Tuesday, March 1, 2016

पंडित कोण आहेत? | Wisdom of Self-Realization


सामान्य मनुष्य देहालाच महत्व देऊन सत्यत्व देतो. त्यामुळे त्याच्यामध्ये देह हाच आत्मा ही देहात्मबुद्धि असल्यामुळे तो विश्वात पाहताना देहाला प्राधान्य देऊन पाहात असतो.  त्याची फक्त शारीरिक दृष्टि असते.  यामुळे अहंकारममकारादि प्रत्यय निर्माण होऊन शोक-मोह निर्माण होतात.  संसाराची निर्मिति होते.  ते गेलेल्याबद्दल सतत शोक करीत असतात.  ते अपंडित, अज्ञानीच आहेत.

अत्यंत मूढ, अज्ञानी लोक हे माझे पुत्र वगैरे मृत झाले म्हणून त्यांच्याबद्दल सतत शोक करीत असतात.  परंतु जिवंत असणाऱ्यामध्ये आसक्त होऊन रमतात.  धार्मिक, शास्त्रपारंगत लोक आपले पुत्र महामूर्ख, अज्ञानी, अविचारी, स्वैर, दुराचारी निघाले म्हणून शोक करतात.  आमचे पुत्र आम्हाला काळीमा फासणारे निघाले, अशा प्रकारचे उद्गार काढून सतत शोकाकुल, दुःखी असतात.

परंतु याउलट पंडित – आत्मज्ञानी पुरुष पुत्रादि गेले किंवा मूर्ख निघाले तरी शोक करीत नाहीत, कारण त्यांची दृष्टि शरीरमनबुद्धीच्या अतीत असलेल्या आत्मस्वरूपाची – पारमार्थिक असते.  त्यांच्यामध्ये देहात्मबुद्धि निरास होऊन आत्मस्वरूपाची बुद्धि उदयाला आलेली असते.  त्यामुळे सर्व विश्वाकडे आणि आपल्याभोवती असलेले सगेसोयरे यांच्याकडे बघण्याची दृष्टीच बदललेली असते.

स्वप्नात पुत्रपौत्रादि जन्माला येतात आणि मृत होतात.  काल्पनिकच अस्तित्व असल्यामुळे त्यांचा जन्म आणि मृत्यु सर्वच काल्पनिक !  म्हणून स्वप्नातून जागृत झालेला पुरुष काल्पनिक पुत्रजन्माने हर्षित होत नाही किंवा काल्पनिक मृत्यूने दुःखी, शोकाकुल होत नाही.  त्याचप्रमाणे अविद्यारूपी निद्रेचा ध्वंस करून आत्मज्ञानाने स्वस्वरूपला जागृत झालेला आत्मज्ञ पुरुष हे सर्व विश्व आणि सगेसोयरे अविद्याकल्पित असून स्वप्नाप्रमाणे भास आहे.  त्यांना खरी वास्तवता नसून परमात्मा, ब्रह्मस्वरूप हेच त्रिकालाबाधित सत्य आहे असे पाहतात.  त्यामुळे सर्व असत् नामरूपांचा त्याग करून सर्व ठिकाणी अनुस्यूत असलेले ब्रह्मस्वरूप पाहतात.  ज्यांच्यामध्ये ही आत्मस्वरूपाची बुद्धि निर्माण झालेली आहे ते पंडित होय.  जे आत्मज्ञानी आहेत तेच पंडित आहेत.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ

No comments:

Post a Comment