भगवान एकापेक्षा एक श्रेष्ठ, श्रेष्ठतर आणि
श्रेष्ठतम असणारी साधने सांगतात. शास्त्रामध्ये
अनेक प्रकारच्या साधाना दिल्या आहेत. त्यापैकी
‘अभ्यास’ ही एक साधना आहे. अभ्यास म्हणजेच
सर्व कर्मांचा संन्यास करून यम, नियम वगैरेदींच्या साहाय्याने श्रवण-मनन ही साधना
करणे होय. या साधनेमध्ये
सर्वकर्मसंन्यास करणे, शमदमादि साधनसंपत्ति प्राप्त करणे इतकेच नव्हे, तर वेदान्तशास्त्राचे श्रवण-मननादि करणे यामध्ये
खूप श्रम, कष्ट आहेत. त्यामुळे या अभ्यासापेक्षा ‘ज्ञान’ श्रेष्ठ आहे. ‘ज्ञान’ म्हणजेच श्रवणादि साधनेमधून उदयाला
येणारे जीवब्रह्मैक्य ज्ञान होय. म्हणजेच
वरील सर्व कष्टप्रद साधना करण्यापेक्षा अद्वैत ज्ञान श्रेष्ठ आहे, कारण ‘ज्ञान’ हेच मोक्षाचे साक्षात, प्रमुख साधन आहे. ही शास्त्रप्रसिद्धि आहे.
यापुढे भगवान म्हणतात, “या जीवब्रह्मैक्य
ज्ञानापेक्षा ‘ध्यान’ श्रेष्ठ आहे. याचे
कारण ज्ञान प्राप्त झाले तरीही या ज्ञानामध्ये अनेक प्रतिबंध आहेत. पहिला प्रतिबंध म्हणजेच ‘विपरीत भावना’ होय.”
“अहं ब्रह्मास्मि” हे शाब्दिक ज्ञान
झाल्यामुळे आत्मअज्ञानाचा निश्चित निरास होतो. परंतु अजूनही त्या ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त न
झाल्यामुळे ते ज्ञान फलदायी होत नाही. दुसरा प्रतिबंध म्हणजेच सूक्ष्म भोगवासना
होय. भोगवासना सतत ज्ञानसाधनेमध्ये
कामक्रोधादि, रागद्वेषादि विकार पुन्हा पुन्हा
निर्माण करून सतत प्रतिबंध निर्माण करते. त्यामुळे
असे हे ज्ञान केवळ शाब्दिक असून ज्ञाननिष्ठारहित, सप्रतिबंधक ज्ञान आहे. या ज्ञानापेक्षा निश्चितच ‘ध्यान’ श्रेष्ठ आहे.
कर्मफळत्यागामध्ये कोणतेही कष्ट, परिश्रम
नाहीत. सर्व कर्मांचा त्याग करणे, यमनियमादि
साधना करणे, शमदमादि गुणांचा अभ्यास करणे, श्रवणादि साधना करणे, विपरीत
प्रत्ययांचा निरास करणे, मनाची स्थिरता करणे या कोणत्याही श्रमाची आवश्यकता नाही. कर्मफळाच्या संकल्पाचा त्याग केल्यामुळे
आपोआपच ज्यावेळी प्रत्यक्ष कर्मफळ प्राप्त होते, त्यावेळी प्रतिक्रिया न करता तो
साधक प्रसादवृत्तीने
त्याचा स्वीकार करतो. यामुळे मनामधील रागद्वेष,
हर्षविषाद वगैरेदि द्वन्द्वे नाहीशी होऊन त्याला त्याचवेळी सत्वर आनंदाचा, शांतीचा अनुभव येतो. मन शुद्ध, सत्त्वगुणप्रधान झाल्यामुळे तेथेच आनंदाचा तात्काळ उत्कर्ष होतो. यामुळे चित्तशुद्धिद्वारा ज्ञानप्राप्ति होऊन साधकाला
क्रमाने मोक्षप्राप्ति होते. म्हणून अभ्यासापेक्षा
ज्ञान, ज्ञानापेक्षा ध्यान आणि ध्यानापेक्षा कर्मफलत्याग श्रेष्ठ आहे, हे सिद्ध
होते.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–