Tuesday, December 3, 2019

सत्संगाचे परिणाम | Effects of Satsang



सत्संगामध्ये गेल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल होतो.  आपले बहिरंगाचे आचार बदलतात.  चांगले-वाईट, धर्म-अधर्म, नीति-अनीति, पाप-पुण्य यांचे स्पष्ट ज्ञान झाल्यामुळे मनुष्य अधर्मापासून, दुष्टाचारापासून निवृत्त होतो.  तो धर्माचरणाचे, सदाचाराचे जीवन जगू लागतो.  त्याचे विचारही बदलतात.  आपण चांगले वागावे, आपले जीवन चांगले व्हावे, असे त्याला मनापासून वाटते.  त्यामुळे त्याच्या मनामध्ये लगेचच चांगले बदल होतात.  मनामधील विषयांचा, विषयवासनांचा प्रभाव कमी-कमी होतो.  मनामध्ये वैराग्याची वृत्ति उदयाला येते.  मन भोगांसाठी व्याकूळ होत नाही.  इंद्रिय सुद्धा काही प्रमाणात संयमित होतात.  

मनामधील काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सरादि विकार कमी होऊन मन अधिक शुद्ध, सात्त्विक, अंतर्मुख होते.  या मनामध्ये श्रद्धा, सेवा, त्याग, समर्पण, भक्ति, अमानित्वादि दैवी गुणांचा उदय होतो.  मनुष्याचे जीवन धर्मपरायण, ईश्वरपरायण होते.  त्याचवेळी तो खऱ्या अर्थाने साधक होतो.  गुरूंनी उपदेश केलेल्या अनेक साधना तो साधक मोठ्या श्रद्धेने, उत्साहाने व निष्ठेने करू लागतो.  

खरे तर पूर्वी सुद्धा आपण पूजा-अर्चनादि करतच होतो.  परंतु ते सर्व यंत्रवत्, करायचे म्हणून करत होतो.  मात्र सत्संगामध्ये गेल्यानंतर श्रावणामधून ईश्वराच्या सगुण-निर्गुण स्वरूपाचे ज्ञान होते.  त्यामुळे ईश्वराच्या सगुण रूपाची गोडी वाटायला लागते.  पूजेमध्ये प्रेमाचा, भक्तीचा भाव जागृत होतो.  मग पूजादि कर्मांच्यामध्ये आनंद वाटतो.  त्यामुळे पूजा-जप-जाप्य-व्रतवैकल्य-उपवास-उपासना-तपश्चर्या-नामस्मरण या सर्व साधनांच्यामध्ये सातत्य निर्माण होते.  श्रीमद भागवतामध्ये नवविधा भक्तीचे वर्णन केले आहे.  साधकाने गुरुमुखातून ईश्वराचे स्वरूप श्रवण करावे.  कीर्तन, स्मरण, चरणसेवा, अर्चना, वंदन, दास्यत्व, सख्यत्व व सर्वात शेवटी स्वतःमधील अहंकार ईश्वरचरणी पूर्णतः समर्पण करणे, अशा या साधना आहेत.  

सत्संगाच्या प्रभावामुळे, गुरूंच्या आशीर्वादामुळे साधक या सर्व साधना सातत्याने करतो.  त्याच्या मनामधून मोहाची निवृत्ति होते.  विषयांचे व भोगांचे पूर्वीइतके आकर्षण राहत नाही.  ईश्वरावरील व गुरूंच्यावरील श्रद्धा दृढ व नितांत होते.  साधक गुरूंना ईश्वरस्वरूपच मानून गुरुसेवा करतो.  गुरुसेवा हेच त्याचे जीवन होते.  गुरु हीच श्रद्धा, गुरु हेच ज्ञान, गुरु हीच सेवा, गुरु हीच साधना, असे त्याचे जीवन गुरुमय होते.  

- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015


- हरी ॐ


No comments:

Post a Comment