आचार्य म्हणतात – वेदान्तो
नाम उपनिषत् प्रमाणम् | (वेदान्तसार)
वेदान्त, उपनिषदे हेच आत्मज्ञानाचे प्रमाण
आहे. प्रत्येक मनुष्याला जीवन जगत
असताना शास्त्र हेच प्रमाण, आधार व आश्रय आहे. वेदान्तशास्त्र, त्यामधील विचारच मनुष्याला
तारून नेतात. मनुष्याचे व्यावहारिक
जीवन असो वा आध्यात्मिक जीवन, साधना असो, त्यामध्ये शास्त्राचे विचार मनुष्याला हे
श्रुति शिकविते. साधनेमध्ये जेथे जेथे
साधक अडखळेल, त्याचे मन सैरभैर होईल, अनेक मते त्याच्यासमोर येतील, त्यावेळी
श्रुतिमाताच साधकाला योग्य मार्ग दाखविते. कारण श्रुति ही निरपेक्ष आहे. म्हणून साधकाने श्रुतींचाच आश्रय घ्यावा हे
एक कारण !
दुसरे कारण म्हणजे, कोणत्याही वस्तूचे,
विषयाचे ज्ञान घ्यावयाचे असेल तर ते ज्ञान – न
पुरुषतन्त्रत्वात् | पुरुषाच्या, ज्ञान घेणाऱ्याच्या
मतावर, कल्पनांच्यावर अवलंबून नसते. म्हणून शास्त्राध्ययन करताना मला काय वाटते,
याला महत्व नाही. हे माझे मत आहे, हा
वाक्यप्रयोगच अयोग्य आहे. कारण – ज्ञानं वस्तुतन्त्रत्वात् | ज्ञान हे ज्ञेय वस्तूच्या
स्वरूपावर अवलंबून असते. ज्ञानासाठी यथार्थ व सम्यक् हे दोन शब्द वापरले
जातात.
१) यथार्थ – अर्थं ज्ञेयविषयं अनुसृत्य यत् प्रवर्तते तत् यथार्थज्ञानम् | जे ज्ञेय विषयाला अनुसरून, विषयाबरहुकुम ज्ञान असते, त्यास यथार्थ ज्ञान असे
म्हणतात.
२) सम्यक् – संशयविपर्यरहितं ज्ञानम् |
ज्या ज्ञानामध्ये संशय, शंका नाहीत व विपर्यय म्हणजे जे विपरीत ज्ञान नाही,
त्यास सम्यक ज्ञान असे म्हणतात.
वेदान्तशास्त्राचे ज्ञान हे यथार्थ व सम्यक्
असल्यामुळे साधकांनी, मुमुक्षूंनी वेदान्तशास्त्राचाच आदर करावा. वेदान्तज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त झाल्याशिवाय
अन्य मते – वाद याविषयी श्रवण देखील करू नये. त्यामध्ये आयुष्याचा व्यर्थ वेळ घालवू नये.
- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१२
- Reference: "Prashanopanishad" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand
Saraswati, 1st Edition, April 2012
- हरी ॐ –