Tuesday, August 24, 2021

आत्मज्ञानाची द्वारे | The Doors of Self-Knowledge

 



आपल्याला बुद्धीच्या साहाय्याने ज्या ज्या विषयांचे, प्रत्ययांचे ज्ञान होते, बोध होतो, ती प्रत्येक ज्ञानवृत्ति, बोधवृत्ति म्हणजेच जणु काही आत्मज्ञानाची द्वारे आहेत.  कारण या प्रत्येक बोधवृत्तीमधून त्या त्या विषयाचे तर ज्ञान होतेच, परंतु त्या त्या ज्ञानवृत्तीमधून त्या ज्ञानवृत्तीच्या अधिष्ठानाचे म्हणजे आत्मचैतन्याचेच ज्ञान होत असते.  सर्व अंतःकरणवृत्ति या प्रकाश्य असून आत्मचैतन्यस्वरूप सर्व वृत्तींचे प्रकाशक आहे.  त्यामुळे आत्मचैतन्य हे त्या वृत्तींच्यापासून अत्यंत विलक्षण स्वरूपाचे आहे.  लोखंडाच्या गोळ्यामधील अग्नि जसा त्या गोळ्यापासून अत्यंत भिन्न आहे, तसेच सर्व वृत्तींच्यामध्ये व्याप्त असणारे, अधिष्ठानरूप असणारे चैतन्य सर्व वृत्तींच्यापासून अत्यंत भिन्न स्वरूपाचे आहे.  म्हणूनच सर्व बुद्धिवृत्तींच्यामधून अधिष्ठानरूपाने चैतन्यच जाणले जात असल्यामुळे सर्व बुद्धिवृत्ति याच जणु काही आत्म्याच्या प्राप्तीसाठी द्वारे आहेत.

 

म्हणजेच प्रत्येक प्रत्ययामध्ये, ज्ञानवृत्तीमध्ये त्या त्या वृत्तीच्या विषयाला प्रकाशमान करणारा जो प्रत्यगात्मा प्रकट होतो, तो प्रकाशस्वरूप, ज्ञानस्वरूप आत्मा म्हणजेच ब्रह्मस्वरूप आहे.  हेच ब्रह्माचे खरे, यथार्थ ज्ञान आहे.  उदा. घटज्ञानामध्ये ‘घट’ हा ज्ञेय विषय आहे.  घटाचे ज्ञान प्राप्त करावयाचे असेल तर घटाच्या अज्ञानाचा नाश केला पाहिजे.

 

घटाच्या अज्ञानाचा नाश करावयाचा असेल तर घटाची ज्ञानवृत्ति म्हणजेच घटवृत्ति उदयाला आली पाहिजे.  घटाकार वृत्ति उदयाला येण्यासाठी प्रथम घटाव्यतिरिक्त असणाऱ्या अन्य वृत्तींचा निरास झाला पाहिजे.  यानंतर ‘घट’ ही वस्तु डोळ्यासमोर ठेवली पाहिजे.  त्यानंतर डोळे निर्दोष असून ते उघडे ठेवले पाहिजेत.  त्यानंतर डोळ्यांच्या मागे मन म्हणजेच वृत्ति पाहिजे.  मग ती वृत्ति डोळ्यांच्या माध्यामामधून ‘घट’ या ज्ञेय विषयापर्यंत जाऊन ती घटाकार झाली पाहिजे.  ती वृत्ति ज्ञेय विषयाशी तादात्म्य पावल्यानंतर ती घटाकार होते. येथपर्यंत ठीक आहे.

 

परंतु त्यापुढे ती वृत्ति ज्ञात्याकडून जाणली गेली पाहिजे.  घटवृत्ति ही स्वतःच जड आहे.  तसेच, ही वृत्ति निर्मित, कार्य असल्यामुळे जड स्वरूपाचीच आहे.  त्यामुळे घटवृत्ति स्वतःच स्वतःला जाणू शकत नाही.  “मी घट आहे”, असे म्हणू शकत नाही.  सर्व बोधवृत्ति निर्मित असल्यामुळे त्या जड, अचेतन आहेत.  या सर्व बुद्धिवृत्तींना प्रकाशमान करणारे चैतन्यच आहे.

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Mataji Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ