"आत्मज्ञानाच्या प्रबोधनासाठी जे शास्त्रांचेही
परमशास्त्र आहे, जे शुभकारक, पुण्यकारक आहे, ते प्रधान शास्त्र म्हणजेच 'महारामायण'
नावाचे श्रेष्ठ शास्त्र आहे. तेच सर्व इतिहासांच्यामध्ये
सारभूत शास्त्र आहे." येथे श्रीवसिष्ठ
मुनि महारामायणाचा म्हणजे योगवासिष्ठाचा उल्लेख 'सत्शस्त्र' म्हणून करतात आणि सांगतात
की, "हे रामा ! जे वेद-उपनिषदांच्यामधून
सांगितले, तेच सर्व सार मी तुला या ग्रंथामधून सांगितले आहे. म्हणूनच हे महारामायण आहे."
"हे राघवा ! श्रीवाल्मीकि ऋषींनी रामायण सांगितले. त्यामध्ये
सर्व जीवांना पावन करणारे तुझे चरित्र आहे. परंतु त्यानंतर सांगितलेले महारामायण म्हणजे तुझा
आणि माझा संवाद म्हणजेच हे योगवासिष्ठ आहे. खरे तर योगवासिष्ठ हा रामायणाचाच भाग आहे. तुझे चरित्र म्हणजे रामायण आणि तुझा व माझा ज्ञानसंवाद
हे तर महारामायण आहे. हे महारामायण सर्व इतिहासांच्यामध्ये
श्रेष्ठ व सारभूत आहे."
"म्हणून रामा ! योगवासिष्ठ हा ग्रंथ कपोलकल्पित शास्त्र किंवा
कल्पना करून रंगविलेले शास्त्र नाही तर हा प्रत्यक्ष घडून गेलेला वृत्तांत - इतिहास
आहे. यामध्ये मी तुला पुढे अनेक आख्यायिका
सांगेन. पण अन्य कथांच्याप्रमाणे या कथा ऐकून
तू सोडून देऊ नकोस. या योगवासिष्ठामध्ये ज्या
कथा मी सांगेन, त्या ऐकताना श्रोत्यांच्या मनामध्ये एकेक ज्ञानवृत्ति निर्माण होते.
म्हणून रामा ! मी तुला सांगत असणारे हे शास्त्र, हा योगवासिष्ठ
ग्रंथ म्हणजे सर्व इतिहासांचे सुद्धा सार आहे. त्यामुळे हे शास्त्र श्रवण केले की,
मनुष्याला जीवन्मुक्ति म्हणजे अक्षय सुखाची प्राप्ति होते. म्हणून हे अतिशय पावन शास्त्र आहे."
"हे रामा ! अन्य शास्त्र प्रथम श्रवण करावी लागतात, मग मनन करावे
लागते, मग निदिध्यासना करावी लागते आणि मग ज्ञानप्राप्ति होते. बरे, एवढे सर्व केल्यावर अनुभूति येईलच, याची शाश्वती
नाही. पण रामा ! मी जे सांगतो ते हे शास्त्र अगदीच शीघ्र फलदायी आहे.
ते ऐकलेस की, ऐकता-ऐकताच तुला अनुभूति येईल.
अक्षय जीवन्मुक्तावस्था प्राप्त होईल.
त्यासाठी तुला बाहेरून काहीही करण्याची आवश्यकता
नाही. कारण ती अनुभूति तुला स्वतःलाच तुझ्या
आतच अनायासाने प्राप्त होईल. याप्रमाणे हे
सत्य शास्त्र सर्व पापांचा व संसाराचा नाश करणारे अतिशय पावन शास्त्र आहे."
-
"योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya Swami
Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti
2022
- हरी ॐ–