Tuesday, July 30, 2024

विश्वरूपदर्शनयोगाचा विचार | Essence of “Vishwaroop Darshan Yog”

 



भगवंतांना अकराव्या अध्यायामध्ये सिद्ध करावयाचे आहे की, ‘मी’ परब्रह्मस्वरूप परमात्मा हेच विश्वाचे अभिन्ननिमित्तउपादानकारण आहे.  मीच सर्वज्ञ, सर्वशक्तिमान असून विश्वाचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता आहे.  या विश्वामध्ये परमात्म्याव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूला स्वतंत्र सत्ता नाही.  या विश्वाचे आणि विश्वामधील प्रत्येक नामरूपाचे आणि जीवांचे ऐश्वर्य, सत्ता, बल, वीर्य, सामर्थ्य, सौंदर्य वगैरे हे जीवांचे नसून परमेश्वराचेच आहे.

 

अर्जुनामधील अहंकाराचा नाश करण्यासाठीच भगवंतांनी अर्जुनाला त्याच्या इच्छेप्रमाणे विश्वरूप दाखविले.  अर्जुनाने भगवंताच्या शरीरामध्ये सर्व ब्रह्मांड तसेच ऋषिमुनि, देव-देवता, सूर्यमालिका, सर्व प्राणिमात्र, सुर-असुर, जीव इतकेच नव्हे तर कौरव-पांडवांची सेना आणि सर्व योद्धे, तसेच स्वतःलाही त्याने पाहिले.  ते अक्राळ-विक्राळ, भयंकर रौद्ररूप पाहून अर्जुनाला स्वतःचे नगण्य अस्तित्व समजले.  अर्जुन विनम्र होऊन भगवंताला पुन्हा एकदा प्रसन्न, शांत, आनंद देणाऱ्या चतुर्भुज रूपाने अवतीर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो.

 

अहंकाररहित विनम्र झालेल्या अर्जुनाला भगवान उपदेश करतात की, हे अर्जुना !  तू हृदयदौर्बल्य टाकून पुन्हा एकदा आत्मविश्वासाने ऊठ आणि युध्द कर.  शत्रूंचा नाश करून यश मिळाव आणि प्रारब्धाने जे राज्यभोग आहेत ते भोगून आनंदाने जीवन जग.  परंतु एक लक्षात ठेव की, तू कर्तुमकर्तुम् नाहीस.  तर मी विश्वनियंता असून मी कर्तुमकर्तुम् आहे.  माझ्या नियमाने विश्व चालते.  म्हणून अज्ञानाने विनाकारण अहंकार निर्माण करून स्वतःच्या कर्तृत्वाने संसारी बनू नकोस.  

 

जर तू माझा भक्त असशील, विवेकी साधक असशील तर – निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् |  तू अहंकार-ममकार परमेश्वरचरणी अर्पण करून कर्मफळाची अपेक्षा न ठेवता निःस्वार्थ आणि निष्काम भावाने कर्तव्यकर्म करीत राहा.  यामध्येच तुझे हित आहे.  कल्याण आहे.  अहंकार हेच सर्व दुःखांचे, संसाराचे कारण आहे.  म्हणून त्यामधून मुक्त होण्यासाठी अनन्य भावाने परमेश्वराची भक्ति कर, सेवा कर.  याच अनन्य भक्तीने सर्व साधक माझ्या पारमार्थिक स्वरूपाला प्राप्त होतात, यात संशय नाही.  यासाठीच सर्व साधकांनी अनन्य भक्तीने परमेश्वरप्राप्ति करून घ्यावी, हाच अभिप्राय आहे.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ