Friday, May 26, 2017

ज्ञानयज्ञाची श्रेष्ठता | Superiority of Knowledge Offering


सर्व द्वैतजन्य, अज्ञानमूलक, संसारवर्धन करणाऱ्या द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, कारण –

१. ज्ञानच अज्ञानाच्या विरोधी असल्यामुळे प्रकाशाप्रमाणे अज्ञानरूपी अंधाराचा ध्वंस करून अज्ञानजन्य संसाराचा नाश करते.
२. ज्ञानच अत्यंत दुःखनिवृत्ति करून निरतिशय आनंदस्वरूपाची स्थिति प्राप्त करून देते.
३. ज्ञानच आत्म्यावर झालेला कर्तृत्व-भोक्तृत्वरूपी अनात्म्याचा अध्यास संपूर्ण निरास करते.
४. ज्ञानच द्वैताचा भ्रम निरास करून परमोच्च अद्वैताची दृष्टि देते.
५. ज्ञानच सर्व काल्पनिक बंधनांचा निरास करून मोक्षप्राप्ति करून देते.
६. ज्ञानाचे फळ नित्य, शाश्वत, चिरंतन आत्मस्वरूपाची सुस्थिति हे आहे.
७. ज्ञानयज्ञामध्ये अन्य यज्ञांच्याप्रमाणे द्रव्याची तसेच कोणत्याही बाह्य सामग्रीची आवश्यकता नसते.  तर फक्त योग्य, अनुकूल मनाची जरुरी असते.
८. ज्ञानयज्ञाचा अधिकारी साधनचतुष्टयसंपन्न असून, वर्ण, आश्रम, वय, धर्म, पंथ, जात वगैरेवर अवलंबून नसतो.
९. ज्ञानयज्ञामध्ये सर्व श्रौत, स्मार्त आणि लौकिक कर्मांची परिसमाप्ति होते.

सर्व प्रकारच्या नद्या समुद्रामध्ये परिसमाप्त होतात.  म्हणजेच कृष्णा, कोयना, नर्मदा, गंगा, गोदावरी, या नद्यांच्यामध्ये नामरूपात्मक भेद आहे.  परंतु समुद्रामध्ये अस्तंगत झाल्यानंतर तो भेद संपतो.  त्या समुद्रमय होतात.  त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे यज्ञयागादि कर्म अभेदस्वरूपाच्या आत्मज्ञानामध्ये विलीन होते.  



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

No comments:

Post a Comment