Tuesday, July 3, 2018

क्रोध | Anger
कामाचेच दुसरे रूप म्हणजे ‘क्रोध’ होय.  आपली कामना पूर्ण करण्यामध्ये जर एखादा प्रतिबंध आला तर लगेचच त्या कामनेचे रूपांतर क्रोधामध्ये होते.  किंवा अप्रिय वस्तूच्या स्मरणाने, श्रवणाने, दर्शनाने सुद्धा मनामध्ये क्रोध, संताप निर्माण होतो.  म्हणजेच मन संतप्त करणाऱ्या द्वेषाच्या परिणामालाच ‘क्रोध’ असे म्हणतात.  

ज्याप्रमाणे अग्नि स्वतःच्या आश्रयाला म्हणजे लाकडालाच जाळून भस्मसात करतो त्याप्रमाणेच हा क्रोधाग्नि स्वतःच्या आश्रयाचाच नाश करतो.  या क्रोधाच्या आवेगामुळे अहंकार बळावला जातो.  मनुष्य त्यावेळी सर्वांच्यावर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करतो.  त्याचा विवेक संपतो.  मन व इंद्रियांच्यावरील संयमन सुटते आणि त्या क्रोधाच्या भरात जे करू नये ते करतो, जे बोलू नये असे अपशब्द बोलतो, जे खाऊ नये ते खातो.  त्याला कसलेच ताळतंत्र राहात नाही.  स्वतःच्या गुरुंचीही तो अवहेलना करतो.  इतकेच नव्हे तर त्या क्रोधाच्या आहारी जावून शारीरिक इजा करण्यासही तो मागेपुढे पाहात नाही.  

अशा प्रकारे, क्रोधाच्या आवेगामुळे विवेकवैराग्यादि, शमदमादि सर्व दैवीगुणसंपत्तीचा नाश होतो. मन अत्यंत विक्षेपयुक्त, संतप्त, प्रक्षुब्ध होते. अंतरिक दाह होतो.  इतकेच नव्हे तर, या क्रोधाच्या आवेगाचा बाह्य शरीरावरही विपरीत परिणाम होतो.  आचार्य सांगतात – ज्यावेळी क्रोध अनावर होतो त्यावेळी शरीराचा थरकाप होतो.  सर्वांगाला दरदरून घाम फुटतो.  ओठ दाताखाली चावले जातात.  डोळे रक्तवर्णीय होतात.  कानशीले तप्त होतात.  चेहेरा लाल होतो.  त्यावेळी श्वासोच्छ्वासही वेगाने होतो.  अशा आवेगामध्ये सापडले तर मनुष्य अक्षरशः होरपळून निघतो.  

याप्रमाणे काम आणि क्रोध यांचे आवेग अत्यंत भयंकर, मनाला प्रक्षुब्ध, अस्थिर, तप्त करणारे आहेत.  अशा मनामध्ये कधीही निरतिशय आनंदाची, शांतीची अनुभूति येवू शकत नाही.  कामक्रोधाचा आवेग वर्तमानकाळातील देह पडण्यापूर्वी, मृत्यूपूर्वी म्हणजेच तरुण वयामध्येच जो मुमुक्षु तितिक्षेच्या साहाय्याने सहन करू शकतो त्यालाच श्रावणादि साधनेमधून ज्ञानप्राप्ति होते.  तो योगी, ज्ञानी होतो आणि त्यालाच निरतिशय ब्रह्मानंदाची प्राप्ति होते.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002

- हरी ॐ – 

No comments:

Post a Comment