आज आपले मन बाह्य विषयांच्यामध्ये आणि उपभोगांच्यामध्येच रममाण झालेले आहे. मन म्हणजेच वृत्ति होय. म्हणून मनामध्ये सतत अनेक प्रकारच्या विषयांच्याच वृत्ति येतात. अखंड रात्रंदिवस विषयांचेच चिंतन चालू आहे. इतकेच नव्हे तर मनामध्ये अनेक द्वन्द्व, विकल्प, शंका तसेच कामक्रोधादि, रागद्वेषादि विकारांनीच मन व्याप्त झालेले आहे. या बहिर्मुख, विषयासक्त मनाला प्रथम निवृत्त केले पाहिजे. हे मन निवृत्त केल्यानंतर मन कोठे ठेवावे ? भगवान म्हणतात - मय्येव मन आधत्स्व | माझ्यामध्ये – परमेश्वरामध्येच हे संकल्प-विकल्पयुक्त असणारे मन ठेवावे. परंतु त्यासाठी प्रथम परमेश्वराच्या सत्तेची जाणीव झाली पाहिजे. त्याचवेळी परमेश्वराविषयी मनामध्ये श्रद्धा, अस्तिक्यबुद्धि निर्माण होईल. परमेश्वर हाच सर्वश्रेष्ठ असून सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी असल्यामुळे तोच कर्तुं-अकर्तुं आहे. त्याच्याच सत्तेमुळे सर्व विश्वालाही सत्ता प्राप्त होते.
व्यवहारामध्ये आपण कार्यकारण संबंध मानतो. जसे सर्व अलंकारांचे कारण सुवर्ण आहे, घटांचे
कारण मृत्तिका आहे. त्याचप्रमाणे या जगताचेही उत्पत्तिस्थितिलयकारण परब्रह्मस्वरूप आहे. तेच सर्व विश्वामध्ये सत्तास्वरूपाने अखंडपणे अंतर्बाह्य व्याप्त झालेले आहे. हीच कार्यकारण मीमांसा समजावून घेतली तर
आपोआपच मनामधील सर्व शंका, संशय दूर होतील. परमेश्वर खरोखरच आहे की नाही ? अशा प्रकारचे विकल्पही संपतील. त्याचवेळी ते मन संशयरहित होऊन परमेश्वरामध्ये एकाग्र
होईल.
परमेश्वरामध्ये मन ठेवायचे म्हणजेच मनातील सर्व वृत्तींचा विषय परमेश्वर केला पाहिजे. म्हणजे डोळ्यांना जरी बाह्य विषय दिसला तरी मनामध्ये मात्र सतत सगुण परमेश्वराचीच वृत्ति निर्माण करावी. त्या वृत्तीमध्ये खंड पडू देऊ नये. म्हणजेच तुपाच्या संतत धारेप्रमाणे अखंडपणे परमेश्वरस्वरूपाचीच वृत्ति निर्माण करण्याचा अभ्यास करावा. किंवा दुसरा अर्थ – व्यवहारामध्ये आपल्याला सतत बाह्य विषयच दिसत असतात. त्यावेळी त्या सर्व विषयांच्यामध्ये परमेश्वरस्वरूप पाहावे. म्हणजेच त्यामध्ये परमेश्वराची अखंडपणे अनुस्यूत असणारी सत्ता पाहावी. जे जे या विश्वामध्ये सुंदर आहे, चंद्र, सूर्य, तारे, ग्रह, नक्षत्र, नद्या, पर्वत सर्व परमेश्वराचेच ऐश्वर्य, विभूति आहे, हे जाणून विश्वात्मक असणाऱ्या परमेश्वराचीच पूजा करावी. यामुळे मनामध्ये विषयांच्या वृत्ति आल्या तरीही परमेश्वराचेच चिंतन होईल.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–