Monday, September 27, 2021

ध्यान आणि शरीर | Dhyan And The Role of Body

 



आपणच आपले स्वतःचे शरीर अन्य शरीराप्रमाणे दृश्य विषय म्हणून पाहावे.  यामध्ये पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाचे क्रमाक्रमाने निरीक्षण करावे.  हे निरीक्षण करताना दोन गोष्टींची अत्यंत काळजी घ्यावी.  १) हे निरीक्षण यंत्राप्रमाणे होऊ न देता अत्यंत सावधान आणि जाणीवपूर्वक करावे.  आणि २) निरीक्षण करताना शरीर हे नित्य दृश्य आहे, मी द्रष्टा आहे याची सतत जाणीव ठेवावी.  म्हणजेच शरीराशी तादात्म्य न होता अन्य विषयांच्यामध्ये ज्याप्रमाणे भाव असतो त्याप्रमाणे साक्षीभावाने पाहावे.  यामध्ये शिथिलता आणू न देता शरीर घटाप्रमाणेच दृश्य म्हणून पाहावे.  (See your body as an object.)  याचा काही काळ अभ्यास करावा.

 

याप्रकारे शरीरापासून अलिप्त राहून आपण आपल्याच शरीराचा साक्षी आहे हा भाव आत्मसात होईल.  यामुळे शरीर व इंद्रियांशी असलेले तादात्म्य हळूहळू कमी होईल आणि इंद्रिये स्वस्थ होऊन आपापल्या स्थानामध्ये शांत होतील.  त्यांच्यामध्ये असलेली वखवख, व्याकुळता संपेल व इंद्रियांची उपशमा होईल.  येथे उपशमा म्हणजेच शरीर व इंद्रियांशी झालेले तादात्म्य कमी होणे होय.

 

या अभ्यासाचे फळ म्हणजे शरीराचे सर्व अवयव शिथिल (tensionless relaxation) होतात.  शरीरातील सुंदपणा आणि जडत्व नाहीसे होऊन ते अगदी हलके झाल्यासारखे वाटते.  शरीर असूनही शरीर नसल्यासारखे वाटते.  ज्याप्रमाणे एक किलो कापसाचा गोळा ठेवला तर आपल्याला वजन अनुभवायला येते.  परंतु तोच एक किलो कापूस पिंजून साफ केला आणि फुगवला तर तोच एक किलो कापूस असूनही त्याचे वजन वाटत नाही.  त्याचप्रमाणे मनाचे शरीराशी झालेलं तादात्म्य कमी केले तर शरीर व इंद्रिये अत्यंत तणावरहित होतात व आपोआपच इंद्रियांची उपशमा होऊन मन अंतर्मुख होते.  मनाचे भरकटणे कमी होते.  चंचलता कमी होते आणि मन काही प्रमाणामध्ये एकाग्र व शांत होते.

 

यामध्ये मनाला दोन क्रिया दिलेल्या आहेत – १) शरीराचे जाणीवपूर्वक निरीक्षण करणे आणि २) हे शरीर माझे आहे हा सुद्धा भाव न ठेवता साक्षीरूपाने राहाणे.  जितक्या सावधानतेने तटस्थ राहून शरीराचे निरीक्षण केले जाईल तितक्या प्रमाणामध्ये मन सर्व बाह्य विषयांच्यापासून निवृत्त होईल.  

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, September 21, 2021

शांति आणि योगसाधना | Silence and Yog Sadhana

 




नीरव शांतस्वरूप आपल्या आतच आहे.  परंतु बहिर्मुख मनामुळे ते असूनही अनुभवायला येत नाही.  त्यासाठी सूर्यास्ताप्रमाणे मनामधील सर्व बहिर्मुख वृत्ति हळुहळू निवृत्त केल्या तर मनामध्येच असलेली परंतु मनाच्याही अतीत असलेली शांति अनुभवायला मिळेल.  सर्व वृत्तींचा निरोध करून मन निवृत्त करणे आणि स्वस्वरूपामध्ये स्थिर करण्यासाठीच योगसाधना आहे.

 

याचा अर्थ शांति बाह्य विषयांमध्ये नाही किंवा घटपटादिप्रमाणे एखादा विषय नाही.  ती आपल्या आतच आहे.  ज्याप्रमाणे समुद्राच्या पृष्ठभागावर एकामागे एक समुद्राच्या लाटा सतत येत असतात, त्यामुळे आपल्याला खळखळाट दिसतो.  इतकेच नव्हे, तर एखादा मनुष्य पोहायला लागला तर सतत आघात होणाऱ्या लाटांच्यामुळे हेलकावे खात राहातो.  परंतु त्याच लाटांच्या खाली समुद्राच्या तळाशी गेले तर तेथे लाटांचे आघात होत नाहीत, हेलकावे नाहीत.  याउलट आपल्याला नीरव शांत स्थिति अनुभवायला येते.  त्याचप्रमाणे आपण सर्व मनाच्या अवस्थेमध्येच जगत आहोत.  त्यामुळे, लाटांच्याप्रमाणे मनामध्ये निर्माण होणाऱ्या विषयांच्या वृत्ति, रागद्वेष, कामक्रोधादि विकारांचे आघात सतत होत असतात.  असा एकही क्षण नाही की, त्यावेळी रागद्वेष नाहीत, द्वंद्व नाहीत, विक्षेप नाहीत.  या सर्व ऊर्मींच्यामुळे आपण मनाबरोबर हेलकावे अनुभवतो.  आपल्यामधील शांति, सुख हरवून बसतो.  हेच मन स्वरूपाच्या शांतीपासून वंचित करते.

 

म्हणून जर आपल्याला खरोखरच नीरव शांतस्वरूप अनुभवायचे असेल तर मनानेच मनाच्या साहाय्याने मनाच्या अतीत जाण्याचा अभ्यास केला पाहिजे.  मनाच्या अंतरंगामध्ये शांतीचा शोध घेतला पाहिजे.  जसे आपण अंतरंगामध्ये आत जावू त्या प्रमाणामध्ये मनामध्ये वर वर दिसणारे सर्व विक्षेप, संकल्प-विकल्प, द्वंद्व, रागद्वेषांचे परिणाम कमी कमी होतील आणि मन तणावरहित होईल.  मनानेच निर्माण केलेले विचारांचे दडपण कमी होईल.  हळूहळू शांतीचा उत्कर्ष होईल.  यासाठीच योगसाधना आहे.  थोडक्यात मनानेच मनातील सर्व वृत्तींचा त्याग करून मनाने निर्माण केलेल्या सर्व काल्पनिक बंधनांच्यामधून मुक्त होऊन स्वस्वरूपाच्या नीरव शांत स्थितीमध्ये स्वस्थ राहाणे हीच योगाची परमोच्च अवस्था आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ


Tuesday, September 14, 2021

अहंकारापासून रक्षण | God Protects from Ego

 



या कथानकामध्ये श्रुति सांगते की, देवासुर संग्रामामध्ये देवांचा विजय झाला.  व्यावहारिक दृष्टीने हा विजय देवांचा असेल तरी हा प्रत्यक्ष देवांचा विजय नव्हता, कारण देवांना प्राप्त झालेले बल, सामर्थ्य हे त्यांचे स्वतःचे नसून त्यांच्या उपाधीमध्ये संनिविष्ट असलेल्या सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, विश्वनियामक परमेश्वराचे ते सामर्थ्य होते.

 

परंतु देव सत्त्वगुणी असतील तरीही दुर्दैवाने त्यांच्यामध्ये अभिमान निर्माण झाला.  यामुळेच देव विचार करायला लागतात की, हा विजय आमचाच आहे.  हा विजय आमच्याच कर्तृत्वाने, सामर्थ्याने व पुरुषार्थाने मिळाला आहे.  यात ईश्वराची कृपा वगैरे काही नाही.  यामुळे देव या विजयाने धुंद, उन्मत्त झाले.  हा विजय व विजायामधून प्राप्त झालेले फळ म्हणजेच महिमा, विभूति आमचीच आहे, असा चुकीचा ग्रह त्यांनी केला.  त्यांच्यामध्ये कर्तृत्व, भोक्तृत्व भाव निर्माण झाला.  अहंकार-ममकारादि प्रत्यय निर्माण झाले.

 

देवांच्या आत स्थित असणाऱ्या सर्वसाक्षी ईश्वराने देवांचा हा मिथ्या अभिमान तात्काळ जाणला.  त्यामुळे देवांच्यावरील करुणेने युक्त होऊन ब्रह्माने विचार केला की, देवांना निर्माण झालेल्या या व्यर्थ, मिथ्या अभिमानामुळे देवांचा देवपणा नष्ट होऊन दैवीगुणसंपत्तीचा ऱ्हास होईल.  देवांच्यामध्ये दैवीगुणांची जागा आसुरीगुण घेतील.  आसुरीगुणसंपत्तीचे प्राबल्य वाढल्यामुळे देव स्वतःच सतःच्या नाशाला कारण होतील.  म्हणजे असुरांच्याप्रमाणेच देवांचाही पराजय होईल.  जगाच्या सुस्थितीला आवश्यक असणारी दैवीगुणसंपत्ति नष्ट होईल व हळुहळू जगाचाच ऱ्हास होईल.  आपणच निर्माण केलेल्या या मानवजातीचा नाश होईल.

 

यामुळे ब्रह्माने ठरविले की, देवांच्यामधील अभिमान, मद हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे नाहीसा केलाच पाहिजे.  देवांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.  देवांनी पुन्हा देवांच्यासारखेच वागावे.  ईश्वरी परमोच्च सत्ता मान्य करून धर्माचरणात व्हावे.  म्हणून देवांना धडा शिकविण्यासाठी, त्यांचा अभिमान नष्ट करण्यासाठी, त्यांना पुन्हा देवत्वाच्या मार्गावर आणण्यासाठी परब्रह्म देवांच्यासमोर आपल्या योगमायेच्या साहाय्याने अचानकपणे अवतीर्ण झाले.

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ





Thursday, September 9, 2021

सज्जनांचे रक्षण का होते ? | Why Are The ‘Good’ Protected ?

 



विश्वामधील सर्व विभूति, महिमा हा परमेश्वराचाच आहे. भगवान म्हणतात –

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा |

तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंSशसंभवम् ||               (गीता अ. १०-४१)

विश्वामध्ये जे काही निर्माण झालेले आहे, ते सर्व माझ्या – परमात्म्याच्या तेजाचा अंश आहे.

 

येथे एक शंका येईल की, ब्रह्मस्वरूप देवांच्यामध्येही आहे व तेच ब्रह्मस्वरूप असुरांच्यामध्येही आहे.  परब्रह्मानेच देवासुरांची निर्मिती केलेली आहे. मग ब्रह्माने फक्त देवांचाच विजय व्हावा, असा विचार का बरे केला ?  किंवा ब्रह्माने फक्त देवांसाठीच का बरे विजय प्राप्त केला ?  भाष्यकार याचे उत्तर देतात की, देव व दानव यांच्यामध्ये जरी एकच ईश्वरी सत्ता असेल तरी त्यांच्या उपाधींचे गुणधर्म मात्र भिन्न-भिन्न आहेत.  देव हे दैवीगुणसंपन्न, धर्मपरायण, जीवनमूल्ये, नीतिमूल्ये, आचारधर्म यांनी युक्त आहेत.  याउलट असुर मात्र अहंकार, कामक्रोधादि विकार, लोभ, दंभ, दर्प, उन्मत्तपणा, सत्तापिपासा, भोगलंपट वृत्ति, अधर्म, भ्रष्टाचार, व्यभिचार या आसुरीगुणांनी युक्त आहेत.

 

जगताचा व्यवहार चालण्यासाठी जशी रजोगुणाची आवश्यकता आहे, त्याप्रमाणेच जगताची सुस्थिति राखण्यासाठी रजोगुणापेक्षाही सत्त्वगुणाची अधिक गरज आहे.  जग याचा अर्थच व्यक्ति, कुटुंब, समाज, राष्ट्र, देश, संस्था, संपूर्ण मानवजात होय.  या सर्वांचा उत्कर्ष होऊन समाजामध्ये स्थिरता येण्यासाठी व जगामध्ये शांतता व सौख्य प्रस्थापित होण्यासाठी दैवी मूल्यांची नितांत आवश्यकता आहे.  आचार्य सांगतात – ब्राह्मणत्वस्य हि रक्षणेन वैदिकः धर्मः रक्षितः स्यात् |  (शांकरभाष्य)

दैवीगुणसंपत्तीचे, ब्राह्मणत्वाचे, म्हणजेच सात्विक गुणांचे रक्षण झाले तरच धर्माचे रक्षण होते व धर्माचे रक्षण झाले तरच राष्ट्राचे व पर्यायाने जगताचे रक्षण होऊ शकते.

 

धर्मामध्येच संपूर्ण जगताची प्रतिष्ठा आहे.  म्हणून या कलियुगामध्ये ठिकठीकाणी, प्रत्येक राष्ट्रामध्ये स्वैराचरण करणाऱ्या समाजकंटकांच्यापासून मानवजातीचे रक्षण करावयाचे असेल तर धर्माचरण, नीतिमूल्ये, आचारसंहिता, जीवनमूल्ये यांचे रक्षण होणे अपरिहार्य आहे.  यासाठीच जगाचे सर्व व्यवहार धर्माधीष्ठित होऊन विश्वामध्ये स्थिरता, सुसूत्रता येण्यासाठीच ब्रह्माने देवांच्या विजयासाठी असुरांचा पराभव केला.  दैवीगुण विजयी झाले.

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ