Sunday, October 27, 2013

श्रुतिवाक्याचा आश्रय का घ्यावा ? | Why to have faith in ‘Shruti’ ?




श्रुतिवाक्याचा आश्रय का घ्यावा ?  हे स्पष्ट करताना आचार्य एक सुंदर दृष्टान्त देतात –

तावत् गर्जन्ति शास्त्राणि जम्बुका विपिने यथा |
न गर्जति महाशक्तिः यावत् वेदान्तकेसरी ||

अरण्यात महाशक्तिशाली वनराज गर्जना करत नाही तोपर्यंत, मी मोठा आहे हे सिद्ध करण्यासाठी बाकी सर्व कोल्ह्यांची कोल्हेकुई चालते.  त्याचप्रमाणे महाशक्तिशाली वेदान्तकेसरीब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः ” हा सिद्धान्त मांडण्यास पुढे येत नाही, तोपर्यंतच इतर न्याय, सांख्य, वैशेषिक इत्यादी यांची बाजू घेणारे विद्वान आपापले सिद्धान्त अहमहमिकेने मांडतात व वादविवाद घालतात.  ते इतरांच्या मतांचे खंडन करून स्वतःच्या पक्षाचे प्रतिपादन करतात.

परंतु सर्वात शेवटी वेदान्तशास्त्र सर्व सिद्धान्ताचे खंडन करून सर्वश्रेष्ठ ठरते.  त्यामुळे वेदान्तशास्त्र हेच खरे शास्त्र व त्याने प्रतिपादित केलेला सिद्धान्त हाच खरा सिद्धान्त आहे.  म्हणून साधकाने वेदान्तप्रतिपादित श्रुतिसिद्धान्ताचाच आश्रय घ्यावा व तेथेच आपली श्रद्धा व निष्ठा ठेवावी.  शास्त्र अध्ययनात अद्वैत सिद्धान्त हेच निरतिशय व अंतिम सत्य असल्याने या वेदप्रतिपादित अद्वैत सिद्धान्तावरच पूर्ण श्रद्धा व निष्ठा ठेवावी.

द्वैतवादी शत्रूपक्षांची गर्दी मोठी असल्याने त्याच्याकडे जास्त माणसे आकर्षित होत असली तरीही आपण त्या पक्षाकडे जावे असे मुळीच नाही, कारण ते आकर्षित झालेले सर्वजण अज्ञानी व अविवेकी असू शकतील.  उदा.  सूर्य सकाळी उगवतो व रोज संध्याकाळी मावळतो ही क्रिया वैश्विक सत्य मानली जाते.  वैज्ञानिक दृष्ट्या ते सत्य नाही.  तरी सुद्धा सर्व लोक ते सत्य आंधळेपणाने स्वीकारतात.  तेव्हा विवेकी साधकाने त्रिकालाबाधित एकत्वाचा, ज्ञानाचा आश्रय घ्यावा.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005


- हरी ॐ

Tuesday, October 22, 2013

श्रुतिशिरपक्ष सिद्धान्त | The Fundamental Doctrine




कितीही थोर अथवा मोठ्या व्यक्तीने चुकीचा सिद्धान्त मांडला तर तो चुकीचाच राहणार.  त्याला कोणाचाच इलाज नाही.  म्हणून अशा चुकीच्या पक्षापक्षांचा गोंधळ होतो.  विविध मतप्रणाली मांडली जाते.  यासाठी शास्त्र आदेश देते की, जिज्ञासु साधक हा पूर्ण अज्ञानी आहे.  त्यामुळे त्याला काहीच कळत नाही.  यासाठी त्याने एकाच ठिकाणी निष्ठा ठेवली पाहिजे.

कदाचित सुरुवातीला त्याला शास्त्र समजणार नाही, गर्भितार्थ किंवा एकत्व उमजणार नाही.  श्रुतिसंमत कितीतरी मुद्दे कदाचित समजणार नाहीत, कारण साधकाच्या मनाची हे ज्ञान ग्रहण करण्याची अजूनही तयारी झालेली नसते.  तरी सुद्धा जीवनात कोणत्यातरी एका सिद्धान्ताचा आश्रय घ्यावा व तो सिद्धान्त म्हणजे   श्रुतिशिरपक्ष  होय.  म्हणजेच वेदान्तप्रतिपादित महावाक्यांचा जीवब्रह्मैक्य ज्ञानाच्या सिद्धान्ताचा त्याने आश्रय घ्यावा.

आचार्य हा सिद्धान्त एका श्लोकात मांडतात –
श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटीभिः |
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः ||

कोट्यवधी ग्रंथामधून प्रतिपादित केलेले तत्व मी फक्त अर्ध्या श्लोकात सांगतो.  जगात ब्रह्म हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.  त्याव्यतिरिक्त असणारे नानारूपात्मक अनेकत्वयुक्त सर्व विश्व मिथ्या आहे.  जीव ब्रह्मापासून वेगळा किंवा भिन्न नाही.  जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे.   


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005

 
 
- हरी ॐ

Tuesday, October 15, 2013

ब्रह्मजिज्ञासा कोणी करावी ? | Who should search the Supreme?

 
विषयांची जिज्ञासा निर्माण करून त्यांची प्राप्ति करणे, हे मनुष्याचे परम कर्तव्य नाही.  उलट प्रत्येकाने आत्मस्वरूप जाणण्याची इच्छा करावी व आत्माच जाणावा.
 
ब्रह्मजिज्ञासा कोणी करावी ?  अशा साधकाने, अशा गुणविशिष्ट जिज्ञासूने आत्मेच्छा किंवा ब्रह्मजिज्ञासा करावी –
 
१. ‘अस्मिन् जन्मनि वा परजन्मनि’, या जन्मात किंवा मागील अनेक जन्मात सेवावृत्तीने, ईश्वरार्पण बुद्धीने, निष्काम कर्मयोग करून अंतःकरण शुद्ध केले आहे;
२. विषयांच्या सर्व मर्यादा समजावून घेऊन विषयांचे वैराग्य प्राप्त केले आहे;
३. ऐहिक व पारलौकिक भोगप्राप्तीची इच्छा पूर्णपणे गळून पडली आहे;
४. अशी ही विवेकयुक्त वैराग्याची अंतःकरणाची अवस्था प्राप्त झाली आहे;
 
परंतु “ मला काहीही नको ” ही भावना एखाद्या निराश, हताश झालेल्या मनुष्याच्या मनातही असू शकेल.  मानसिक धक्का, संकट किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू यामुळे त्याला वैफल्यातून “ मला काही नको ” असे वाटेल.  पण ते वैराग्य तात्कालिक असते.  त्यात विवेकाचा पूर्ण अभाव असतो.
 
व्यक्ति त्यावेळी भावनावश झालेली असते.  त्यामुळे ते खरे वैराग्य नव्हे.  अशा मनाने त्याला शास्त्राचे आकलन होणार नाही, कारण त्याची ती जिज्ञासु मनाची अवस्था नाही.  नैराश्याने ग्रासलेली व्यक्ति जिज्ञासु होऊ शकत नाही.
 
विवेकयुक्त वैराग्याने हळुहळू दीर्घ कालावधीनंतरच जिज्ञासूला कायमस्वरूपाची मनाची परिपक्वता येते.  त्यामुळे त्या जिज्ञासूला “ पुढे काय ” ही उत्सुकता सतत असते.  या जिज्ञासु साधकाने ऐहिक किंवा पारलौकिकाची इच्छा न करता केवळ आत्मेछाच करावी.
 
 "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005
 
 
- हरी ॐ
 

Tuesday, October 8, 2013

शास्त्राचीच जिज्ञासा का ? | Why have curiosity for Shaastra ?

 

 
 
शास्त्राचीच जिज्ञासा का निर्माण करावी ?  आत्मज्ञानाबद्दल दृढ इच्छा का असावी ?
 
१. त्याचे कारण असे की, विषयांची इच्छा कितीही पूर्ण केली तरी ती मनुष्याला तृप्त, पूर्ण, संतुष्ट करू शकत नाही.  याउलट जितकी इच्छापूर्ति करावी, तितका जीव असंतुष्ट व अतृप्तच राहतो.
 
२. दुसरे कारण म्हणजे, विश्वात कोणताही एक विशिष्ट विषय नाही की त्या विषयाची इच्छा पूर्ण केल्यावर सर्व इच्छा पूर्ण होतात.  उलट एका विषयाची इच्छापूर्ति करतानाच, दुसरी नवीन इच्छा निर्माण होते व ती इच्छा पूर्ण होत नाही तोच, नवीन इच्छेच्या पूर्तीमध्ये तो अडकतो.  या इच्छा परत परत मनुष्याला कर्मात प्रवृत्त करतात.  तसेच या इच्छा कधीही न संपणाऱ्या आहेत.  मनुष्य संपून जातो पण इच्छा संपत नाहीत.
 
३. तिसरे कारण असे की, विषयांच्या इच्छा मनुष्याला ‘आप्तकाम’ बनवत नाहीत.  आप्तकाम म्हणजे पूर्णात्मा !  पूर्णात्मा म्हणजे ज्याने सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत असा !  इच्छांची पूर्ति त्याला पूर्ण तृप्त बनवत नाही.
 
 
व्यवहारात कितीही विषयांची प्राप्ति केली तरी त्या प्राप्तीला देशकालाची मर्यादा पडते.  मग ती ऐहिक किंवा पारलौकिक विषयांची इच्छा असो.  त्या इच्छांची पूर्ति हे मनुष्याचे अंतिम साध्य होऊ शकत नाही.  कधीच न संपणाऱ्या व सतत एकापाठोपाठ निर्माण होणाऱ्या इच्छा मनुष्याला सतत साधकाच्या अवस्थेत ठेवतात.  तो पुढे प्रगति – उन्नति करू शकत नाही.

 

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005


- हरी ॐ

 

Tuesday, October 1, 2013

श्रद्धावाँल्लभते ज्ञानम् | The Believer acquires Knowledge

 
वेदांतशास्त्र श्रवण करताना माझ्या अहंकाराला पोषक आहे, तेवढेच मी ग्रहण करतो, आणि अन्य सर्व ज्ञान अमान्य करतो. वर्षानुवर्षे श्रवण, मनन, चिंतन, जप, नामस्मरण, ध्यान, उपासना, पूजा, अर्चना, अनुष्ठान, कीर्तन, भजन वगैरेदि अशा विविध प्रकारच्या साधना करूनही शास्त्राची दृष्टि न समजल्यामुळेच साधकाला आंतरिक तृप्ति, शांति, समाधान व आनंद प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून भगवान ज्ञानाचे प्रमुख साधन सांगतात –
 
श्रद्धावाँल्लभते ज्ञानम्   (गीता अ. ४-३९)
 
श्रद्धावान असणाऱ्या जिज्ञासु साधकालाच सम्यक् व यथार्थ ज्ञानाची प्राप्ति होते. साधकाला स्वतःच्या मानसिक संघर्षामधून बाहेर यावयाचे असेल तर श्रद्धा हेच साधन आहे. श्रद्धा साधकाला अत्यंत निकृष्ठ अवस्थेपासून उत्कृष्ठ, परमोच्च अवस्थेपर्यंत घेऊन जाते. या मार्गामध्ये अनेक धोके आहेत. खाचखळगे आहेत. श्रुति म्हणते –
 
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया |
दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति || (कठ. उप. १-३-१४)
 
तलवारीच्या धारेवर चालण्याप्रमाणे हा मार्ग अत्यंत खडतर, दुर्गम आहे.  “ येरागबाळ्याचे काम नोहे |  तेथे पाहिजे जातीचे || ”  अन्यथा अनेक साधक या मार्गमधून च्युत होण्याचीच शक्यता अधिक असते. परंतु या सर्व प्रसंगांच्यामध्ये जर श्रद्धा दृढ राहिली, तर तीच श्रद्धा साधकाला त्या सर्व प्रसंगांच्यामधून सहीसलामत बाहेर काढते. प्रसंगांच्याकडे पाहण्याची दृष्टि देते. श्रद्धाच साधकाला प्रत्येक दिवशी साधनेमध्ये प्रवृत्त करून दुर्दम्य उत्साह, प्रेरणा, शक्ति, सामर्थ्य, धैर्य व आत्मविश्वास देते. श्रद्धेमुळे साधनेमध्ये सातत्य येऊन साधक या मार्गामध्ये स्थिर व दृढ होतो. 
 
 
"श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011
 
 
- हरी ॐ