Tuesday, October 29, 2024

मनाचा आणि दृश्याचा निरास | Dismissal Of Mind And Creation

 




मनाने ठरविले तर आत्मज्ञानाच्या श्रवणाने अशी एक अवस्था येते की, मन हे मन राहतच नाही.  तर ते केवलस्वरूप, शांतस्वरूप परब्रह्मामध्येच लय पावते.  मन चैतन्यस्वरूपामध्ये लय पावणे म्हणजे वृत्ति लय पावणे होय आणि वृत्ति लय पावणे म्हणजेच दृश्याचा निरास होणे होय.  याप्रकारे दृश्याचा निरास होण्यालाच ज्ञाते लोक 'मोक्ष' असे म्हणतात.

 

थोडक्यात जोपर्यंत अज्ञान आहे, तोपर्यंत मनाच्या सर्व क्रिया, व्यापार चालतात.  परंतु ज्ञानाने दृश्याचाच अभाव झाला की, मग मात्र मनही शिल्लक राहत नाही.  ज्याप्रमाणे वाऱ्यापासून संरक्षण केलेली दिव्याची ज्योत अतिशय शांतपणे तेवत राहते, त्याचप्रमाणे दृश्यरहित झालेले चित्त शांतस्वरूप परब्रह्मामध्ये लीन होते.  मनाचे मनपण संपते.  राहते ते चैतन्यस्वरूप !

 

म्हणून संसाराचा निरास करावयाचा म्हणजे फार काहीतरी मोठे करायचे असे नाही, तर फक्त जेथून हा संसार उत्पन्न झाला त्या मनाचाच प्रथम निरास केला पाहिजे.  प्रत्यक्ष संसाराचा निरास करणे शक्य नाही.  कारण संसारामध्ये तर अनंत, अगणित दृश्य विषय आहेत.  आपण कशा-कशाचा म्हणून निरास करणार ?  एका दृश्याचा निरास केला तरी दुसरे हजार दृश्य विषय समोर उभे राहतात.  म्हणूनच येथे श्रीवसिष्ठांनी युक्ति सांगितली आहे.  साधकाने दृश्याच्या मागे न लागता आपल्या मनाचाच शोध घ्यावा.  मनानेच मनाच्या साहाय्याने मनाचा निरास करावा.  मनाचा निरास केला की, आपोआपच मनोनिर्मित दृश्याचा निरास होतो.

 

मनाचा निरास करणे म्हणजे मनामधील अहंकार-ममकार-कर्तृत्व-भोक्तृत्व या सर्वांचा निरास करणे होय.  या अज्ञानप्रत्ययांचा निरास झाला की, मग साधक मुक्त होतो.  तीच मोक्षाची केवलस्थिति आहे.  मात्र यासाठी प्रथम मनाचे स्वरूप समजावून घ्यावे.  तसेच हे दृश्य विश्व मनोकाल्पित आहे, हे जाणावे आणि नंतरच ज्ञानाने, विचाराने, शास्त्रचिंतनाने, मनाच्या साहाय्याने मनाचा शोध घेऊन मनाचा निरास करावा.  त्यावेळी मन आपोआपच त्याच्या अधिष्ठानामध्ये म्हणजे चैतन्यामध्ये लय पावते.  दृश्य असणारे जग आणि द्रष्टा असणारे मन नाहीसे होते.  राहते ते केवल चैतन्यस्वरूप !  मन एकदा त्या स्थितीपर्यंत पोहोचले की, जीव हा जीव न राहता स्वतःच परब्रह्म स्वरूप होतो.  तो निर्वाणपदापर्यंत पोहोचतो.  हेच या ज्ञानाचे परमोच्च फळ आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ