Sunday, December 29, 2019

विद्यारंभी मंगलाचरण | Making an Auspicious Beginning




व्यवहारामध्ये छोटे कार्य जरी असेल, तरी परमेश्वराचे आवाहन केले जाते.  गाडीचालक सुद्धा प्रथम गाडीच्या चक्राला नमस्कार करतो, उदबत्ती लावतो, म्हणजेच परमेश्वराचे आवाहन करतो.  किंवा कोणत्याही दुकानामध्ये दुकानदार प्रथम उदबत्ती ओवाळतो.  या सर्व कृतींच्या मागे परमेश्वराबद्दलची श्रद्धा आणि सुसंस्कार आहेत.  “हे भगवंता ! मी जे काही आज करेन, ते माझे कर्तृत्व नाही.  याच्यामागे तुझे आशीर्वाद, तुझी कृपा, तुझा अनुग्रह आवश्यक आहे.  तरच जीवनात मी काही मिळवू शकेन.  साधे आज झोपून मी उद्या उठत असेन तर ही सुद्धा तुझीच कृपा आहे.”  हाच श्रद्धावान मनुष्याचा भाव असतो.  

आपल्या जीवनामध्ये भगवंताचे अधिष्ठान असणे अत्यंत आवश्यक आहे.  व्यावहारिक जीवनामध्ये तर आहेच.  परंतु त्याहीपेक्षा साधकाच्या, शिष्याच्या, भक्ताच्या जीवनामध्ये परमेश्वराचे स्थान सर्वोच्च आहे.  ईश्वराच्या अनुग्रहानेच अंतःकरणामध्ये ज्ञानजिज्ञासा उदयाला येते.  या आध्यात्मिक ज्ञानामध्ये सुद्धा जिज्ञासु साधक परमेश्वराला प्रसन्न करवून घेण्यासाठीच, त्याचे आशीर्वाद, कृपा, अनुग्रह प्राप्त करण्यासाठीच परमेश्वराची अनन्य भावाने प्रार्थना करतो.  हीच मनाची खरी सुसंस्कृतता आहे.  ही ज्ञानसाधना अखंडपणाने, सातत्याने होण्यासाठी साधकाला भगवंताचे आशीर्वाद आवश्यक आहेत.  

साधकाच्या मनामध्ये ज्ञानजिज्ञासा उत्पन्न होणे, साधना करण्यासाठी अनुकूल असणारे मनुष्यशरीर प्राप्त होणे, सद्गुरूंची प्राप्ति होणे, शास्त्राचे श्रवण करायला मिळणे ही सर्व त्या भगवंताचीच अनंत व अपार कृपा आहे.  ही कृपा डोळ्यांना दिसत नाही तर विचाराने, बुद्धीने अंतःकरणामध्ये अनुभवायला येते.  यासाठीच परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी साधक याठिकाणी उपनिषदाचे अध्ययन करण्यापूर्वी मंगलाचरण करतो.  

विद्येचा आरंभ करणे हा जीवनामधील सर्वश्रेष्ठ संस्कार मानला जातो.  विद्यारंभ करण्यापूर्वी गुरु आणि शिष्य दोघे मिळून मंगलाचरण करतात, भगवंताचे आवाहन करतात, कारण गुरु जरी आज शिकवीत असतील, तरी ते गुरु सुद्धा एके काळी शिष्य होते.  ते सुद्धा आपल्या गुरूंच्या, शास्त्राच्या प्रति आदर दर्शविण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी मंगलाचरण करून स्वतःच्या गुरुपरंपरेचे स्मरण करतात.  


- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

No comments:

Post a Comment