Tuesday, February 23, 2016

मिथ्या मृत्युशोक | Futile Grief in Death


अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे |
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः || ११ ||  (भगवद्गीता २-११)

पारमार्थिक दृष्टीने जर पहिले तर प्रत्येक जीव नित्य, शाश्वत, चिरंतन, जन्ममृत्युरहित परब्रह्मस्वरूप आहेत.  ते कधी आलेले नाहीत व कधी जाणारही नाहीत.  मग ज्यांना जन्ममृत्यु नाही त्यांच्याबद्दल तू कसा शोक करणार ?  कारण त्या तत्त्वाला तू कधीही मारू शकत नाहीस.

ज्याप्रमाणे सोन्यामधून अनेक प्रकारचे अलंकार निर्माण झाले असले तरी सोनाराची दृष्टि सोन्याची असते.  त्या तत्त्वाच्या दृष्टीमध्ये सर्व भेद नाहीसे होतात.  सोनार सर्व अलंकार एकत्वाच्या दृष्टीने पाहतो.  त्याप्रमाणे पारमार्थिक दृष्टीमध्ये जिवांमधील भेद नसून एकच अखंड तत्त्व आहे.  अशा प्रकारे कोणत्याही दृष्टीने त्यांच्याविषयी शोक करणे योग्य नाही.

तसेच मृत्यू आपल्या शोकाचे कारण होत नाही.  मृत्यु जर कारण होत असेल तर कोणत्याही अज्ञात अनोळखी व्यक्तीचा मृत्यूदेखील शोकाचे कारण झाला पाहिजे.  पण तसे दिसत नाही.  तेथे आपण मृत्यु ही एक सत्य घटना म्हणून पाहतो.  त्याठिकाणी स्वतःच्या भावना येत नाहीत.  तर उलट जो जो जन्माला आला तो मृत्यु पावणारच अशी भावना असते.

परंतु तोच मृत्यु ज्यावेळी अत्यंत प्रिय व्यक्तीचा नाश करतो तेव्हा मृत्यूची घटना तीच आहे.  तर मग विशिष्ट व्यक्तीच्या मृत्यूने आपण शोकाकुल का होतो ?  त्याला मृत्यु हे कारण नाही तर त्या व्यक्तीमध्ये असलेला ममत्वभाव हे कारण आहे.  ती प्रिय व्यक्ति नाश पावू नये असे वाटत असते तरी सुद्धा त्या कल्पनेला धक्का बसतो आणि दुःख होते.  थोडक्यात अनेक शरीरामध्ये निरनिराळी नाती निर्माण करून ममत्व-भाव निर्माण करतो.  ममत्वाच्या मागे अहंकार असतो.  हा अहंकार – ममकार अज्ञानकल्पित असून शोकाला कारण होतो.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ

Tuesday, February 16, 2016

शोक-मोहातून मुक्तता | Freedom from Grief & Enticement


अहंकार-ममकाराच्या प्रत्ययाने निर्माण झालेला शोक-मोहरूपी संसार प्रत्येक जीवाला अनुभवायला येतो.  तो शोक इंद्रियांना घटादि विषयाप्रमाणे अनुभवायला येत नसून तो प्रत्येकाला आपल्या मनामध्ये प्रचीतीला येतो, कारण तो इंद्रियांचा विषय नसून मनाचा आहे.  या शोकाचे कारण विश्व, बाह्य प्रसंग किंवा विषय नसून मन हेच कारण आहे.

याच मनामध्ये अहंकार असून त्याभोवती आपण स्वतःबद्दलच्या कल्पनांचे वलय निर्माण करतो आणि नंतर ‘मी’ सोडून अन्य व्यक्ति, विषय, स्थावर-जंगम यांच्या अनुषंगाने ममत्व निर्माण करतो.  जेथे जेथे हा ममत्व प्रत्यय निर्माण होईल त्याठिकाणी आपले प्रेम, आसक्ति निर्माण होते आणि आपोआपच अनेक प्रकारच्या अपेक्षा निर्माण होतात.  हाच प्रत्यय सर्वांना बद्ध करतो.  यातुनच मोह आणि शोक म्हणजेच संसार अनुभवायला येतो.

थोडक्यात संसाराला कारण मोह आणि शोक, त्याला कारण अहंकार-ममकार आणि त्याचे मूळ कारण स्वस्वरूपाचे अज्ञान !  म्हणून सर्व संसारच अज्ञानकल्पित आहे.  यामुळे संसारातून मुक्त होणे म्हणजे विषयांचा, लोकांचा, विश्वाचा त्याग करणे नसून सुख-दुःखात्मक असलेल्या द्वन्द्वात्मक कल्पनांमधून मुक्तता होय.  शोकातून मुक्तता म्हणजे मोहातून मुक्तता म्हणजे पर्यायाने अहंकारामधून मुक्तता होय.  अहंकारापासून मुक्तता अज्ञाननिवृत्तीने होते आणि ज्ञानाने अज्ञानाचा ध्वंस होतो व संसाराचा समूळ निरास होतो.

गुरूंच्या उपदेशाने अज्ञानाचा निरास होऊन ज्ञानप्राप्ति होते आणि अज्ञानकल्पित संसाराचा ध्वंस होतो.  म्हणून सर्व शास्त्राचे आणि उपदेशाचे प्रयोजन संसारनिवृत्ति म्हणजेच अज्ञाननिवृत्ति आणि अज्ञाननिवृत्ति म्हणजेच ज्ञानप्राप्ति होय.  थोडक्यात अज्ञानाचा निरास करून संसारनिवृत्ति करणे हेच ज्ञानाचे प्रयोजन आहे.  त्यामुळे ज्ञान हे जरी positive असले तरी त्याचे कार्य अज्ञानकल्पित संसाराचा निरास करणे हेच आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, February 9, 2016

कुलाचाराचे महत्त्व | Importance of Family Values


मनुष्यामध्ये विषयांचा संग्रह करण्याची आणि उपभोगण्याची स्वाभाविक प्रवृत्ति आहे.  यामधूनच विषयांची कामना निर्माण होते.  आणि कामनापूर्ती व उपभोग हेच जीवनाचे अंतिम ध्येय झाले तर मनुष्य कोणत्याही मार्गाचा अवलंब करून आपल्या कामना पूर्ण करतो.  यामुळेच तो नियम, नीतिमुल्ये, आचारधर्म यांना झुगारून देतो आणि हळूहळू स्वैर, उच्छृंखल होऊन पापाचरणामध्ये प्रवृत्त होतो.

या स्वैर, वैषयिक, पशुतुल्य जीवनापासून निवृत्त करण्यासाठी, त्याच्या कामुक प्रवृत्तीवर नियमन घालण्यासाठी, इंद्रियांच्यावर संयमन करण्यासाठी, उदात्त आचार-विचारांचे जीवन जगण्यासाठी, त्याच्या जीवनाला निश्चित दिशा देण्यासाठी या सर्व कुलधर्म, जातीधर्मांचे प्रयोजन आहे.  ते मनुष्याच्या मनात श्रद्धा, भक्ति, सेवा, त्याग, स्वकर्तव्यपरायणता, प्रेम वगैरे श्रेष्ठ सात्विक गुणांची जोपासना करतात.  मानसिक विक्षेप, द्वंद्व कमी करून मन शांत, अंतर्मुख करण्याचे साधन होतात.

हे सर्व शिकविणार कोण ?  कुटुंबसंस्था जर संकारयुक्त असेल, तर त्यातल्या प्रत्येक मनुष्याचे सामाजिक जीवनही या मूल्यांच्यावर आधारित असल्यामुळे आपोआपच समाजातही ही नीतिमूल्ये जोपासली जातील, समाज सुसंस्कृत, समृद्ध, कर्तव्यपरायण होईल.  नाहीतर नीतिमूल्ये, जीवनमूल्यांच्याशिवाय व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन स्वैर होऊन माणसातली माणुसकी नाहीशी होऊन माणूस पशू बनेल.  म्हणून जीवनमूल्यांची जपणूक आणि संवर्धन करणारी उत्कृष्ट संस्कारक्षम कुटुंबसंस्था आवश्यक आहे.  पर्यायाने तीच समाजातील जीवनमूल्ये ठरविते.

म्हणून प्रत्येक पिढीचे एक महत्वाचे कार्य आहे – अनादिकाळापासून चालत आलेले आचारधर्म, कुलधर्म मागच्या पिढीकडून घेऊन आत्मसात करावेत आणि पुढच्या पिढीला आपल्या आचार-विचारामधून द्यावेत.  आजपर्यंत ही अखंड परंपरा चालू आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ

Tuesday, February 2, 2016

ज्ञान हेच संन्यासाचे लक्षण | Knowledge – The Mark of Renunciation



आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने अज्ञानाचा ध्वंस होऊन त्यातून निर्माण झालेला कर्तृत्व- भोक्तृत्वाचा अध्यास, त्याचप्रमाणे कर्ता-कर्म-क्रिया-करण-कारकादि प्रत्ययांचा आणि देहात्मबुद्धीचा निरास झाल्यामुळे आपोआपच सर्व कर्म आणि कर्मफळ तसेच संसाराचा अत्यंत अभाव होतो.  ज्ञानामुळे कर्तृत्वाचा अभाव झाल्यामुळे शास्त्र त्या विद्वान पुरुषाला कोणत्याही कर्माचा आदेश देऊ शकत नाही, कारण आदेश देण्यासाठी किंवा विधि-निषेध देण्यासाठी कर्त्याची आवश्यकता असते.

सर्व आदेश जीवाच्या मनात चोदना-प्रवृत्ति निर्माण करून काही कर्मामध्ये प्रवृत्त करतात. तर काही कर्मापासून निवृत्त करतात.  अशी विधि-निषेधपर वचने आहेत.  हे सर्व आदेश कर्त्याला केंद्रीभूत ठेवून केलेले आहेत.  त्यामुळे त्यामागे कर्तृत्व-भोक्तृत्वाचा अध्यास आणि अज्ञान हे गृहीत आहे.

परंतु आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे ज्याला ‘मी’ अकर्ता-अभोक्ता आहे, असे ज्ञान झाले आहे त्याला कोणताही विधि-निषेधपर आदेश संभवत नाही.  ज्ञान हे अकर्तृ-अभोक्तृ स्वरूपाचे आहे.  त्यामुळे तो कर्म संन्यासाला अधिकारी होतो.  नव्हे, तोच फक्त सर्वकर्मसंन्यासी आहे.  म्हणून म्हटले आहे ज्ञानं संन्यासलक्षणम् |  ज्ञान हेच संन्यासाचे लक्षण आहे. जो ज्ञानी तोच संन्यासी आणि जो संन्यासी तोच ज्ञानी होय.

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी |
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ||        ( गीता. अ. ५-२३ )

मनाने सर्व कर्मांचा संन्यास घेऊन नवद्वाररूपी देहामध्ये काहीही न करता आणि करविता हा आत्मसंयमी पुरुष अनायासाने स्वस्वरूपामध्ये राहतो.  यावरून सिद्ध होते की, ज्ञानी पुरुषाला कोणत्याही प्रकारचे कर्म शक्य नाही.  तसेच त्याला कोणताही विधि-निषेध नाही.  म्हणून हा संन्यास शरीराचा किंवा कर्माचा नसून ‘ज्ञान’ हेच संन्यासाचे लक्षण आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, January 26, 2016

कर्मफळाचा स्वीकार | Acceptance of Outcomes


कर्म कोणतेही असो, त्याबाबत कधीही बेफिकीर वृत्ति ठेवू नये, निष्काळजी राहू नये, ते कधीही टाळू नये कारण मनापासून, प्राण ओतून, कळकळीने काम केले तरच त्या कर्माचे आशीर्वाद आपल्याला मिळतात व ते आशीर्वाद (Blessings) साधकाला उपयुक्त ठरतात.  ते कर्म आनंदवर्धन करणारे होते.

कर्मफलाच्या नियमाप्रमाणे, जेवढे मिळायचे तेवढेच फळ मिळत असते.  ते कधी कमीही नसते अथवा जास्तही नसते.  मनुष्याच्या अज्ञानयुक्त कलुषित बुद्धीला ते फळ कमी वा जास्त वाटते.  फलासक्ति ठेवून केलेले कर्म आशीर्वाद तर देत नाहीच तर उलट ते कर्म शापदायक ठरते.

साधकाची साधना म्हणजे कर्मत्याग नाही तर कर्मफळाच्या अपेक्षेचा त्याग आहे.  कर्म केले म्हणजे त्याचे फळ मिळणारच.  तेही स्वीकारले पाहिजे.  जसजसे राग द्वेष कमी होतील तसतसे मन परिपक्व होऊन कर्मफलाचा पूर्णपणे स्वीकार करील.  कर्मफलाचा स्वीकार, मनाची समजूत व विषयांच्या परिपक्वतेतून (Acceptance born out of understanding and maturity) होणे फार महत्वाचे आहे.  त्या कर्मफळाला तोंड दिलेच पाहिजे.  विशेषतः ते प्रतिकूल असेल तेव्हा ! कारण शेवटी येईल ते कर्मफळ आनंदाने स्वीकारण्याची वृत्ति किंवा स्वभाव झाला पाहिजे.  What cannot be cured must be endured.

मनाने केलेला कर्मफळाचा स्वीकार हाच खरा स्वीकार आहे, कारण केवळ शरीराने फळाचा स्वीकार केला तरी मनाने स्वीकार केला नसेल तर मनात प्रचंड खळबळ होईल.  मन विक्षेप, दुःख, यातनांनी विदीर्ण होईल.  विचाराने व विवेकाने मन अंतर्मुख होईल, त्याप्रमाणात कर्मफळाने निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया आपोआप कमी होतील.  कर्मफळ शांतपणे, आनंदाने स्वीकारले जाईल.  कर्मफळाची योग्य ती जाण किंवा समज (Appreciation) वाढेल.  मनाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी प्रत्येक कर्म ईश्वरार्पण वृत्तीने केले पाहिजे.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005




- हरी ॐ

Tuesday, January 19, 2016

प्रतिक्रियांचे मूळ कारण | Root Cause of Mental Reactions


आपल्या प्रतिक्रियांचे कारण विश्व नाही.  पण विचार न करता आपल्या सर्व सुखदुःखांचे कारण आपण बाहेर शोधतो.  या निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियांचा दोष मूलतः आपल्या मनात, वृत्तीत आहे.  कारण सतत प्रसंग येतच राहणार.  आपण कोणत्या वृत्तीने त्या प्रसंगाच्या फलाचा स्वीकार करतो, त्या वृत्तीवर सुखाचा किंवा दुःखाचा अनुभव अवलंबून आहे.

म्हणूनच एखाद्याला फार चांगल्या प्रसंगात ठेवले तरी तो सुखी होईलच, असे सांगता येत नाही.  याउलट एखाद्याला अत्यंत यातनामय, वाईट प्रसंगात ठेवले तरीही तो आनंदी व प्रसन्न राहू शकेल.  यावरून असे स्पष्ट होते की, आपल्या मनातील राग-द्वेष म्हणजेच Likes & Dislikes हेच प्रतिक्रियांचे मूळ कारण आहेत.  या रागद्वेषामधूनच आपण सतत विश्व पाहतो, प्रत्येक प्रसंग पाहतो व रागद्वेषामधूनच कर्मफलाचे मूल्यमापन सतत करतो.

प्रत्यक्ष कर्म व कर्मफल बंधनकारक नसून त्याच्या फळाची अपेक्षा वृत्ति ही माणसाला बंधनकारक होते.  म्हणून शास्त्रकार म्हणतात की, जितक्या अपेक्षा जास्त तितक्या प्रमाणात अपेक्षाभंग जास्त.  जितका अपेक्षाभंग जास्त तितके नैराश्य, वैफल्य जास्त. याचमुळे जितके विक्षेप वा क्षोभ जास्त तितके बंधन जास्त.  कर्मफलाच्या अपेक्षेच्या वृत्तीने कर्म केले तर दुःखच मिळते.  ते कर्म पुन्हा पुन्हा संसाराला व जन्ममृत्यूला कारणीभूत ठरते.  उलटपक्षी फलेच्छाविरहित कर्म मनाला शांति, समाधान व आनंद देते, सुख देते, चित्तशुद्धि करते.  ते कर्म आत्मज्ञानप्राप्तीला अप्रत्यक्ष साधन होते व संसारातून मुक्त करते.

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात: “ हे अर्जुना, तू मुमुक्षु आहेस. त्यामुळे आत्मज्ञानप्राप्ति हे तुझे साध्य असल्याने कर्मफलाचा तू त्याग कर.  जे फळ मिळेल त्याचा पूर्णपणे स्वीकार कर.  कर्माचा कधीही त्याग न करता निःस्वार्थ बुद्धीने कर्म कर.  कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे.  त्याच्या फलावर तुझा अधिकार नाही. ”

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005




- हरी ॐ

Tuesday, January 12, 2016

कर्मफळाची प्रतिक्रिया | Reaction to Outcomes



कर्माचे मुख्यतः दोन प्रकार आहेत.  पहिल्या प्रकारात मनुष्यनिर्मित कर्म असून त्यालाच पौरुषेय अथवा व्यावहारिक कर्म म्हणतात.  उदा. झाडणे, समाजसेवा करणे, बांधकाम करणे इत्यादि.  दुसऱ्या प्रकारात पूजा, अर्चना, भजन, कीर्तन, धार्मिक, वैदिक कर्म हे अपौरुषेय कर्म आहे.

कर्माचा कर्ता, जीवात्मा हा केवळ कर्म करत नाही तर कर्म पूर्ण होण्याच्या अगोदरच त्या कर्माचे फळ किती मिळेल ?  ते फळ काय असेल ?  कसे मिळेल ?  याची कल्पना किंवा अपेक्षा मनात करत असतो.  किंबहुना फळाची निश्चित कल्पना, अपेक्षा करूनच तो कर्मात प्रवृत्त होतो.  त्यामुळे त्याचे कर्म करण्यात लक्ष नसून ते कर्मफलावर असते.  फलाबाबत ‘Preconceived Judgement’ असते.  त्याचमुळे कर्म पूर्ण झाल्यावर अपेक्षेप्रमाणे फळ मिळाले की नाही ?  याचे तो मूल्यमापन (Evaluation) करतो.

कर्मफल एकच असले तरी त्यातून दोन प्रकारच्या प्रतिक्रिया (Reactions) होतात.  कारण फळ अपेक्षेप्रमाणे असते किंवा नसते.  ते फळ अगोदरच कल्पिलेल्या अपेक्षेप्रमाणे मिळाले तर त्या फलाचा तो आपोआपच स्वीकार करतो व त्यामुळे तो एकदम आनंदी होतो, काही वेळेला हुरळून जातो.  कोणत्याही फलाचा स्वीकार करताना मनात राग व द्वेष (Likes and Dislikes) असतातच.  अपेक्षित फलाचा स्वीकार करण्यात रागद्वेषाच्या प्रतिक्रिया नाहीशा होतात व मन प्रतिक्रियाविरहित म्हणजेच Free from Reactions होते.  अशा प्रतिक्रियारहित मनात आनंद अनुभवास येतो.

याउलट ते फल अपेक्षेप्रमाणे नसेल, मनाविरुद्ध असेल किंवा कमी असेल तर त्या फळाचा मन स्वीकार करत नाही.  ते फळ धुडकावून लावले जाते व त्यामुळे होणारी प्रतिक्रिया म्हणजे एकदम मनात क्षोभ उफाळून येतो.  मन खूप निराश होते, संताप येतो व द्वेषाची भावना निर्माण होते.  मनात विक्षेप येतात व मन दुःखी होते.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005




- हरी ॐ