सर्व बोधवृत्ति निर्मित असल्यामुळे त्या जड, अचेतन आहेत. या
सर्व बुद्धिवृत्तींना प्रकाशमान करणारे चैतन्यच आहे. कसे ? तर
व्यावहारिक ज्ञानामध्ये ज्ञाता व ज्ञेय अशा दोन भिन्न गोष्टी आहेत. ज्ञाता हा ज्ञेयापासून नित्य भिन्न असतो. घटद्रष्टा घटात् भिन्नः इति
न्यायेन | ‘मी’ हा ज्ञाता आहे व सर्व दृश्य विषय ज्ञेय आहेत. ‘मी’ हा ज्ञाता सतत ‘अहं’, ‘अहं’ स्वरूपाने
प्रचीतीला येतो. तो सर्व दृश्याचे ज्ञान
घेतो. त्यालाच प्रमाता असे म्हणतात. परंतु ज्ञाता, हा दृश्याचे ज्ञान घेत असेल तरी
त्यालाही प्रकाशमान करणारे कोणीतरी असलेच पाहिजे.
आचार्य एके ठिकाणी सुंदर वर्णन करात –
किं ज्योतिस्तव भानुमानहनि मे रात्रौ
प्रदीपादीकम् |
स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि
मे ||
चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो
दर्शने |
किं तत्राहमतो भवान्परमकं ज्योतिस्तदस्मि
प्रभो || (एकश्लोकी वेदान्त)
खरोखरच या विश्वाचे निरतिशय प्रकाशक कोण आहे
? हे समजावून देण्यासाठी आचार्य शिष्यालाच
प्रश्न विचारून त्यास सर्वप्रकाशकाचे स्वरूप सांगतात.
आचार्य: तुला
कोण प्रकाशमान करते ? (कोण जाणते ?)
शिष्य: दिवसा
सूर्य व रात्री दीप वगैरे.
आचार्य: सूर्य,
दिवा यांना कोण प्रकाशमान करते ?
शिष्य: डोळे.
आचार्य: डोळे
मिटल्यानंतर कोण प्रकाशक आहे ?
शिष्य: बुद्धि.
आचार्य: बुद्धीचे
ज्ञान कोणामुळे होते ?
शिष्य: माझ्यामुळे.
यावरून सिद्ध होते की, सर्व बुद्धिवृत्तींनाही
प्रकाशमान करणारे, निरतिशय, सर्वप्रकाशक आत्मचैतन्यस्वरूपच असून तेच प्रत्येक
जीवाचे प्रत्यगात्मस्वरूप, सर्व वृत्तींचे साक्षीचैतन्यस्वरूप आहे.
- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "Kenopanishad" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013
- हरी ॐ–