Monday, September 25, 2017

“भज गोविंदम्” चे स्वरूप | Nature of “Bhaj Govindam”


भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्यांनी भज गोविंदम् या ग्रंथामधून मनुष्याला जीवनाचे वास्तव सांगितले आहे.  जीवन म्हणजे काय ?  जीवनाचे प्रयोजन काय ?  विश्व, विषय, भोग यांचे स्वरूप काय ?  मनुष्याने कसा व्यवहार करावा ?  मनुष्याने सर्वांच्याविषयी केलेल्या कल्पना कशा निरर्थक व व्यर्थ आहेत ?  या सर्व गोष्टींचा उहापोह या ग्रंथामध्ये केलेला आहे.  

या ग्रंथाची निर्मिती एका प्रसंगामधून झाली आहे.  एकदा आदि शंकराचार्य वाराणसीमध्ये आपल्या शिष्यांच्यासह चालले असताना त्यांना एका झोपडीमधून “डुकृञ् करणे” हे पाणिनीय व्याकरणाचे सूत्र एका वृद्धाकडून ऐकावयास आले.  आचार्य त्याला उद्देशून म्हणाले, “हे वृद्ध माणसा !  आपण वृद्धावस्थेत पदार्पण केले आहे.  शरीर गलितगात्र झाले आहे.  केव्हाही मृत्यु झडप घालेल, अशी अवस्था आहे.  अशा वेळी पाठांतराचा काही उपयोग होणार नाही.  व्याकरणाचे ज्ञान मृत्युपासून रक्षण करू शकणार नाही. म्हणून हे मूढमते !  मूढबुद्धि पुरुषा !  तू आता गोविंदाला, भगवंताला भक्तिभावाने शरण जा.”  अशा आशयाचा हा पहिला श्लोक आहे.  आचार्यांचे पहिले बारा श्लोक, “द्वादशमंजरिका स्तोत्र” आणि त्यांच्या चौदा शिष्यांनी रचलेले त्यापुढील चौदा श्लोक मिळून भज गोविंदम् हा एक सुंदर, बोधप्रद ग्रंथ निर्माण झाला आहे.  

या स्तोत्राच्या भावपूर्ण पठणाने, चिंतनाने मनुष्याच्या मनामधील मोह, आसक्ति दूर होते.  म्हणून याला “मोहमुद्गार स्तोत्र” असेही म्हटले जाते.  काही ठिकाणी या स्तोत्राला “चर्पटपंजरिका स्तोत्र” असेही म्हटले जाते.  चर्पटपंजरिका म्हणजे खमंग खाद्य !  आचार्यांनी या स्तोत्रात अत्यंत सोप्या भाषेत, व्यवहारातील चपखल उदाहरणे देऊन व अत्यंत स्पष्ट शब्दांत साधकाला झणझणीत उपदेश केला आहे.  हे स्तोत्र म्हणायला सुद्धा अत्यंत मधुर, लयबद्ध, तालबद्ध आहे.  या स्तोत्रामध्ये तर्क, कुतर्क, युक्तिवाद, अवघड समीकरणे नाहीत तर गुरूंनी, आचार्यांनी अत्यंत तळमळीने, करुणेने केलेला उपदेश आहे.  म्हणून आदि शंकराचार्यांच्या अक्षरवाङमयामधील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे.  
  

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015




- हरी ॐ



Tuesday, September 19, 2017

मानवी जीवनाचे सम्यक दर्शन | Comprehensive View of Human Life


आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी थोडा शांत वेळ काढून स्वतःच्या जीवनाचा विचार करणे आवश्यक आहे.  मी जन्माला कशासाठी आलो ?  माझ्या जीवनाचे प्रयोजन काय ?  माझे  जीवन मी आनंदाने कसे जगावे ?  अंतरिक सुखाच्या प्राप्तीचे साधन काय ?  आपण कुठून आलो व कुठे जाणार आहोत ?  मृत्युनंतर काय होणार ?  हे तर कुणालाच माहीत नाही.  त्यामुळे जे काही मिळवायचे ते इथेच जीवन जगत असतानाच मिळवले पाहिजे.  शोधले पाहिजे.  अन्यथा आपण जन्माला आलो, ते अज्ञानामधून व मारतोही अज्ञानामध्येच !  अंधारामध्येच आयुष्यभर चाचपडतो.  जन्माला येतो, पशूंच्याप्रमाणेच खाणे, भोगणे, झोपणे, प्रजोत्पत्ति वगैरेदि क्रिया करतो व कालांतराने मृत्यु पावतो.  असे दिशाहीन जीवन जगतो.  यावर मनुष्याने गांभीर्याने विचार केला पाहिजे.  

एक संत वर्णन करतात – अज्ञानव्याप्त मी भ्रमलो श्रमलो भारी | न च आश्रय कोठे दिसतो मज अंधारी ||  जीवनभर आपण अज्ञानामध्येच राहतो.  सभोवती विषय, माणसे, भोग सर्व काही असूनही सतत काहीतरी हरविल्यासारखे वाटते.  जीवनात आधार शोधण्याचा आपण प्रयत्न करतो.  परंतु जीवनात कुणीही आपला नित्य आश्रय होऊ शकत नाही.  सर्व माणसे काही काळ आपल्या जीवनात येतात व काळाच्या ओघात निघूनही जातात.  विषय, पैसा, ऐश्वर्य, संपत्ति, नातेवाईक यांपैकी कुणीही आपला आश्रय होऊ शकत नाही.  त्याचवेळी मनुष्याला सर्व विषयांच्या, माणसांच्या व भोगांच्या मर्यादा समजायला लागतात.  स्वतःच्या कर्तृत्वाच्या मर्यादा समजतात.  तेव्हाच मनुष्य स्वतःच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने, गांभीर्याने विचार करण्यास प्रारंभ करतो.  

मनुष्यजीवनाचा सर्वांगीण व सर्वाधिक विचार आपल्या ऋषिमुनींनी केलेला आहे.  आपल्या वेदांच्यामध्ये, शास्त्रग्रंथांच्यामध्ये, धर्मग्रंथांच्यामध्ये मनुष्यजीवनाचा सम्यक् विचार केलेला आहे.  श्रीमद्भग्वद्गीतेमध्ये तर भगवंतांनी अर्जुनाला मानवी जीवनासाठी अत्यावश्यक असणारा उपदेश केलेला आहे.  हा सर्व शास्त्राचा उपदेश म्हणजेच आपल्या जीवनाचे सार आहे.  मानवी जीवनाचे रहस्य व सम्यक् दर्शन आहे.  


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015


- हरी ॐ


Tuesday, September 12, 2017

भिक्षेसाठी कुणाकडे जावे ? | Whom to Ask for Food ?


संन्याश्याने भिक्षेसाठी कुणाकडे जावे ?  केवळ एक उपचार या भावनेने भिक्षेसाठी बोलावणाऱ्याकडे जाऊ नये.  गृहस्थाश्रमी गृहिणीला चिन्ता, दुःख, त्रास देऊन भिक्षेला जाणे वर्ज्य करावे.  अशा ठिकाणी नमस्कार करून निघून जावे.  भिक्षेला जाण्यात गरीब-श्रीमंत, उच्च-नीच हा भेद नाही.  भिक्षा हा भाव आहे.  “अगत्वा खलमन्दिरम् | दुष्टाचारी, कपटी, क्रूर लोकांकडे भिक्षेसाठी कधीही जाऊ नये.  तसेचअक्लेशयित्वा चात्मानम् |  संन्याश्याने स्वतःच्या शरीराला क्लेश देऊन म्हणजे अघोरी तपस् करून, इतरांचे लक्ष वेधून, सहानुभूति मिळवून उदरनिर्वाह करू नये.  सहजपणे, कोणालाही त्रास न देता, दुष्टांशी व्यवहार न करता मिळणाऱ्या थोड्या अन्नात संन्याश्याने समाधान मानावे.  “यद् अल्पं तदपि बहुः |  जे मिळते ते अल्प असले तरी ते फार मोठे आहे, कारण त्यात संतोष आहे.  

दुसऱ्याला देताना तुम्ही काय देता व किती देता याला महत्व नसून कोणत्या भावाने देता याला फार महत्व आहे.  श्रद्धा, भक्ति, प्रेम व सेवावृत्ति दात्याच्या भूमिकेला आवश्यक आहेत.  गडगंज संपत्ति व खूप स्वादिष्ट अन्न असूनही जिव्हाळा व आपुलकी त्या अन्न देण्यात नसेल, तर व्यवहारातही कुणाला अन्न सेवन करावेसे वाटणार नाही.  अन्नपदार्थ वाढताना गृहिणीचा राग, वैताग, आदळआपट नसावी.  श्रद्धावान, भक्तियुक्त अंतःकरण व सदाचार असणाऱ्या व्यक्तीकडूनच साधुने भिक्षा स्वीकारावी.  खरोखरीच अंतरीच्या प्रेमाने दिले तर पोट भरले असूनही पोटात आपोआप जागा होते.  

जिज्ञासु साधकाने घरोघर जाऊन भिक्षा मागावी व परमेश्वराला आणि गुरूंना प्रथम ती भिक्षा अर्पण करून, परमेश्वराचा प्रसाद म्हणून तिचे सेवन करावे.  अशा सात्विक आहाराने, भिक्षेने साधकाचे शरीर शुद्ध होते, मनही शुद्ध होते. मन व इंद्रिये प्रसन्न राहतात.  अन्नसेवन करतानाही त्याच्या मनाची प्रसन्नता रहाते, मन आनंदी रहाते.  अशा प्रकारे अन्नाच्या साहाय्याने सुदृढ व स्वस्थ शरीराने क्रमाक्रमाने साधना करून साधकाने स्वतःचे उत्क्रमण करून घ्यावे.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ


Tuesday, September 5, 2017

अन्नसेवनाची वृत्ति | Attitude while Partaking Food



गृहस्थाश्रमामध्ये प्रसादवृत्ति असावी.  अन्न सेवन करताना अन्नपूर्णेने दिलेली ती भिक्षा आहे अशी वृत्ति ठेवावी.  अन्न हे केवळ उपभोगासाठी नाही, कारण आपण औषध उपभोगत नाही.  अन्न हे सेवनासाठी आहे.  अन्नसेवनात गृहस्थाश्रमीने विशिष्ट भावना ठेवावी.  अन्नं न निन्द्यात् तत् व्रतम् |”  अन्नाचे फार मोठे व्रत आहे.  बुभुक्षिताप्रमाणे, अधाशीपणे अन्न खाऊ नये.  उभे राहून अन्न सेवन करू नये.  शास्त्रनियमाप्रमाणे खाली बसून, शांतपणे, एकाग्र चित्ताने अन्नाचे सेवन करावे.  उभे राहून अन्नाचा उपभोग वर्ज्य करावा.

अन्नाची निंदा, तिरस्कार, द्वेष किंवा घृणा नसावी.  शास्त्रकार म्हणतात, तिरस्करणीय वृत्तीने अन्न ग्रहण करताना तो मनुष्य अन्न न खाता स्वतःची पापेच भक्षण करत असतो.  पापं भुञ्जते |”  असे भगवान गीतेत स्पष्टपणे सांगतात.  अशा अन्नसेवनाने मनुष्याला कधीही समाधान व शांति मिळणार नाही.  अन्नं ब्रह्मेति व्यजानात् |”  अन्न भोज्य म्हणून उपभोगण्याची वस्तु नसून ते ब्रह्मस्वरूप आहे हे जाणावे.  आपण ईश्वराला नैवेद्य दाखवितो व तो नंतर प्रसाद म्हणून ग्रहण केल्यावर आपली वृत्ति शुद्ध होते.  अन्न हे एकट्याच्या, स्वतःच्या कर्तृत्वाने प्राप्त होत नाही.  अनेक दृष्ट-अदृष्ट शक्ति व वैश्विक नियम, देवदेवता यांच्या साहाय्याने व कृपेने मनुष्याला अन्न मिळते.  त्यामुळे अन्नाबद्दल त्याची उपकृततेची भावना असावी.

गीतेत भगवान म्हणतात –
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः |
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ||
सर्व प्राण्यांच्या देहात स्थित असलेला ‘मी’ वैश्वानर अग्निरूप होऊन, प्राण व अपान यांनी युक्त होऊन चार प्रकारचे अन्न पचवितो.  यात सर्व अन्न ‘मी’च आहे व ते भक्षण करणाराही ‘मी’च आहे असे भगवान म्हणतात.  म्हणून प्रेमाने, जिव्हाळ्याने अन्नसेवन करावे.  अन्न हा परमेश्वराचा प्रसाद आहे, या वृत्तीने अन्न ग्रहण करावे.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005




- हरी ॐ