उपनिषद् ठामपणाने सांगते की, या ज्ञानाचे फळ हे निश्चयात्मक मिळालेच
पाहिजे. उपनिषद् सम्यक् आणि यथार्थ ज्ञान देते. सम्यक्
ज्ञान म्हणजेच संशयविपर्ययरहित ज्ञान होय. दोरी आणि साप दोन्ही दिसल्यावर – तेथे नक्की
दोरी आहे की साप आहे ? ही शंका, गोंधळ
असणे याला म्हणतात ‘संशय’. दोरीवर
साप दिसणे याला ‘विपर्यय’ म्हणतात. याप्रकारे
संशय आणि विपर्यय हे दोन्हीही नसणे म्हणजेच संशयविपर्ययरहित ‘सम्यक्’ ज्ञान होय. यानंतर यथार्थ ज्ञान म्हणजे काय ? ते सांगतात –
अर्थम्
अनुसृत्य यद् ज्ञानं तत् यथार्थज्ञानम् |
जे
ज्ञान अर्थाला म्हणजेच विषयाला अनुसरून असते, त्याला ‘यथार्थ’ ज्ञान असे म्हणतात.
समजा,
गुलाबाचे फूल असेल तर ज्ञान गुलाबाच्या फुलाप्रमाणे झाले पाहिजे. का बरे ? कारण ज्ञान हे वस्तूवर अवलंबून आहे. पाहणाऱ्याच्या इच्छेवर अवलंबून नाही. जर मला गुलाबाचे फूल दिसत असेल तर तुम्हाला
सुद्धा गुलाबाचेच फूल दिसले पाहिजे. एखादा
विद्वान असेल व एखादा मूर्ख असेल, तरी दोघांना ही एकच ज्ञान होईल. एखादा बुद्धिमान मनुष्य काहीतरी वेगळे सांगायचे
म्हणून “ते जास्वंदीचे फूल आहे” असे म्हटला तर तो विद्वान नाही, मूर्ख आहे. कारण – ज्ञानं न पुरुषतंत्रत्वात् |
यावरून
ज्ञान हे ज्ञात्याच्या इच्छेवर अवलंबून नाही. वक्त्याच्या, श्रोत्याच्या इच्छेवर अजिबात
अवलंबून नाही. म्हणून शास्त्र
तुम्हाला आवडो किंवा न आवडो, तुम्हाला मान्य होवो किंवा न होवो, शास्त्र हे
वस्तुवर अवलंबून आहे. शास्त्र इतके
निश्चयात्मक आहे, निर्णयात्मक आहे की, जगामध्ये कोणीही शास्त्राचे खंडन करू शकत
नाही. प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी तो
सुद्धा शास्त्राचे खंडन करू शकणार नाही. म्हणून
शास्त्राची फक्त दृष्टि समजली पाहिजे. शास्त्राला
मनुष्याच्या बुद्धीप्रमाणे मर्यादा नाहीत. राग-द्वेष, आवड-नावड शास्त्रामध्ये येऊ शकत
नाही, कारण शास्त्र हे अपौरुषेय आहे. म्हणून
‘नि’ या उपसर्गातून सूचित केले की, उपनिषद् हे प्रमाणभूत निश्चयात्मक ज्ञान घेण्याचे साधन आहे.
- "मुण्डकोपनिषत् " या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति,मार्च
२००७
- Reference: "Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007
- Reference: "Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007
-
हरी ॐ–
No comments:
Post a Comment