विचार कसा करावा ? याचेही वर्णन वसिष्ठ मुनि करतात - कोहं कथमयं
दोषः संसाराख्य उपागतः | न्यायेनेति परामर्शो
विचार इति कथ्यते || हे रामा ! साधकाने स्वतःलाच हे प्रश्न विचारावेत की, मी
कोण आहे ? हा संसाररूपी दोष कोठून निर्माण
झाला ? अशा प्रश्नांचा न्यायाच्या साहाय्याने
शास्त्राधारे परामर्श करणे म्हणजेच 'विचार' होय.
प्रत्येक मनुष्याने जन्माला आल्याबरोबर 'मी'
म्हणजेच शरीर अशी कल्पना करून घेतली. त्यामुळे
शरीराच्या गुणधर्मविकारांशी तादात्म्य पावून मनुष्य जन्ममृत्युयुक्त, सुखी-दुःखी व
संसारी होतो. म्हणून मनुष्याने 'मी' आलो कोठून
? व 'मी' कोण आहे ? याचा विचार करणे गरजेचे आहे. व्यवहारामध्ये आपण एकमेकांना भेटल्यावर, तू कोण
? तुझे नाव-गाव काय ? तू कोठून आलास ? असे प्रश्न विचारतो. आपल्याला दुसऱ्याविषयी भयंकर उत्सुकता असते. परंतु वसिष्ठ मुनि येथे सांगतात की, मनुष्याने
ही जिज्ञासा दुसऱ्याविषयी निर्माण न करता स्वतःविषयी निर्माण करावी. 'मी' कोण ? माझे खरे स्वरूप काय आहे ? हे सभोवती दिसणारे दृश्य विश्व काय आहे ? माझ्याभोवती असणारे सगे-सोयरे, आप्त, पति-पत्नी,
पुत्र-पौत्र या सर्वांचे स्वरूप काय आहे ? याचा मनुष्याने अत्यंत युक्तियुक्त विचार करावा.
'मी' म्हणजे देह नाही. कारण देह हा तर दृश्य, नाशवान असून 'मी' त्या देहाचा
द्रष्टा आहे. त्यामुळे 'मी' शरीर, इंद्रियादि
संघातापासून नित्य भिन्न आहे. माझ्याव्यतिरिक्त
समोर दिसणारे दृश्य विश्व सुद्धा नाशवान असून मनोकाल्पित आहे.
इतकेच नव्हे तर मी माझे-माझे म्हणून निर्माण
केलेली सर्व नाती सुद्धा तात्कालिक व काल्पनिक आहेत. या जन्मापुरतीच मर्यादित आहेत. जन्मल्यापासून मृत्युपर्यंत फक्त काही काळ यांचा
संबंध आहे. ज्यांना मी माझे-माझे म्हणतो, ते
कोणीही माझे नाहीत. पैशापुरते, सत्तेपुरते,
उपभोगांच्यापुरतेच संबंध आहेत. आपलीच माणसे
आपला विश्वासघात करतात. धनवान मनुष्याला तर
स्वतःच्या पुत्रापासून सुद्धा भीति असते. या
जगात आपल्याशिवाय कोणाचेही काहीही अडत नाही. साधकाने शास्त्राधारे या सर्व अनित्य संसाराचे
अवलोकन करावे आणि त्यापासून विचाराने निवृत्त व्हावे.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–