वसिष्ठ मुनि येथे ज्ञानी पुरुषाचे वर्णन करीत
आहेत. ज्ञानी पुरुष अलिप्त असतो. तो शांत होतो, असेही नाही. तो आत आहे, असेही नाही किंवा बाहेर आहे असेही नाही.
तो निष्क्रिय आहे असेही म्हणता येत नाही, तो
काही ग्रहणही करीत नाही किंवा तो कर्मामध्येच मग्न होतो असेही नाही.
ज्ञानी मनुष्य अज्ञानी मनुष्याप्रमाणे
बहिरंगाने व्यवहार करताना दिसतो. म्हणूनच तो
शांत आहे असे म्हणावे तर तो अखंड कार्यामध्ये रत झालेला दिसतो. तो निष्क्रिय आहे म्हणावे तर तो व्यवहार करताना दिसतो.
परंतु कार्यमग्न असताना सुद्धा तो अतिशय शांत
दिसतो. तो त्याच्या अंतरंगामध्ये
आहे म्हणावे तर तो बाहेर लोकसंग्रह करताना दिसतो. तो बाहेरच्या जगात जनसंपर्कामध्ये आहे असे म्हणावे
तर सर्वांच्यामध्ये असूनही तो तेथे कोठेच नसल्याचे जाणवते. तो कोणाला काही देत नाही म्हणावे तर तोच समाजाला
भरभरून देत असतो. तो कोणाकडून काही घेत नाही
म्हणावे तर तो सर्वांची दुःखे घेत असतो. राघवा ! ज्ञानी पुरुष कर्म करतो की करीत नाही, तो काही घेतो
की घेत नाही, या कशाचेच वर्णन करता येत नाही. कर्म करताना तो अज्ञानी पुरुषाप्रमाणे "मी कर्ता"
असा भाव निर्माण करीत नाही. तसेच कर्माचे फळ
उपभोगताना त्यामध्ये आसक्तही होत नाही.
हे रामा ! असा हा ज्ञानी पुरुष गेलेल्या वस्तूची उपेक्षा
करतो. प्रारब्धाप्रमाणे प्राप्त झालेली वस्तु
स्वीकार करतो. जी वस्तु मिळाली नाही, त्या
वस्तूची तो अपेक्षा करीत नाही आणि जी मिळाली आहे त्याचा तिरस्कारही करीत नाही.
तो क्षुब्ध होत नाही किंवा कधी अक्षुब्धही
होत नाही. याउलट अज्ञानी पुरुष मात्र मिळाले
तरी आणि न मिळाले तरी दुःखीच असतो. त्याला
अनपेक्षित मिळाले तरी दुःखी होतो आणि त्याच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तरी तो अतृप्तच
असतो. मात्र ज्ञानी पुरुषाच्या मनामध्ये कोणतेही
विकार उत्पन्न होत नाहीत.
ज्याप्रमाणे पावसाळ्यात समुद्रामध्ये
शेकडो नद्यांनी प्रवेश केला किंवा उन्हाळ्यामध्ये सर्व नद्यांचे पाणी आटले तरी समुद्रामध्ये
मात्र कोणताही बदल होत नाही. समुद्र त्याच्या
स्वरूपाने अचल राहतो. तसेच ज्ञानी पुरुष सर्व
काळी, सर्व अवस्थांच्यामध्ये अतिशय शांत व अविचल राहतो.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–