Friday, May 26, 2017

ज्ञानयज्ञाची श्रेष्ठता | Superiority of Knowledge Offering


सर्व द्वैतजन्य, अज्ञानमूलक, संसारवर्धन करणाऱ्या द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, कारण –

१. ज्ञानच अज्ञानाच्या विरोधी असल्यामुळे प्रकाशाप्रमाणे अज्ञानरूपी अंधाराचा ध्वंस करून अज्ञानजन्य संसाराचा नाश करते.
२. ज्ञानच अत्यंत दुःखनिवृत्ति करून निरतिशय आनंदस्वरूपाची स्थिति प्राप्त करून देते.
३. ज्ञानच आत्म्यावर झालेला कर्तृत्व-भोक्तृत्वरूपी अनात्म्याचा अध्यास संपूर्ण निरास करते.
४. ज्ञानच द्वैताचा भ्रम निरास करून परमोच्च अद्वैताची दृष्टि देते.
५. ज्ञानच सर्व काल्पनिक बंधनांचा निरास करून मोक्षप्राप्ति करून देते.
६. ज्ञानाचे फळ नित्य, शाश्वत, चिरंतन आत्मस्वरूपाची सुस्थिति हे आहे.
७. ज्ञानयज्ञामध्ये अन्य यज्ञांच्याप्रमाणे द्रव्याची तसेच कोणत्याही बाह्य सामग्रीची आवश्यकता नसते.  तर फक्त योग्य, अनुकूल मनाची जरुरी असते.
८. ज्ञानयज्ञाचा अधिकारी साधनचतुष्टयसंपन्न असून, वर्ण, आश्रम, वय, धर्म, पंथ, जात वगैरेवर अवलंबून नसतो.
९. ज्ञानयज्ञामध्ये सर्व श्रौत, स्मार्त आणि लौकिक कर्मांची परिसमाप्ति होते.

सर्व प्रकारच्या नद्या समुद्रामध्ये परिसमाप्त होतात.  म्हणजेच कृष्णा, कोयना, नर्मदा, गंगा, गोदावरी, या नद्यांच्यामध्ये नामरूपात्मक भेद आहे.  परंतु समुद्रामध्ये अस्तंगत झाल्यानंतर तो भेद संपतो.  त्या समुद्रमय होतात.  त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे यज्ञयागादि कर्म अभेदस्वरूपाच्या आत्मज्ञानामध्ये विलीन होते.  



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Tuesday, May 23, 2017

प्राणायाम | What is Pranayam ?


प्राणस्य आयामः इति प्राणायामः |  प्राणायाम म्हणजे केवळ श्वासोच्छ्वास घेणे नव्हे, कारण ती नैसर्गिक, सहज असलेली क्रिया आहे.  त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अंतरिक जाणीव किंवा सावधानता नसते.  त्यामुळे नैसर्गिक श्वासोच्छ्वास ही यंत्राप्रमाणे असलेली क्रिया आहे.  ज्यावेळी श्वास आणि उच्छ्वास या क्रिया अत्यंत जाणीवपूर्वक अंतरिक सावधानता ठेवून नियमित केल्या जातात, त्या क्रियेला प्राणायाम असे म्हणतात.  यामध्ये प्राण आणि अपान वायूंच्या गतीवर नियमन केले जाते.  

प्राक् गमनवान्  वायुः इति प्राणः |  जो वायु नाकामधून बाहेर फेकला जातो त्याला प्राण म्हणतात. प्राण म्हणजेच उच्छ्वास होय.  अधोगमनवान् वायुः इति अपानः |  तसेच नाकामधून जो आत जातो त्या वायूला अपान असे म्हणतात.  अपान म्हणजे श्वास.  
१. अपाने जुह्वति प्राणंअपान वायूमध्ये प्राणवायु अर्पण केला जातो.  यामध्ये श्वास संथ गतीने विशिष्ट काळामध्ये जाणीवपूर्वक आत घेतला जातो.  मोकळ्या कुंभात पाणी भरल्यानंतर तो काठोकाठ भरतो त्याप्रमाणे वायु मोकळ्या छातीमध्ये पूर्ण भरतो.  म्हणून याला पूरक प्राणायाम म्हणतात.  
२. प्राणे अपानं जुह्वतिप्राणामध्ये अपान वायु अर्पण केला जातो. यामध्ये जाणीवपूर्वक सावधानतेने संथ गतीने श्वास बाहेर सोडला जातो.  याला रेचक प्राणायाम म्हणतात.  
३. कुंभक प्राणायामश्वास संथ गतीने घेतल्यानंतर काही विशिष्ट वेळेपर्यंत त्या वायूचा छातीमध्ये निरोध केला जातो.  या क्रियेला कुंभक प्राणायाम म्हणतात.  ज्यावेळी श्वास घेतल्यानंतर वायूचा छातीमध्ये निरोध केला जातो त्याला अंतर्कुंभक म्हणतात आणि श्वास सोडल्यानंतर वायूचा बाहेर निरोध केला जातो त्याला बहिर्कुंभक म्हणतात.  

कुंभक प्राणायामासाठी आहार, विहार यावर निरोध असणे आवश्यक आहे.  अनेक नियमांची जरुरी आहे.  तो श्रेष्ठ योग्यांच्या मार्गदर्शनाने करावा. सामान्य साधकाला हा मार्ग कठीण आहे.  म्हणून स्वतः करू नये.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ – 

Tuesday, May 16, 2017

द्रव्ययज्ञ | Offering of Money


भगवान द्रव्यदानाला यज्ञस्वरूप देतात.  द्रव्ययज्ञ म्हणजे द्रव्य वाटणे नाही, तर त्यामध्ये काही नियम आहेत ते पाळले तरच तो द्रव्ययज्ञ होतो.  

१. द्रव्यदान करताना ज्याला दान द्यायचे तो योग्य, सत्पात्री असून गरजू असावा.  

२. दान केव्हाही, कोठेही न देता विशिष्ट काळामध्ये आणि पवित्र ठिकाणी द्यावे.  म्हणून मंदिरामध्ये किंवा क्षेत्रामध्ये तसेच पर्वणी, कुंभमेळा किंवा ग्रहणाच्या वेळी दान दिले जाते.  

३. ते अत्यंत श्रद्धा आणि भक्तीने द्यावे.  श्रुति म्हणते – श्रद्धया देयम् अश्रद्धया अदेयम् |  जे जे काही दान करतो ते श्रद्धेने द्यावे.  अश्रद्धेने, नाईलाजास्तव देऊ नये.  श्रद्धेने दान देत असताना दुसऱ्याला मदत किंवा साहाय्य करतो अशी भावना नसून सेवावृत्ति असते.  मी या दानामधून परमेश्वराचीच सेवा करतो हा अत्यंत शुद्ध आणि उदात्त भाव असतो.  परमेश्वरकृपेने जे मला प्राप्त झालेले आहे ते मी पुन्हा परमेश्वराला अर्पण करीत आहे.  अशा प्रकारे श्रद्धेने, विधियुक्त सत्पात्री दान केले तर त्यामध्ये नम्रता, विनयशीलता दिसते.  तसे नसेल तर मनुष्यामध्ये अहंकार निर्माण होऊन तो कीर्ति किंवा प्रतिष्ठेसाठी दान करतो.  ते दान म्हणजे द्रव्ययज्ञ नव्हे.  

शास्त्रामध्ये अनेक प्रकारची दाने सांगितलेली आहेत.  प्रत्येक दान हे धनानेच केले पाहिजे असे नाही.  तर समाजोपयोगी कोणतेही कार्य हे दानच आहे.  उदा. विहिरी, तलाव, धर्मशाळा, पाणपोई, शिक्षणसंस्था, मंदिर यांची स्थापना करणे.  तसेच, अन्नदान, वस्त्रदान, भूदान, गोदान अशा प्रकारची अनेक दाने आहेत.  या दानामधून लोकांच्या मनात श्रद्धा, सत्शीलता, श्रेष्ठ नीतिमूल्यांचे संस्कार निर्माण होतात.  म्हणून याला ‘द्रव्ययज्ञ’ असे म्हटले जाते.  यामुळे अंतःकरण काही प्रमाणात शुद्ध होऊन दान कर्त्याला प्रसन्नता, समाधान प्राप्त होते आणि जो दान ग्रहण करतो तोही संतुष्ट होतो.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ – 

Tuesday, May 9, 2017

नियम आणि यम | Rules and Principles


यम – हे पाच प्रकारचे आहेत:

१. अहिंसा – अन्य जीवांना कायिक, वाचिक, मानसिक पीडा न देणे. कायिक – कार्मामधून दुसऱ्याला कोणत्याही प्रकारची वेदना न देणे.  वाचिक – कठोर, अपमानास्पद किंवा अवहेलनात्मक निंदा, नालस्ती न करणे, दुसऱ्याच्या मनात क्रोध, संताप, क्षोभ, मद मत्सरादि भाव निर्माण होतील असे शब्द न बोलणे.  मानसिक – मनाने दुसऱ्याचे वाईट किंवा अहित चिंतन न करणे.
२. सत्य – कोणाशीही बोलताना – सत्यं वद |  हितं वद |  प्रियं वद |  हे नियम पाळावेत.
३. अस्तेय – दुसऱ्याच्या मालकीची वस्तु न चोरणे किंवा दुसऱ्याच्या मालकीची वस्तु विचारल्याशिवाय न घेणे म्हणजेच अस्तेय होय.
४. ब्रह्मचर्य – सर्व इंद्रियांच्यावर नियमन करणे.
५. अपरिग्रहसंग्रह करण्याच्या वृत्तीचा त्याग करणे, कारण या वृत्तीमुळे मनामध्ये क्षोभ, संताप निर्माण होतो आणि त्या वस्तूच्या रक्षणासाठी मनुष्य प्रयत्न करतो.  यामुळे त्याच्या मनात सतत भीति निर्माण होते.  असे मन साधनेमध्ये प्रतिबंध निर्माण करते.  म्हणून साधकाने संग्रह करण्याच्या वृत्तीचा त्याग करावा.  

नियम – हे पाच प्रकारचे आहेत:

१. शौचं – म्हणजे अंतर्बाह्य शुद्धता होय.  यामध्ये शारीरिक व मानसिक शुद्धि येते.
२. संतोष – म्हणजे समाधान किंवा तृप्ति.  हे अंतःकरणाचे लक्षण आहे.
३. तप – हे तीन प्रकारचे आहे – कायिक, वाचिक व मानसिक.
४. स्वाध्याय – अध्ययन केलेल्या वेदांची पुन्हा पुन्हा आवृत्ति करणे.
५. ईश्वरप्रणिधान – परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाणे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, May 2, 2017

रामायण – रावणरूपी अहंकाराचा संहार | Ramayana – Destruction of Ego


रामभक्त हनुमंतामध्ये सर्व प्रकारचे दैवी गुण व्यक्त होतात.  असा हा हनुमान वानरसेनेसह आसुरांच्या बरोबर म्हणजेच आसुरी प्रवृत्तींच्याबरोबर युद्ध करतो.  ही वानरसेना अन्य सर्व राक्षसांचा नाश करते.  मात्र प्रत्यक्ष रावणाचा मात्र नाश करू शकत नाही.  अत्यंत बलाढ्य, सामर्थ्यसंपन्न असणारा जो रावण, त्याच्या बरोबर युद्ध करणारा योद्धा सुद्धा तितकाच तुल्यबळ, नव्हे त्याच्याहीपेक्षा सामर्थ्यसंपन्न असला पाहिजे.  म्हणून रावणाचा जर नाश करावयाचा असेल, तर त्याठिकाणी प्रत्यक्ष प्रभु श्रीरामच असणे अत्यंत आवश्यक आहे.  

बलाढ्य रावणाचा नाश करावयाचा असेल तर शस्त्रही तितकेच सामर्थ्यसंपन्न हवे.  म्हणून प्रभु श्रीराम रावणाचा नाश करण्यासाठी ब्रह्मास्त्राचे साहाय्य घेतात.  रावणाचा पराजय सहजासहजी होत नाही.  रावण सुद्धा युद्धकलेमध्ये अत्यंत निष्णात व निपुण असतो.  अजिंक्य योद्धा असतो.  दशानन असणारा रावण अनेक रूपे धारण करू शकतो.  रावणाचा ध्वंस करीत असताना प्रभु श्रीरामांना सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.  त्यास मारण्याची युक्ति शोधावी लागते.  

या रावणाप्रमाणेच आपल्या जीवनात अहंकाराचे स्थान आहे.  अहंकार सहजासहजी नतमस्तक होत नाही.  साधकाने काही प्रमाणात आसुरी गुणसंपत्तीचा नाश केला, शम-दमादि दैवीगुणसंपत्ति प्राप्त केली तरी सुद्धा साधकामधील अहंकार मात्र कमी न होता सतत वर्धन पावत असतो.  रावणाप्रमाणेच अहंकाराला अनेक मुखे आहेत.  प्रत्येक वेळी अहंकार आपले नवीन रूप घेऊन आपल्या जीवनावर वर्चस्व गाजवितो.  अहंकाराला समोरासमोर नष्ट करण्याचा आपण जितका प्रयत्न करू, तितका तो नष्ट न होता उलट नवीन नवीन रूपे धारण करतो.  साधकाला फसवितो.  जन्मानुजन्मे खेळवितो.  म्हणून अहंकाराचा नाश करावयाचा असेल तर साधनही तितकेच सामर्थ्यसंपन्न पाहिजे.  

प्रभु श्रीराम रावणास मारण्यासाठी ब्रह्मास्त्राचा उपयोग करतात.  ब्रह्मास्त्र म्हणजेच ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मविद्या होय.  ब्रह्मविद्या हेच अहंकाराचा नाश करण्याचे प्रमुख साधन आहे.  विश्वामध्ये ज्ञानाशिवाय अन्य कोणतेही पावन, पवित्र आणि जीवनाला परिपूर्ण करणारी दुसरी वस्तू नाही.


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "
Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007


- हरी ॐ