"हे रामा ! संकल्प म्हणजेच मन ! संकल्पापासून मनाला भिन्न करता येत नाही. ज्याप्रमाणे पाण्यापासून द्रवत्वाला किंवा वाऱ्यापासून स्पंदनाला भिन्न करता येत नाही, त्याचप्रमाणे मन आणि संकल्प हे भिन्न होत नाहीत."
शास्त्रकार मनाची व्याख्या करतात - संकल्पात्मकं
मनः | जोपर्यंत मनामध्ये संकल्प आहे, तोपर्यंत
मन आहे आणि मन आहे तोपर्यंत संसाराचा अनुभव आहे. मग संकल्प कोठून निर्माण होतो ? असा शोध करीत गेलो तर समजते की, स्वस्वरूपाच्या
अज्ञानामधून कामना निर्माण होते. त्यामधून
संकल्प, संकल्पामधून कर्म, कर्मामधून कर्मफळ आणि त्यामधून सुखदुःखादि संसार प्राप्त
होतो. एक छोटा संकल्प सुद्धा जीवाला संसारबद्ध
करतो. जीव जीवनभर कोट्यावधी संकल्प-कामना
करतो आणि जन्मानुजन्मे जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये अडकतो.
याउलट जेथे कामना नाहीत, संकल्प नाहीत, तेथे
संसारही लय पावतो. जसे गाढ निद्रेमध्ये मन,
संकल्प, कामना, कर्म, कर्तृत्व या सर्वांचाच लय झाल्यामुळे तेथे सुखदुःखादि संसारही
अनुभवायला येत नाही. परंतु निद्रेमधून मन जागृत
झाले की, लगेच संकल्प प्रारंभ होतात. जसे
द्रवत्व हा पाण्याचा स्वभाव आहे. स्पंदन-हालचाल
हा वाऱ्याचा स्वभाव आहे. तसेच, संकल्प करणे
हा मनाचा स्वभाव आहे. "म्हणून रामा
! संकल्प म्हणजेच मन आहे."
संकल्प चांगले असोत किंवा वाईट
! तेच जीवाला अनेक कर्मांच्यामध्ये प्रवृत्त
करून बद्ध करतात. म्हणून संकल्प म्हणजे मन
आहे, असे येथे श्रीवसिष्ठमुनि सिद्ध करतात.
-
"योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२
- Reference: "Yogavashishtha" Trutiya Utpatti Prakaran by Param Poojya Swami
Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti
2022
- हरी ॐ–