Tuesday, October 29, 2024

मनाचा आणि दृश्याचा निरास | Dismissal Of Mind And Creation

 




मनाने ठरविले तर आत्मज्ञानाच्या श्रवणाने अशी एक अवस्था येते की, मन हे मन राहतच नाही.  तर ते केवलस्वरूप, शांतस्वरूप परब्रह्मामध्येच लय पावते.  मन चैतन्यस्वरूपामध्ये लय पावणे म्हणजे वृत्ति लय पावणे होय आणि वृत्ति लय पावणे म्हणजेच दृश्याचा निरास होणे होय.  याप्रकारे दृश्याचा निरास होण्यालाच ज्ञाते लोक 'मोक्ष' असे म्हणतात.

 

थोडक्यात जोपर्यंत अज्ञान आहे, तोपर्यंत मनाच्या सर्व क्रिया, व्यापार चालतात.  परंतु ज्ञानाने दृश्याचाच अभाव झाला की, मग मात्र मनही शिल्लक राहत नाही.  ज्याप्रमाणे वाऱ्यापासून संरक्षण केलेली दिव्याची ज्योत अतिशय शांतपणे तेवत राहते, त्याचप्रमाणे दृश्यरहित झालेले चित्त शांतस्वरूप परब्रह्मामध्ये लीन होते.  मनाचे मनपण संपते.  राहते ते चैतन्यस्वरूप !

 

म्हणून संसाराचा निरास करावयाचा म्हणजे फार काहीतरी मोठे करायचे असे नाही, तर फक्त जेथून हा संसार उत्पन्न झाला त्या मनाचाच प्रथम निरास केला पाहिजे.  प्रत्यक्ष संसाराचा निरास करणे शक्य नाही.  कारण संसारामध्ये तर अनंत, अगणित दृश्य विषय आहेत.  आपण कशा-कशाचा म्हणून निरास करणार ?  एका दृश्याचा निरास केला तरी दुसरे हजार दृश्य विषय समोर उभे राहतात.  म्हणूनच येथे श्रीवसिष्ठांनी युक्ति सांगितली आहे.  साधकाने दृश्याच्या मागे न लागता आपल्या मनाचाच शोध घ्यावा.  मनानेच मनाच्या साहाय्याने मनाचा निरास करावा.  मनाचा निरास केला की, आपोआपच मनोनिर्मित दृश्याचा निरास होतो.

 

मनाचा निरास करणे म्हणजे मनामधील अहंकार-ममकार-कर्तृत्व-भोक्तृत्व या सर्वांचा निरास करणे होय.  या अज्ञानप्रत्ययांचा निरास झाला की, मग साधक मुक्त होतो.  तीच मोक्षाची केवलस्थिति आहे.  मात्र यासाठी प्रथम मनाचे स्वरूप समजावून घ्यावे.  तसेच हे दृश्य विश्व मनोकाल्पित आहे, हे जाणावे आणि नंतरच ज्ञानाने, विचाराने, शास्त्रचिंतनाने, मनाच्या साहाय्याने मनाचा शोध घेऊन मनाचा निरास करावा.  त्यावेळी मन आपोआपच त्याच्या अधिष्ठानामध्ये म्हणजे चैतन्यामध्ये लय पावते.  दृश्य असणारे जग आणि द्रष्टा असणारे मन नाहीसे होते.  राहते ते केवल चैतन्यस्वरूप !  मन एकदा त्या स्थितीपर्यंत पोहोचले की, जीव हा जीव न राहता स्वतःच परब्रह्म स्वरूप होतो.  तो निर्वाणपदापर्यंत पोहोचतो.  हेच या ज्ञानाचे परमोच्च फळ आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, October 22, 2024

मय्येव मन आधत्स्व | Base Your Mind on Me

 



आज आपले मन बाह्य विषयांच्यामध्ये आणि उपभोगांच्यामध्येच रममाण झालेले आहे.  मन म्हणजेच वृत्ति होय.  म्हणून मनामध्ये सतत अनेक प्रकारच्या विषयांच्याच वृत्ति येतात.  अखंड रात्रंदिवस विषयांचेच चिंतन चालू आहे.  इतकेच नव्हे तर मनामध्ये अनेक द्वन्द्व, विकल्प, शंका तसेच कामक्रोधादि, रागद्वेषादि विकारांनीच मन व्याप्त झालेले आहे.  या बहिर्मुख, विषयासक्त मनाला प्रथम निवृत्त केले पाहिजे.  हे मन निवृत्त केल्यानंतर मन कोठे ठेवावे ?  भगवान म्हणतात - मय्येव मन आधत्स्व |  माझ्यामध्ये – परमेश्वरामध्येच हे संकल्प-विकल्पयुक्त असणारे मन ठेवावे.  परंतु त्यासाठी प्रथम परमेश्वराच्या सत्तेची जाणीव झाली पाहिजे.  त्याचवेळी परमेश्वराविषयी मनामध्ये श्रद्धा, अस्तिक्यबुद्धि निर्माण होईल.  परमेश्वर हाच सर्वश्रेष्ठ असून सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी असल्यामुळे तोच कर्तुं-अकर्तुं आहे.  त्याच्याच सत्तेमुळे सर्व विश्वालाही सत्ता प्राप्त होते.

 

व्यवहारामध्ये आपण कार्यकारण संबंध मानतो.  जसे सर्व अलंकारांचे कारण सुवर्ण आहे, घटांचे कारण मृत्तिका आहे.  त्याचप्रमाणे या जगताचेही उत्पत्तिस्थितिलयकारण परब्रह्मस्वरूप आहे.  तेच सर्व विश्वामध्ये सत्तास्वरूपाने अखंडपणे अंतर्बाह्य व्याप्त झालेले आहे.  हीच कार्यकारण मीमांसा समजावून घेतली तर आपोआपच मनामधील सर्व शंका, संशय दूर होतील.  परमेश्वर खरोखरच आहे की नाही ?  अशा प्रकारचे विकल्पही संपतील.  त्याचवेळी ते मन संशयरहित होऊन परमेश्वरामध्ये एकाग्र होईल.

 

परमेश्वरामध्ये मन ठेवायचे म्हणजेच मनातील सर्व वृत्तींचा विषय परमेश्वर केला पाहिजे.  म्हणजे डोळ्यांना जरी बाह्य विषय दिसला तरी मनामध्ये मात्र सतत सगुण परमेश्वराचीच वृत्ति निर्माण करावी.  त्या वृत्तीमध्ये खंड पडू देऊ नये.  म्हणजेच तुपाच्या संतत धारेप्रमाणे अखंडपणे परमेश्वरस्वरूपाचीच वृत्ति निर्माण करण्याचा अभ्यास करावा.  किंवा दुसरा अर्थ – व्यवहारामध्ये आपल्याला सतत बाह्य विषयच दिसत असतात.  त्यावेळी त्या सर्व विषयांच्यामध्ये परमेश्वरस्वरूप पाहावे.  म्हणजेच त्यामध्ये परमेश्वराची अखंडपणे अनुस्यूत असणारी सत्ता पाहावी.  जे जे या विश्वामध्ये सुंदर आहे, चंद्र, सूर्य, तारे, ग्रह, नक्षत्र, नद्या, पर्वत सर्व परमेश्वराचेच ऐश्वर्य, विभूति आहे, हे जाणून विश्वात्मक असणाऱ्या परमेश्वराचीच पूजा करावी.  यामुळे मनामध्ये विषयांच्या वृत्ति आल्या तरीही परमेश्वराचेच चिंतन होईल.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Tuesday, October 15, 2024

विचार कसा करावा ? | Ideal Thinking Process

 




विचार कसा करावा ?  याचेही वर्णन वसिष्ठ मुनि करतात - कोहं कथमयं दोषः संसाराख्य उपागतः |  न्यायेनेति परामर्शो विचार इति कथ्यते ||  हे रामा !  साधकाने स्वतःलाच हे प्रश्न विचारावेत की, मी कोण आहे ?  हा संसाररूपी दोष कोठून निर्माण झाला ?  अशा प्रश्नांचा न्यायाच्या साहाय्याने शास्त्राधारे परामर्श करणे म्हणजेच 'विचार' होय.

 

प्रत्येक मनुष्याने जन्माला आल्याबरोबर 'मी' म्हणजेच शरीर अशी कल्पना करून घेतली.  त्यामुळे शरीराच्या गुणधर्मविकारांशी तादात्म्य पावून मनुष्य जन्ममृत्युयुक्त, सुखी-दुःखी व संसारी होतो.  म्हणून मनुष्याने 'मी' आलो कोठून ?  व 'मी' कोण आहे ?  याचा विचार करणे गरजेचे आहे.  व्यवहारामध्ये आपण एकमेकांना भेटल्यावर, तू कोण ?  तुझे नाव-गाव काय ?  तू कोठून आलास ?  असे प्रश्न विचारतो.  आपल्याला दुसऱ्याविषयी भयंकर उत्सुकता असते.  परंतु वसिष्ठ मुनि येथे सांगतात की, मनुष्याने ही जिज्ञासा दुसऱ्याविषयी निर्माण न करता स्वतःविषयी निर्माण करावी.  'मी' कोण ?  माझे खरे स्वरूप काय आहे ?  हे सभोवती दिसणारे दृश्य विश्व काय आहे ?  माझ्याभोवती असणारे सगे-सोयरे, आप्त, पति-पत्नी, पुत्र-पौत्र या सर्वांचे स्वरूप काय आहे ?  याचा मनुष्याने अत्यंत युक्तियुक्त विचार करावा.  'मी' म्हणजे देह नाही.  कारण देह हा तर दृश्य, नाशवान असून 'मी' त्या देहाचा द्रष्टा आहे.  त्यामुळे 'मी' शरीर, इंद्रियादि संघातापासून नित्य भिन्न आहे.  माझ्याव्यतिरिक्त समोर दिसणारे दृश्य विश्व सुद्धा नाशवान असून मनोकाल्पित आहे.

 

इतकेच नव्हे तर मी माझे-माझे म्हणून निर्माण केलेली सर्व नाती सुद्धा तात्कालिक व काल्पनिक आहेत.  या जन्मापुरतीच मर्यादित आहेत.  जन्मल्यापासून मृत्युपर्यंत फक्त काही काळ यांचा संबंध आहे.  ज्यांना मी माझे-माझे म्हणतो, ते कोणीही माझे नाहीत.  पैशापुरते, सत्तेपुरते, उपभोगांच्यापुरतेच संबंध आहेत.  आपलीच माणसे आपला विश्वासघात करतात.  धनवान मनुष्याला तर स्वतःच्या पुत्रापासून सुद्धा भीति असते.  या जगात आपल्याशिवाय कोणाचेही काहीही अडत नाही.  साधकाने शास्त्राधारे या सर्व अनित्य संसाराचे अवलोकन करावे आणि त्यापासून विचाराने निवृत्त व्हावे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ


Tuesday, October 8, 2024

ईश्वर खरच निष्ठुर आहे का ? | Is God Really Unkind ?

 



ईश्वरकृपा असताना जीवनात संकटे, प्रतिबंध, आपत्ति, कष्ट, दुःख, यातना कशा काय येतात ?  ज्याठिकाणी ईश्वरकृपा असेल तेथे आनंदच असला पाहिजे.  पण हे प्रत्यक्षात दिसत नाही.  त्यामुळे शंका येते की खरोखरच परमेश्वर कृपाळु, दयाळु आहे, का निष्ठूर आहे ?  अशी शंका घ्यावयाचे कारण नाही.  ज्याप्रमाणे चांगल्या, सुखाच्या प्रसंगामध्ये ईश्वरकृपा आहे, तशीच संकटकाळी दुःखाचे वेळी सुद्धा परमेश्वरकृपा आहेच.  ती पाहाण्याची आमच्या मनात ताकद नाही.  मनाची पक्वता नाही.  आपल्या मनाची दारे बंद आहेत.  कल्पनांच्या भराऱ्यामध्ये, राग-द्वेषांच्या जाळ्यामध्ये आपणच आपल्याला बद्ध केलेले आहे.

 

जर एखादा मुलगा म्हणाला की, माझ्या आईचे प्रेम नाही, तर ते किती अव्यवहार्य, अयुक्त आहे.  अशी कोणती माता असेल की जिने नऊ मास आपल्या उदरात मुलास वाढवून आपल्या रक्तातून त्याला अन्न, पाणी पुरवून त्याचे पोषण, वर्धन केले.  असह्य यातना सहन करून त्याला जग दाखविले.  एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षणाला ती मुलाच्याच कल्याणाचा विचार करते.  त्याची काळजी घेते.  तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला जपते.  अशा मुलाने जर आईचे माझ्यावर प्रेम नाही असे म्हटले तर ते योग्य आहे का ?  सुखदुःखाच्या अनेक प्रसंगात ती त्याच्या मदतीला धावून जाते.  स्वतःच्या प्रेमाने त्याला गोंजारते.  परंतु पुत्राच्या कमनशीबामुळे ते प्रेम तो बघू शकत नाही.  तिचे वात्सल्य तिच्या अंतापर्यंत कायम असते.  परंतु कल्पनेच्या विलासात रंगणाऱ्या त्या अभागी पुत्रास ते दिसत नाही.

 

एखादा डॉक्टर रोग्यावर उपचार करतो.  त्यावेळेस त्या रोग्याच्या यातना, दुःख त्याला समजतात.  रोगाची तीव्रता किती आहे हे जाणून त्याप्रमाणे तो उपचार करतो.  एखादा रोगी गळूमुळे वेदनेने तळमळत आहे.  त्याला असह्य यातना होत आहेत.  अशावेळी आपण जर म्हटले की काय डॉक्टर आहे पहा !  आधीच बिचारा असह्य वेदनेने तळमळत आहे आणि हा डॉक्टर आणखीन कापाकापी करून त्याला अधिकच यातना देत आहे.  तो डॉक्टर दुष्ट, निर्दयी, कसाई आहे.  असे म्हणणे योग्य होईल का ?  डॉक्टरची कृति बाहेरून जरी निर्दयपणाची वाटली तरीही त्याच्या मनात रोग्याविषयी निष्ठुरता नाही.  उलट त्याच्याबद्दल जिव्हाळा, प्रेमच आहे.  म्हणूनच तो रोग्याला वेदनामुक्त करण्याचा प्रयत्न करतो.  तसेच परमेश्वरकृपा असूनही दुर्दैवाने ती आपल्याला दिसत नाही.  तो किती दयाळु-कृपाळु आहे हे बघण्यासाठी मनाचे दरवाजे उघडले पाहिजेत.


 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ



Tuesday, October 1, 2024

संकल्प म्हणजेच मन | Mind Means Resolution

 



"हे रामा ! संकल्प म्हणजेच मन !  संकल्पापासून मनाला भिन्न करता येत नाही.  ज्याप्रमाणे पाण्यापासून द्रवत्वाला किंवा वाऱ्यापासून स्पंदनाला भिन्न करता येत नाही, त्याचप्रमाणे मन आणि संकल्प हे भिन्न होत नाहीत."

 

शास्त्रकार मनाची व्याख्या करतात - संकल्पात्मकं मनः |  जोपर्यंत मनामध्ये संकल्प आहे, तोपर्यंत मन आहे आणि मन आहे तोपर्यंत संसाराचा अनुभव आहे.  मग संकल्प कोठून निर्माण होतो ?  असा शोध करीत गेलो तर समजते की, स्वस्वरूपाच्या अज्ञानामधून कामना निर्माण होते.  त्यामधून संकल्प, संकल्पामधून कर्म, कर्मामधून कर्मफळ आणि त्यामधून सुखदुःखादि संसार प्राप्त होतो.  एक छोटा संकल्प सुद्धा जीवाला संसारबद्ध करतो.  जीव जीवनभर कोट्यावधी संकल्प-कामना करतो आणि जन्मानुजन्मे जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये अडकतो.

 

याउलट जेथे कामना नाहीत, संकल्प नाहीत, तेथे संसारही लय पावतो.  जसे गाढ निद्रेमध्ये मन, संकल्प, कामना, कर्म, कर्तृत्व या सर्वांचाच लय झाल्यामुळे तेथे सुखदुःखादि संसारही अनुभवायला येत नाही.  परंतु निद्रेमधून मन जागृत झाले की, लगेच संकल्प प्रारंभ होतात.  जसे द्रवत्व हा पाण्याचा स्वभाव आहे.  स्पंदन-हालचाल हा वाऱ्याचा स्वभाव आहे.  तसेच, संकल्प करणे हा मनाचा स्वभाव आहे.  "म्हणून रामा !  संकल्प म्हणजेच मन आहे."

 

संकल्प चांगले असोत किंवा वाईट !  तेच जीवाला अनेक कर्मांच्यामध्ये प्रवृत्त करून बद्ध करतात.  म्हणून संकल्प म्हणजे मन आहे, असे येथे श्रीवसिष्ठमुनि सिद्ध करतात.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" Trutiya Utpatti Prakaran by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022

 



- हरी ॐ