Tuesday, November 9, 2021

एकत्वाची दृष्टी | Seeing One-ness

 सर्व भूतमात्रे अज्ञानकल्पित असून परब्रह्माच्या अधिष्ठानामध्येच अस्तित्वात असतात.  या सर्वांच्यामध्ये तत्त्वज्ञानी पुरुष सन्मात्रस्वरूपाने एकत्व पाहातो.  यासाठी दृष्टांत देतात – ब्रह्मांडे सूर्यवत् |  गृहेषु दीपवत् |  घटादिषु आकाशवत् |

 

१) ब्रह्मांडे सूर्यवत् – सर्व विश्वाला प्रकाशमान करणारा सूर्य आहे.  तो विश्वामधील अंधारच नाहीसा करून एकाच वेळी सर्व विषयांना प्रकाशमान करतो.  त्याच्या प्रकाशामध्ये उच्चनीचादि, श्रेष्ठकनिष्ठ वगैरे कोणत्याही प्रकारचा भेद नसतो. सर्वांना सारखाच प्रकाश देतो.

 

२) गृहेषु दीपवत् – घरामध्ये ठेवलेला दीप सुद्धा स्वतःच्या प्रकाशाने घरातील अंधार नाहीसा करून जे विषय त्याच्या सान्निध्यामध्ये येतात त्या सर्वांना तो प्रकाशमान करतो.  त्याच्यामध्येही भेद नाही.  सूर्याचा तेजःपुंज प्रकाश आणि दिव्याचा लुकलुकणारा प्रकाश या दोन्हींच्या प्रकाशामध्ये कोणताही भेद नाही.  दोघेही प्रकाशमान करणारे आहेत.

 

३) घटादिषु आकाशवत् – वास्तविक स्वरूपाने आकाश सर्वत्र असून सर्वव्यापी आहे.  त्यामध्ये कोणतेही भेद नाहीत.  आकाशच सर्वांना जागा देते, आकाशामध्येच घटाची निर्मिति होते आणि तेच आकाश घटाला जो जो आकार मिळेल त्याप्रमाणे आकार देते.  घटाकाश, मठाकाश, करकाकाश वगैरे. किंवा ५, १०, २५, ५० किलोचा डबा, पिंप वगैरे आकार घेते.  परंतु आकाश कोणत्याही नामरूपाशी तादात्म्य न होता अखंड, सर्वव्यापी राहाते.  ते एक असूनही अनेक झाल्यासारखे भासते आणि अनेकत्व येऊनही एकच राहाते.

 

त्याचप्रमाणे सम्यक विज्ञानवान योगी शरीर, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार, अज्ञान यापासून भिन्न असलेले, पंचकोशातीत आणि तीन्हीही अवस्थांचे साक्षीस्वरूप असलेले निरुपाधिक, निर्गुण, निर्विशेष, कूटस्थअसंगचिद्रूपसाक्षीचैतन्यस्वरूप हेच ‘अहं’ या शब्दाने निर्देशित केलेले खरे तत्त्व आहे.  तेच माझे स्वरूप आहे.  नव्हे सर्वांचे स्वरूप आहे असे नि:संशयपणे जाणतो.  त्यामुळे त्या स्वरूपामध्ये उपाधींनी निर्माण केलेले भेद गळून पडतात आणि तो योगी स्वतःचे आत्मतत्त्व सर्व भूतमात्रांच्यामध्ये आणि सर्व भूतमात्रे अभेद, अद्वय आत्मतत्त्वामध्ये पाहातो.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ