झाले की, मग निरतिशय असणाऱ्या महापदवीला म्हणजेच स्वस्वरूपाला जाऊन पोहोचते.  याप्रमाणे दीर्घ अभ्यासाने या चित्ताला तू तुझ्या चैतन्यरूपाने भक्षण करून तू चित्तच्याही अतीत हो.  त्यासाठी प्रथम तू पारमार्थिक बुद्धीने युक्त होऊन दृढ असणारी आत्मभावना निर्माण कर.

 

याप्रमाणे अत्यंत अव्यग्रतेने म्हणजे एकाग्रतेने आत्मधरणा केलीस की, मग आपोआपच ते चित्त परमपदामध्ये स्थिर होईल.  त्यासाठी परमपुरुषार्थाचा आश्रय घे. चित्ताला अचित्त अवस्थेला ने.  याप्रमाणे चित्त वृत्तिरहित झाले की, मग तुला महापदवी म्हणजे निरतिशय चैतन्यस्वरूप प्राप्त होईल.  एकदा ते स्वरूप प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्याचा कधीही नाश होत नाही.  हे राघवा !  हा सर्व अभ्यासाचा भाग आहे.  आपणच आपल्या मनाला अत्यंत दक्ष राहून व प्रामाणिकपणे कसे संयमित करतो, यावरच मनाची शुद्धि, वैराग्य, ज्ञानाचा उदय, धारणा, ज्ञाननिष्ठा व स्वस्वरूपाची सहजावस्था अवलंबून आहे.  म्हणून रामा !  मन संकल्परहित करणे हा साधकाचा महत्त्वाचा पुरुषार्थ आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ