Tuesday, July 2, 2024

विभूतियोगाचा विचार | Essence of “Vibhooti Yog”

 




विश्वामध्ये प्रत्येक कार्याला कारण हे असतेच.  परमेश्वर हाच विश्वाचे अभिन्ननिमित्तउपादानकारण आहे, हे सिद्ध केलेले आहे.  परमेश्वरामधूनच विश्व निर्माण झाले व परमेश्वरामध्येच स्थित आहे.  त्यामुळे विश्व हेच परमेश्वराचे स्वरूप आहे.  प्रत्येक नामरूपामध्ये परमात्मा अनुस्यूत आहे.  सर्व मण्यांच्यामध्ये ज्याप्रमाणे सूत्र अनुस्यूत असते त्याप्रमाणे दृकदृश्यरूपाने असलेले हे जगत परमात्म्यामध्येच अनुस्यूत आहे.  म्हणून हे अर्जुना !  मी कोठे नाही असे नाही.  मी सर्वत्र आहे.  जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी ‘मी’ च आहे.  मी हे संपूर्ण विश्व अंतर्बाह्य व्यापून राहिलेलो आहे.  यामुळे हे सर्व विश्व माझ्या विभूतीच आहे.

 

हे लक्षात ठेवून भगवंतांनी ब्रह्मांडामधील चेतन-अचेतन, भौतिक आणि पारलौकिक अशा अत्यंत महत्वाच्या विभूति सांगितल्या आणि शेवटी स्पष्ट केले की, जेथे जेथे शक्ति, ऐश्वर्य, तेज, ओज, उत्कर्ष, सौंदर्य, सत्ता, मांगल्य वगैरे आहे, ते सर्व भगवंताचेच स्वरूप आहे.  त्यामुळे चालता, बोलता, उठता, बसता, फिरता प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वराचे चिंतन करावे.  येथे भगवंतांना जगाचे किंवा विषयाचे चिंतन अभिप्रेत नसून प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने परमेश्वराचे अनुसंधान अभिप्रेत आहे.  प्रेत्येक विषय ईश्वरानुसंधानासाठी साधनभूत होतो.  थोडक्यात यामधून परमेश्वराची अखंड उपासना होते.

 

निकृष्ट वस्तुमध्ये उत्कृष्ट वस्तु पाहाणे म्हणजेच उपासना होय.  उदा. शाळिग्रामामध्ये विष्णुरूप पाहाणे किंवा पिंडीमध्ये शिव पाहाणे.  वास्तविक शाळिग्राम हा विष्णु नाही किंवा पिंड ईश्वरस्वरूप नाही.  तरीही परमेश्वर सर्व विश्वाचे अभिन्ननिमित्तउपादानकारण असल्यामुळे या सर्व उपासना शक्य आहेत.  या सर्व अध्यस्त उपासना आहेत.  याचे फळ म्हणजे साधकाला मनाची एकाग्रता आणि चित्तशुद्धि प्राप्त होते.  व्यक्तिगत रागद्वेष, कामक्रोधादि विकारांचा प्रभाव कमी होतो.  अहंकार-ममकार समर्पण होतो.  संपूर्ण विश्व परमेश्वरमय पाहिल्यामुळे मनाची विशालता प्राप्त होते.  सर्व उच्चनीच भेद, वर्ण, आश्रम, जात, पंथभेद संपतात आणि मन अत्यंत शुद्ध व निर्मळ होते.  याचा परिणाम म्हणजे त्या भक्ताला सद्गुरूप्राप्ति होते आणि परमेश्वर स्वतःच सद्गुरूरूपाने भक्ताला उपदेश देऊन आत्मबोध देतो.  त्याचे अज्ञान ध्वंस करून आत्मप्रचीति देतो.  यामुळे भक्ताचे जीवन कृतार्थ होते.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ