Tuesday, July 30, 2024

विश्वरूपदर्शनयोगाचा विचार | Essence of “Vishwaroop Darshan Yog”

 



भगवंतांना अकराव्या अध्यायामध्ये सिद्ध करावयाचे आहे की, ‘मी’ परब्रह्मस्वरूप परमात्मा हेच विश्वाचे अभिन्ननिमित्तउपादानकारण आहे.  मीच सर्वज्ञ, सर्वशक्तिमान असून विश्वाचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता आहे.  या विश्वामध्ये परमात्म्याव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूला स्वतंत्र सत्ता नाही.  या विश्वाचे आणि विश्वामधील प्रत्येक नामरूपाचे आणि जीवांचे ऐश्वर्य, सत्ता, बल, वीर्य, सामर्थ्य, सौंदर्य वगैरे हे जीवांचे नसून परमेश्वराचेच आहे.

 

अर्जुनामधील अहंकाराचा नाश करण्यासाठीच भगवंतांनी अर्जुनाला त्याच्या इच्छेप्रमाणे विश्वरूप दाखविले.  अर्जुनाने भगवंताच्या शरीरामध्ये सर्व ब्रह्मांड तसेच ऋषिमुनि, देव-देवता, सूर्यमालिका, सर्व प्राणिमात्र, सुर-असुर, जीव इतकेच नव्हे तर कौरव-पांडवांची सेना आणि सर्व योद्धे, तसेच स्वतःलाही त्याने पाहिले.  ते अक्राळ-विक्राळ, भयंकर रौद्ररूप पाहून अर्जुनाला स्वतःचे नगण्य अस्तित्व समजले.  अर्जुन विनम्र होऊन भगवंताला पुन्हा एकदा प्रसन्न, शांत, आनंद देणाऱ्या चतुर्भुज रूपाने अवतीर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो.

 

अहंकाररहित विनम्र झालेल्या अर्जुनाला भगवान उपदेश करतात की, हे अर्जुना !  तू हृदयदौर्बल्य टाकून पुन्हा एकदा आत्मविश्वासाने ऊठ आणि युध्द कर.  शत्रूंचा नाश करून यश मिळाव आणि प्रारब्धाने जे राज्यभोग आहेत ते भोगून आनंदाने जीवन जग.  परंतु एक लक्षात ठेव की, तू कर्तुमकर्तुम् नाहीस.  तर मी विश्वनियंता असून मी कर्तुमकर्तुम् आहे.  माझ्या नियमाने विश्व चालते.  म्हणून अज्ञानाने विनाकारण अहंकार निर्माण करून स्वतःच्या कर्तृत्वाने संसारी बनू नकोस.  

 

जर तू माझा भक्त असशील, विवेकी साधक असशील तर – निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् |  तू अहंकार-ममकार परमेश्वरचरणी अर्पण करून कर्मफळाची अपेक्षा न ठेवता निःस्वार्थ आणि निष्काम भावाने कर्तव्यकर्म करीत राहा.  यामध्येच तुझे हित आहे.  कल्याण आहे.  अहंकार हेच सर्व दुःखांचे, संसाराचे कारण आहे.  म्हणून त्यामधून मुक्त होण्यासाठी अनन्य भावाने परमेश्वराची भक्ति कर, सेवा कर.  याच अनन्य भक्तीने सर्व साधक माझ्या पारमार्थिक स्वरूपाला प्राप्त होतात, यात संशय नाही.  यासाठीच सर्व साधकांनी अनन्य भक्तीने परमेश्वरप्राप्ति करून घ्यावी, हाच अभिप्राय आहे.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, July 23, 2024

अविचल ज्ञानी पुरुष | Unmoved Realized Being

 



वसिष्ठ मुनि येथे ज्ञानी पुरुषाचे वर्णन करीत आहेत.  ज्ञानी पुरुष अलिप्त असतो.  तो शांत होतो, असेही नाही.  तो आत आहे, असेही नाही किंवा बाहेर आहे असेही नाही.  तो निष्क्रिय आहे असेही म्हणता येत नाही, तो काही ग्रहणही करीत नाही किंवा तो कर्मामध्येच मग्न होतो असेही नाही.

 

ज्ञानी मनुष्य अज्ञानी मनुष्याप्रमाणे बहिरंगाने व्यवहार करताना दिसतो.  म्हणूनच तो शांत आहे असे म्हणावे तर तो अखंड कार्यामध्ये रत झालेला दिसतो.  तो निष्क्रिय आहे म्हणावे तर तो व्यवहार करताना दिसतो.  परंतु कार्यमग्न असताना सुद्धा तो अतिशय शांत दिसतो.  तो त्याच्या अंतरंगामध्ये आहे म्हणावे तर तो बाहेर लोकसंग्रह करताना दिसतो.  तो बाहेरच्या जगात जनसंपर्कामध्ये आहे असे म्हणावे तर सर्वांच्यामध्ये असूनही तो तेथे कोठेच नसल्याचे जाणवते.  तो कोणाला काही देत नाही म्हणावे तर तोच समाजाला भरभरून देत असतो.  तो कोणाकडून काही घेत नाही म्हणावे तर तो सर्वांची दुःखे घेत असतो.  राघवा !  ज्ञानी पुरुष कर्म करतो की करीत नाही, तो काही घेतो की घेत नाही, या कशाचेच वर्णन करता येत नाही.  कर्म करताना तो अज्ञानी पुरुषाप्रमाणे "मी कर्ता" असा भाव निर्माण करीत नाही.  तसेच कर्माचे फळ उपभोगताना त्यामध्ये आसक्तही होत नाही.

 

हे रामा !  असा हा ज्ञानी पुरुष गेलेल्या वस्तूची उपेक्षा करतो.  प्रारब्धाप्रमाणे प्राप्त झालेली वस्तु स्वीकार करतो.  जी वस्तु मिळाली नाही, त्या वस्तूची तो अपेक्षा करीत नाही आणि जी मिळाली आहे त्याचा तिरस्कारही करीत नाही.  तो क्षुब्ध होत नाही किंवा कधी अक्षुब्धही होत नाही.  याउलट अज्ञानी पुरुष मात्र मिळाले तरी आणि न मिळाले तरी दुःखीच असतो.  त्याला अनपेक्षित मिळाले तरी दुःखी होतो आणि त्याच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तरी तो अतृप्तच असतो.  मात्र ज्ञानी पुरुषाच्या मनामध्ये कोणतेही विकार उत्पन्न होत नाहीत.

 

ज्याप्रमाणे पावसाळ्यात समुद्रामध्ये शेकडो नद्यांनी प्रवेश केला किंवा उन्हाळ्यामध्ये सर्व नद्यांचे पाणी आटले तरी समुद्रामध्ये मात्र कोणताही बदल होत नाही.  समुद्र त्याच्या स्वरूपाने अचल राहतो.  तसेच ज्ञानी पुरुष सर्व काळी, सर्व अवस्थांच्यामध्ये अतिशय शांत व अविचल राहतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, July 16, 2024

गुरुकृपा आणि परमेश्वर कृपा | Grace Of Guru And God

 




साधुमहात्मे हेच अनंताच्या यात्रेमध्ये आश्रय आहेत.  एकवेळ ईश्वराची कृपा नसली तरी चालेल परंतु महात्म्यांची कृपा अत्यंत आवश्यक आहे.  गुरुनानक म्हणतात -  

गुरु गोविंद दोनु खड़े किसके लागू पाय |

बलिहारी गुरुदेव की गोविन्द दिये बताय ||

गुरु आणि परमेश्वर यांच्यामध्ये सद्गुरू हेच श्रेष्ठ आहेत, कारण परमेश्वर स्वतः आपले स्वरूप प्रकट करू शकत नाही.  तर ईश्वरनिष्ठ पुरुषच परमेश्वराचे स्वरूप उलगडून सांगतात.  आपल्या आतच परमेश्वराची प्रचीति करून देतात. आपलेच स्वतःचे स्वरूप हे परमेश्वरस्वरूप आहे हे प्रचीतीला आणून देतात.  याचाच अर्थ महात्मा हा परमेश्वरापासून भिन्न नसून साक्षात भूतलावर चालते बोलते परमेश्वर स्वरूप आहेत.  म्हणून त्यांची कृपा ही परमेश्वराची कृपा आहे.

 

अशा ईश्वरनिष्ठ लोकांची जर कृपा झाली, त्यांचा अनुग्रह मिळाला तर त्याच्यासारखा भाग्यवान कोणीही नाही.  त्यांची जवळीक आपल्या मनात श्रद्धा निर्माण करून भक्तीचा भाव निर्माण करील.  ज्याप्रमाणे निर्धन मनुष्याला पैशाची गरज असेल तर त्याने श्रीमंत धनिकाकडे जावे.  तोच त्याची गरज पूर्ण करू शकेल.  हे जसे आपण व्यवहारात पाहातो त्याप्रमाणे आपल्या मनात जर ईश्वरप्रेम नसेल आणि ते प्राप्त करावयाचे असेल तर ते कोणाकडून प्राप्त करावे ?  ज्यांच्याजवळ परमेश्वराबद्दल निःसीम दृढ प्रेम आहे, जे ईश्वररूपामध्ये तल्लीन, तन्मय झालेले आहेत अशा ईश्वरनिष्ठ महात्म्यांच्याकडे गेले पाहिजे.

 

महापुरुषांच्यामध्ये परमेश्वराविषयी अनन्य, उत्कट निष्ठा आणि भक्ति असल्यामुळे त्यांच्या सान्निध्याने आपल्यामध्ये श्रद्धा, भक्ति, निष्ठा निर्माण होईल.  ते प्रेम परमेश्वर सुद्धा देऊ शकत नाही, कारण परमेश्वर सुद्धा प्रेमाचा भुकेला आहे असे म्हटले आहे.  म्हणून महापुरुषांची कृपा प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे.

दुर्लभं त्रयमेवैतद्दैवानुग्रहहेतुकम् |  मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रयः ||       (विवेकचूडामणि)

या तीन अत्यंत दुर्लभ वस्तु परमेश्वराच्या कृपेनेच प्राप्त होतात - मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुषांचा आश्रय !


 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ



Tuesday, July 9, 2024

मनोमय विश्व | Mind-Generated World

 



श्रीवसिष्ठ मुनि येथे युक्तिवाद देऊन आणखी स्पष्टपणे सिद्ध करतात की, दृश्य विश्व हे केवळ मनोकाल्पित आहे.  त्यासाठीच येथे सांगतात की, ब्रह्माजी हा स्वतःच मनोमात्र म्हणजे मनोमय आहे.  ब्रह्माजीची उत्पत्ति ही प्रत्यक्ष पृथ्व्यदि पंचमहाभूतांच्यामधून  झालेली नाही.  त्यामुळे ब्रह्माजीला स्थूल देह नाही.  ब्रह्माजी हा केवळ मनोमात्र आहे.

 

त्यामुळेच हे रामा !  विश्व सुद्धा मनोमात्रच आहे. "जसे कारण तसे कार्य" असा न्याय आहे.  ब्रह्म हे कारण आणि विश्व हे ब्रह्माचे कार्य असल्यामुळे, विश्व हे ब्रह्माजीमधून निर्माण झाल्यामुळे जसा ब्रह्माजी तसेच विश्व असणार, हे गृहीत आहे.  म्हणून ब्रह्माजी मनोमय असल्यामुळे हे विश्वही मनोमय आहे, हे आपोआपच सिद्ध होते.  त्यामुळे आपणास स्थूल मानाने जरी हे विश्व दिसत असेल तरी विश्वाची निर्मिति प्रत्यक्ष पृथ्व्यदि पंचमहाभूतांच्यामधून झालेली नसून मनोमय ब्रह्माजीमधून झालेली आहे.  म्हणून हे भौतिक दिसणारे विश्व म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून ब्रह्माजीच्या मनाची केवळ एक कल्पना आहे.

 

हे विश्व म्हणजे ब्रह्माजीचेच स्वप्न आहे.  ब्रह्माजी हा अत्यंत शुद्धसंवित् स्वरूप असल्यामुळे त्याला आपल्या आतिवाहिक देहाची सतत स्मृति असते.  म्हणून त्याचे विश्वरूपी स्वप्न दीर्घकाळ चालू राहते.  तसेच ब्रह्माजीला आधिभौतिक देह नसल्यामुळे त्याची जागृतावस्था शक्य नाही आणि त्याला आतिवाहिक देहाचे विस्मरणच होत नाही.  म्हणून त्याचे स्वप्न म्हणजेच आपल्याला दिसणारे हे दृश्य विश्व दीर्घकाळ, चार युगे, कल्पांतापर्यंत राहते.  त्यानंतर ब्रह्माजीला त्याच्या आतिवाहिक देहाची विस्मृति होणे म्हणजेच महाप्रलय आहे.  त्यावेळी संपूर्ण दृश्य विश्व लय पावते.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022


 

- हरी ॐ


Tuesday, July 2, 2024

विभूतियोगाचा विचार | Essence of “Vibhooti Yog”

 




विश्वामध्ये प्रत्येक कार्याला कारण हे असतेच.  परमेश्वर हाच विश्वाचे अभिन्ननिमित्तउपादानकारण आहे, हे सिद्ध केलेले आहे.  परमेश्वरामधूनच विश्व निर्माण झाले व परमेश्वरामध्येच स्थित आहे.  त्यामुळे विश्व हेच परमेश्वराचे स्वरूप आहे.  प्रत्येक नामरूपामध्ये परमात्मा अनुस्यूत आहे.  सर्व मण्यांच्यामध्ये ज्याप्रमाणे सूत्र अनुस्यूत असते त्याप्रमाणे दृकदृश्यरूपाने असलेले हे जगत परमात्म्यामध्येच अनुस्यूत आहे.  म्हणून हे अर्जुना !  मी कोठे नाही असे नाही.  मी सर्वत्र आहे.  जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी ‘मी’ च आहे.  मी हे संपूर्ण विश्व अंतर्बाह्य व्यापून राहिलेलो आहे.  यामुळे हे सर्व विश्व माझ्या विभूतीच आहे.

 

हे लक्षात ठेवून भगवंतांनी ब्रह्मांडामधील चेतन-अचेतन, भौतिक आणि पारलौकिक अशा अत्यंत महत्वाच्या विभूति सांगितल्या आणि शेवटी स्पष्ट केले की, जेथे जेथे शक्ति, ऐश्वर्य, तेज, ओज, उत्कर्ष, सौंदर्य, सत्ता, मांगल्य वगैरे आहे, ते सर्व भगवंताचेच स्वरूप आहे.  त्यामुळे चालता, बोलता, उठता, बसता, फिरता प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वराचे चिंतन करावे.  येथे भगवंतांना जगाचे किंवा विषयाचे चिंतन अभिप्रेत नसून प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने परमेश्वराचे अनुसंधान अभिप्रेत आहे.  प्रेत्येक विषय ईश्वरानुसंधानासाठी साधनभूत होतो.  थोडक्यात यामधून परमेश्वराची अखंड उपासना होते.

 

निकृष्ट वस्तुमध्ये उत्कृष्ट वस्तु पाहाणे म्हणजेच उपासना होय.  उदा. शाळिग्रामामध्ये विष्णुरूप पाहाणे किंवा पिंडीमध्ये शिव पाहाणे.  वास्तविक शाळिग्राम हा विष्णु नाही किंवा पिंड ईश्वरस्वरूप नाही.  तरीही परमेश्वर सर्व विश्वाचे अभिन्ननिमित्तउपादानकारण असल्यामुळे या सर्व उपासना शक्य आहेत.  या सर्व अध्यस्त उपासना आहेत.  याचे फळ म्हणजे साधकाला मनाची एकाग्रता आणि चित्तशुद्धि प्राप्त होते.  व्यक्तिगत रागद्वेष, कामक्रोधादि विकारांचा प्रभाव कमी होतो.  अहंकार-ममकार समर्पण होतो.  संपूर्ण विश्व परमेश्वरमय पाहिल्यामुळे मनाची विशालता प्राप्त होते.  सर्व उच्चनीच भेद, वर्ण, आश्रम, जात, पंथभेद संपतात आणि मन अत्यंत शुद्ध व निर्मळ होते.  याचा परिणाम म्हणजे त्या भक्ताला सद्गुरूप्राप्ति होते आणि परमेश्वर स्वतःच सद्गुरूरूपाने भक्ताला उपदेश देऊन आत्मबोध देतो.  त्याचे अज्ञान ध्वंस करून आत्मप्रचीति देतो.  यामुळे भक्ताचे जीवन कृतार्थ होते.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ