Thursday, September 9, 2021

सज्जनांचे रक्षण का होते ? | Why Are The ‘Good’ Protected ?

 विश्वामधील सर्व विभूति, महिमा हा परमेश्वराचाच आहे. भगवान म्हणतात –

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा |

तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंSशसंभवम् ||               (गीता अ. १०-४१)

विश्वामध्ये जे काही निर्माण झालेले आहे, ते सर्व माझ्या – परमात्म्याच्या तेजाचा अंश आहे.

 

येथे एक शंका येईल की, ब्रह्मस्वरूप देवांच्यामध्येही आहे व तेच ब्रह्मस्वरूप असुरांच्यामध्येही आहे.  परब्रह्मानेच देवासुरांची निर्मिती केलेली आहे. मग ब्रह्माने फक्त देवांचाच विजय व्हावा, असा विचार का बरे केला ?  किंवा ब्रह्माने फक्त देवांसाठीच का बरे विजय प्राप्त केला ?  भाष्यकार याचे उत्तर देतात की, देव व दानव यांच्यामध्ये जरी एकच ईश्वरी सत्ता असेल तरी त्यांच्या उपाधींचे गुणधर्म मात्र भिन्न-भिन्न आहेत.  देव हे दैवीगुणसंपन्न, धर्मपरायण, जीवनमूल्ये, नीतिमूल्ये, आचारधर्म यांनी युक्त आहेत.  याउलट असुर मात्र अहंकार, कामक्रोधादि विकार, लोभ, दंभ, दर्प, उन्मत्तपणा, सत्तापिपासा, भोगलंपट वृत्ति, अधर्म, भ्रष्टाचार, व्यभिचार या आसुरीगुणांनी युक्त आहेत.

 

जगताचा व्यवहार चालण्यासाठी जशी रजोगुणाची आवश्यकता आहे, त्याप्रमाणेच जगताची सुस्थिति राखण्यासाठी रजोगुणापेक्षाही सत्त्वगुणाची अधिक गरज आहे.  जग याचा अर्थच व्यक्ति, कुटुंब, समाज, राष्ट्र, देश, संस्था, संपूर्ण मानवजात होय.  या सर्वांचा उत्कर्ष होऊन समाजामध्ये स्थिरता येण्यासाठी व जगामध्ये शांतता व सौख्य प्रस्थापित होण्यासाठी दैवी मूल्यांची नितांत आवश्यकता आहे.  आचार्य सांगतात – ब्राह्मणत्वस्य हि रक्षणेन वैदिकः धर्मः रक्षितः स्यात् |  (शांकरभाष्य)

दैवीगुणसंपत्तीचे, ब्राह्मणत्वाचे, म्हणजेच सात्विक गुणांचे रक्षण झाले तरच धर्माचे रक्षण होते व धर्माचे रक्षण झाले तरच राष्ट्राचे व पर्यायाने जगताचे रक्षण होऊ शकते.

 

धर्मामध्येच संपूर्ण जगताची प्रतिष्ठा आहे.  म्हणून या कलियुगामध्ये ठिकठीकाणी, प्रत्येक राष्ट्रामध्ये स्वैराचरण करणाऱ्या समाजकंटकांच्यापासून मानवजातीचे रक्षण करावयाचे असेल तर धर्माचरण, नीतिमूल्ये, आचारसंहिता, जीवनमूल्ये यांचे रक्षण होणे अपरिहार्य आहे.  यासाठीच जगाचे सर्व व्यवहार धर्माधीष्ठित होऊन विश्वामध्ये स्थिरता, सुसूत्रता येण्यासाठीच ब्रह्माने देवांच्या विजयासाठी असुरांचा पराभव केला.  दैवीगुण विजयी झाले.

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013- हरी ॐ