१) जीव कृमीकीटकाप्रमाणे अत्यंत कामुक,
भोगवादी, विषयासक्त असतो. तापत्रयाने
होरपळून, पश्चात्तापाने आपण जन्मभर अत्यंत अधर्माने, अनीतीने वागलो, आता तरी
चांगली कर्मे व्हावीत असा विचार येतो. धर्मकार्य
करण्याची प्रवृत्ति होऊन ती वाढत जाऊन शेवटी तो धार्मिक होतो.
२) त्याच्या स्वैर जीवनावर आपोआपच धर्माचे
नियमन होऊन त्याची पशुतुल्य वृत्ति कमी कमी होते. इंद्रियांच्यावर काही प्रमाणामध्ये संयमन होऊन
धर्मकर्मामध्ये निष्ठा प्राप्त होते. परंतु
तो धार्मिक असला तरी सकामच असतो.
३) सर्व विषयभोग भोगल्यानंतर आणखी काही
मिळवावे असे वाटतच नाही. त्याच्यामध्ये
काहीही न मागण्याची वृत्ति निर्माण होते. हळूहळू निष्कामतेने परमेश्वराची मनोभावे सेवा
करतो. अनेक जन्म निष्काम अनुष्ठान
केल्यामुळे ईश्वराच्या कृपेने चित्तप्रसाद - चित्तशुद्धी मिळते.
४) वैराग्यवृत्ति निर्माण होते. हे वैराग्य केवळ बुद्धीच्या तर्काने मिळत
नसून चित्तशुद्धीचा सहज-स्वाभाविक परिपाक आहे. विषयांच्या मर्यादा, क्षणभंगुरत्व, तसेच फोलपणा
समजतो. विषयभोगामध्ये यत्किंचित
लेशमात्र सुद्धा सुख, आनंद नाही हे पुरेपूर समजते, उमजते.
५) विवेकजन्य वैराग्यामुळे सर्वच तुच्छ,
नाशवान आहे हे समजल्यामुळे आपोआपच बुद्धिच बुद्धीला प्रश्न विचारते की, मग या
विश्वामध्ये नित्य, शाश्वत, सत्य आहे का ? असल्यास ते काय आहे ? ते मला मिळेल का ? त्याला अंतःकरणामध्ये शाश्वत सत्य जाणण्याची
जिज्ञासा निर्माण होते.
६) आत्मजिज्ञासा निर्माण झाली की ती पूर्ण
कशी होईल, यासाठी तो साधक प्रयत्न करतो. परमेश्वराच्या
कृपेने आणि आणि सर्व साधनेचा परिपाक होऊन त्याला गुरुप्राप्ति होते. मागच्या जन्मामधील सर्व संस्कार जागृत होऊन
गुरूंना तो नितांत श्रद्धेने अनन्यभावाने शरण जातो.
७) गुरुप्राप्तीनंतर खऱ्या अर्थाने त्याच्या
जीवनाला दिशा, प्रेरणा मिळते. गुरुमुखामधून
शास्त्राचे श्रवण, मनन आणि अखंड निदिध्यासना करतो आणि शेवटी त्याला सम्यक ज्ञानप्राप्ति
होऊन तो स्वस्वरूपामध्ये निष्ठा प्राप्त करतो. त्याचे मन स्थिर होते. त्याला सहजावस्था प्राप्त होते.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–