Tuesday, November 26, 2019

सत्संग म्हणजे नेमके काय? | What Exactly is ‘Satsang’?सत्संग म्हणजे नेमके काय ?  साधु कुणाला म्हणावे ?  संत कुणाला म्हणावे ?  साधूंना कसे ओळखावे ?  कारण समाजामध्ये तर अनेक माणसे आहेत.  साधूंचा वेष घेतलेली अनेक माणसे दिसतात.  मग केवळ बाह्य वेषावरून भगवे कपडे, पांढरे कपडे किंवा रुद्राक्षांच्या माळा यावरून त्याला साधु समजावे का ?  कलियुगामध्ये पाखंडी, ढोंगी, लोकांनी या साधुवेषाचा आश्रय घेऊन साधूंच्या वस्त्राचा अक्षरशः अपमान केला आहे.  ‘साधु’ या शब्दालाच बदनाम केले आहे.  त्यामुळे समाजाचा ‘साधु’ या शब्दाकडे पाहाण्याचाच दृष्टीकोन बदलला आहे.  यासाठीच ‘साधु’ म्हणजे कोण हे प्रथम समजावून घेतले पाहिजे.

वेदांच्यामध्ये ‘संत’ शब्दाची व्याख्या केली आहे.
अस्ति ब्रह्मेति चेत् वेद सन्तमेनं ततो विदुरिति           (तैत्ति. उप.)
जो जो या विश्वामध्ये “ईश्वर आहे” असे निश्चितपणे जाणतो, ज्याची सत्स्वरूप असणाऱ्या ईश्वरावर नितांत श्रद्धा आहे, त्याला ‘संत’ असे म्हणावे.  म्हणून संत म्हणजे बाह्य वेष नव्हे, संत आपल्याला बहिरंगाने दिसत नाहीत.  आपण डोळ्याने माणसे पाहू शकतो.  हा चांगला माणूस, हा वाईट माणूस असे म्हणू शकतो.  परंतु हा संत असे डोळ्याने पाहू शकत नाही.  तर आपल्याला अंतःकरणामध्ये त्याच्या संतत्वाची, साधुत्वाची प्रचीति येते.  मनामध्ये अनुभव येतो.  महापुरुषांमधील दिव्यत्व, अलौकिकत्व हे डोळ्यांना दिसत नाही.  शरीराने किंवा इंद्रियांनी अनुभवता येत नाही.  तर शुद्ध अंतःकरणामध्ये त्याची प्रचीति येते.

ज्यावेळी आपल्याला एखाद्या स्थानामध्ये खऱ्या साधुत्वाची प्रचीति येते, तेव्हा त्या स्थानाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धेचा भाव उदयाला येतो.  तिथेच आपण नतमस्तक होतो.  आपली बुद्धि तिथे विनयशील, शरणागत होते.  त्याचवेळी आपल्या जीवनामध्ये ते गुरूस्थान बनते.

यामुळे गुरु ही एक व्यक्ति नाही, गुरु हे एक मर्त्य शरीर नाही, गुरु हे नातेही नाही किंवा गुरु हा समाजातील अन्य माणसाप्रमाणे एक माणूस नाही.  तर गुरु हा अंतःकरणामध्ये उदयाला आलेला भाव आहे.  जीवनामध्ये असा गुरुभाव उदयाला येणे अत्यंत दुर्लभ आहे व गुरु मिळणे ही दुर्लभ आहे. 
  

- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015- हरी ॐ
No comments:

Post a Comment