जन्म, मृत्यु, जरा, व्याधि यांच्यामध्ये दुःख आणि दोष पाहावेत, कारण त्याशिवाय मन त्यापासून निवृत्त होऊ शकत नाही. हे दोष कसे पाहावेत ? यावर
आचार्य सुंदर वर्णन करतात -
जन्म होईपर्यंत जीव गर्भावस्थेमध्ये असतो. गर्भवासामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत. गर्भामध्ये नऊ महिने नऊ दिवस राहावे लागते. तेथे नाळेने जीव घट्ट बांधलेला असतो. गर्भाजवळच मल, मूत्र, कृमिकीटक असतात. ते त्या गर्भाला सतत दंश करतात. त्यानंतर मातोश्रींना डोहाळे लागतात. त्या कधी गोड, कधी चमचमीत, थंड, गरमागरम, आंबट, तिखट, तुरट, कडू, गोड असे अनेक प्रकारचे अन्न
सेवन करतात. त्यामुळे जठराग्नीचा दाह
होऊन जठराजवळील गर्भाला यातना होतात.
तसेच आई सतत चलनवलनादि क्रिया करीत असते. त्या हालचालींबरोबर गर्भही उलटापालटा होतो. चालताना, उठताना, बसताना, झोपताना गर्भाचे अतोनात हाल होतात. आई जे अन्न ग्रहण करते तेच या जीवाचे
अन्न असते. आईच्या पोटातील
मलमूत्रामध्येच अत्यंत दुर्गंधीमध्ये जीवाला नऊ महिने अवघडलेल्या अवस्थेमध्ये
राहावे लागते. म्हणून हा गर्भवास अत्यंत
क्लेशकारक, दुःखकारक
आहे.
नऊ महिन्यांच्या गर्भवासानंतर जन्म होतो. त्यावेळी प्रसव वायुमुळे प्रसव वेदना होतात. आईबरोबर गर्भालाही या यातना भोगाव्या लागतात. योनीद्वारातून बाहेर येताना प्रचंड यातना
असतात. या सर्व दिव्यातून बाहेर आल्यावर
श्वास घेण्यासाठी त्या जीवाला रडवितात. उलटे धरतात. चापटी मारतात. येथूनच आपली मार खाण्यास आणि रडण्यास सुरुवात
होते. अशा प्रकारे जन्म हा अत्यंत
दुःखदायक आणि दोषयुक्त आहे.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–

