Tuesday, May 2, 2017

रामायण – रावणरूपी अहंकाराचा संहार | Ramayana – Destruction of Ego


रामभक्त हनुमंतामध्ये सर्व प्रकारचे दैवी गुण व्यक्त होतात.  असा हा हनुमान वानरसेनेसह आसुरांच्या बरोबर म्हणजेच आसुरी प्रवृत्तींच्याबरोबर युद्ध करतो.  ही वानरसेना अन्य सर्व राक्षसांचा नाश करते.  मात्र प्रत्यक्ष रावणाचा मात्र नाश करू शकत नाही.  अत्यंत बलाढ्य, सामर्थ्यसंपन्न असणारा जो रावण, त्याच्या बरोबर युद्ध करणारा योद्धा सुद्धा तितकाच तुल्यबळ, नव्हे त्याच्याहीपेक्षा सामर्थ्यसंपन्न असला पाहिजे.  म्हणून रावणाचा जर नाश करावयाचा असेल, तर त्याठिकाणी प्रत्यक्ष प्रभु श्रीरामच असणे अत्यंत आवश्यक आहे.  

बलाढ्य रावणाचा नाश करावयाचा असेल तर शस्त्रही तितकेच सामर्थ्यसंपन्न हवे.  म्हणून प्रभु श्रीराम रावणाचा नाश करण्यासाठी ब्रह्मास्त्राचे साहाय्य घेतात.  रावणाचा पराजय सहजासहजी होत नाही.  रावण सुद्धा युद्धकलेमध्ये अत्यंत निष्णात व निपुण असतो.  अजिंक्य योद्धा असतो.  दशानन असणारा रावण अनेक रूपे धारण करू शकतो.  रावणाचा ध्वंस करीत असताना प्रभु श्रीरामांना सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.  त्यास मारण्याची युक्ति शोधावी लागते.  

या रावणाप्रमाणेच आपल्या जीवनात अहंकाराचे स्थान आहे.  अहंकार सहजासहजी नतमस्तक होत नाही.  साधकाने काही प्रमाणात आसुरी गुणसंपत्तीचा नाश केला, शम-दमादि दैवीगुणसंपत्ति प्राप्त केली तरी सुद्धा साधकामधील अहंकार मात्र कमी न होता सतत वर्धन पावत असतो.  रावणाप्रमाणेच अहंकाराला अनेक मुखे आहेत.  प्रत्येक वेळी अहंकार आपले नवीन रूप घेऊन आपल्या जीवनावर वर्चस्व गाजवितो.  अहंकाराला समोरासमोर नष्ट करण्याचा आपण जितका प्रयत्न करू, तितका तो नष्ट न होता उलट नवीन नवीन रूपे धारण करतो.  साधकाला फसवितो.  जन्मानुजन्मे खेळवितो.  म्हणून अहंकाराचा नाश करावयाचा असेल तर साधनही तितकेच सामर्थ्यसंपन्न पाहिजे.  

प्रभु श्रीराम रावणास मारण्यासाठी ब्रह्मास्त्राचा उपयोग करतात.  ब्रह्मास्त्र म्हणजेच ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मविद्या होय.  ब्रह्मविद्या हेच अहंकाराचा नाश करण्याचे प्रमुख साधन आहे.  विश्वामध्ये ज्ञानाशिवाय अन्य कोणतेही पावन, पवित्र आणि जीवनाला परिपूर्ण करणारी दुसरी वस्तू नाही.


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "
Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007


- हरी ॐ

No comments:

Post a Comment