Tuesday, November 30, 2021

अपरोक्षस्वरूपाचे ज्ञान | Direct Knowledge

 



शिष्य प्रश्न विचारेल की, तुम्ही जे अक्षरस्वरूप असणारे सत्य सांगता, ते सत्य या विश्वाचे कारण आहे, अधिष्ठान आहे.  पण ते सत्य कधीही डोळ्यांना अनुभवायला येत नाही.  ते सत्य अत्यंत अदृश्य आहे. म्हणजेच मला प्रत्यक्ष दिसत नाही.  परंतु येथे श्रुतीने शब्द वापरला – तद् एतद् सत्यम् |  - “ते हे सत्य प्रत्यक्ष दृश्य असणारे सत्य आहे.”  उदा. “हा घट” याचा अर्थ प्रत्यक्ष दिसणारा इंद्रियगोचर घट आणि “तो घट” म्हणजे इंद्रियांना अगोचर, इंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे, अप्रत्यक्ष असणारा घट होय.  येथे खरे तर श्रुतीने सत्याबद्दल सांगताना “ते सत्य” असे म्हणावयास पाहिजे होते.  पण तसे न सांगता श्रुति “तद् एतद् सत्यम् |” असे दोन्हीही शब्द वापरते.  कारण केवळ “हे सत्य” असे म्हटले असते तर ते सत्य घटाप्रमाणे इंद्रियगोचर झाले असते, आणि केवळ “ते सत्य” म्हटले असते, तर त्याचे ज्ञान घेणेच संभवत नाही.  म्हणून श्रुतीने येथे दोन सर्वनामे वापरलेली आहेत – ते हे सत्य आहे.

 

मग आम्ही या सत्याचे ज्ञान कसे घेणार ?  सत्यस्वरूप म्हणजे काय ?  दोन सर्वनामे वापरल्यामुळे शंका येईल की, मग ते सत्य प्रत्यक्ष आहे की अप्रत्यक्ष आहे ?  म्हणून याठिकाणी सर्व साधकांना सुलभतेने समजावे, आकलन व्हावे, यासाठी श्रुति स्वतःच दृष्टांत देऊन हे ज्ञान देते.  याचे कारण त्या सत्याचे ज्ञान अपरोक्षस्वरूपाने होणे आवश्यक आहे.

 

समजा, व्यवहारामध्ये “हा घट आहे” हे ज्ञान झाले, या ज्ञानामध्ये घट ही ज्ञेय वस्तु ज्ञात्यापासून भिन्न आहे.  मी घट पाहतो आणि म्हणतो की “हा घट आहे.”  त्या घटाचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही.  सत्याचे, चैतन्याचे, आत्मस्वरूपाचे ज्ञान मात्र घटाप्रमाणे नाही.  आत्मा सच्चिदानंदस्वरूप आहे.  आत्म्याचा आणि माझा काही संबंध नाही, असे ज्ञान नसून आत्म्याचे ज्ञान अपरोक्षस्वरूपाने प्राप्त करणे हेच कर्तव्य आहे. “तो आनंदस्वरूप आत्मा मी आहे”, म्हणजेच ज्ञेय आणि ज्ञाता हे अभेद स्वरूपाचे आहेत, हे ज्ञान अभेदत्वाने प्राप्त होणे आवश्यक आहे.  म्हणून आत्मा समजणे फार सोपे आहे पण “तो आत्मा मी आहे” हे समजणे अत्यंत अवघड आहे.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ